पुणे : पिण्याच्या पाण्याची मागणी वाढत असताना दुसऱ्या बाजूला पुरवठा आहे तेवढाच राहिल्याचा थेट परिणाम पाणीपुरवठा विस्कळीत होण्यावर झाला आहे. गेल्या चार दिवसांत तब्बल ४०० तक्रारींची नोंद महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडे झाली असून गेल्या चार दिवसांत तक्रारींचे प्रमाण सरासरी ३५ ते ४० टक्क्यांनी वाढले आहे.

दरम्यान, टँकरद्वारे होणाऱ्या पाण्याच्या काळ्याबाजारासंदर्भात दोन तक्रारी प्रशासनाकडे आल्या आहेत. उन्हाच्या वाढत्या झळांमुळे पिण्याच्या पाण्याच्या मागणीत वाढ झाली आहे. शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी प्रतिदिन १,६५० ते १,७०० दशलक्ष लिटर पाणी धरणातून घेतले जात आहे. गेल्या पंधरा ते वीस दिवसांत प्रतिदिन ८० ते १०० दशलक्ष लिटर अधिकचे पाणी महापालिका धरणातून उचलत आहे. पाणी जास्त उचलल्यावर पुरवठा व्यवस्थित व्हावा, अशी अपेक्षा असताना शहरातील अनेक भाग तहानलेलेच असल्याचे चित्र आहे. त्यात गेल्या चार दिवसांपासून आणखी भर पडली आहे.

हेही वाचा – दुभंगलेली मने जोडण्यावर अजित पवारांचा भर

विस्कळीत पाणीपुरवठ्याच्या तक्रारी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडे मोठ्या प्रमाणावर येण्यास सुरुवात झाली आहे. फुरसुंगी, उरूळी, हडपसर, वडगावशेरी, पाषाण, औंध, धनकवडी, सुखसागरनगर, बालाजीनगर, आंबेगाव, धायरी, नऱ्हे या भागातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे.

‘पाणीपुरवठ्याच्या तक्रारीत ३५ ते ४० टक्क्यांनी वाढ झाली आहे. गेल्या चार दिवसांत ४०० तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. पिण्याच्या पाण्याची मागणी वाढली असली तरी धरणातून वाढीव पाणी घेण्यास मर्यादा आहेत. त्यामुळे तक्रारींमध्ये वाढ झाली आहे. विस्कळीत पाणीपुरवठा होत असलेल्या भागाला टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे,’ अशी माहिती महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता नंदकिशोर जगताप यांनी दिली.

हेही वाचा – खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचाराला अजित पवार आले, पार्थ पवार येणार?

दरम्यान, टँकरद्वारे पाणीपुरवठा होत असला तरी टँकरद्वारे होत असलेल्या पाण्याचा काळाबाजार होत आहे. महापालिका प्रशासनाकडूनही तशी कबुली देण्यात आली आहे. यासंदर्भात तक्रारी करण्यासाठी महापालिकेने नि:शुल्क दूरध्वनी सेवा सुरू केली आहे. त्यावर आत्तापर्यंत अवघ्या दोन तक्रारी आल्या आहेत. त्या फुरसुंगी आणि कळस या भागातून आल्या आहेत. मात्र, त्यामध्ये योग्य तपशील देण्यात आलेला नाही. त्यामुळे तक्रारदारांना योग्य तपशील देण्याची सूचना करण्यात आली आहे. त्यानंतर या टँकरचालकांवर कारवाई होईल, असा दावा प्रशासनाकडून करण्यात आला आहे.