पुणे : जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे पाण्याची उपलब्धता झाल्याने जिल्ह्यातील टँकरची संख्या आता निम्म्यावर आली आहे. जून महिन्याअखेर जिल्ह्यात ६६ टँकर सुरू होते. सध्या केवळ २९ टँकरने नागरिकांना पाणीपुरवठा करण्यात येत असून अद्यापही ६० हजार नागरिक बाधित असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.
जिल्ह्यात दरवर्षी मार्च महिन्यात पाणी टंचाई जाणवू लागते. तेव्हापासून जिल्ह्यातील काही भागांमध्ये टँकरची गरज भासते. त्यानुसार पाणी टंचाई निर्माण झाल्याने टँकरने पाणी पुरवठा करण्यात येतो. जिल्ह्यात मार्च ते जून महिन्या दरम्यान, शिरूर, खेड, आंबेगाव, जुन्नर, भोर, वेल्हा, तसेच हवेली तालुक्यामध्ये पाणी टंचाई निर्माण झाली होती. त्यामुळे त्या गावांमध्ये जून महिन्याअखेर सर्वाधिक ६६ एवढे टँकर सुरु होते. मार्च महिन्यापासून टँकरची ही संख्या वाढत गेली. मे महिन्यात त्या संख्येत आणखी वाढ झाली होती. जून महिन्यात पावसाचे आगमन होणे अपेक्षित होते. मात्र, पावसाने पाठ फिरवली, तसेच पूर्व मोसमी पाऊसही जिल्ह्यात झाला नाही. त्यामुळे टँकरची संख्या वाढत गेली. जुलै महिन्याच्या सुरूवातीपासून पाऊस हजेरी लावत असून गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे.
जिल्ह्यात पावसाने हजेरी लावल्याने आता टँकरच्या संख्येत घट झाली आहे. ६६ टँकरच्या संख्येवरून घट होऊन आता जिल्ह्यात २९ टँकर सुरु आहे. म्हणजेच ३७ टँकरची घट झाली आहे. आजमितीला २९ टँकरद्वारे जिल्ह्यातील ६० हजार ३०५ नागरिकांना पाणी पुरवठा करण्यात येत असून त्यात २२ गावांसह १९२ वाड्या वस्त्यांतील नागरिकांचा समावेश आहे. सद्य:स्थितीत बारामती, पुरंदर आणि जुन्नर तालुक्यात प्रत्येकी एक टँकर सुरू आहे. या तिन्ही ठिकाणी खासगी संस्थांमार्फत टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. तर दुसरीकडे जुन्नर, आंबेगाव, शिरुर, खेड, हवेली, भोर, वेल्हा या तालुक्यांमध्ये टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत होता. तर ऐन पाणी टंचाईतही सुरुवातीपासून दौंड, इंदापूर, मुळशी, मावळ या ठिकाणी अद्याप एकही टँकरने पाणी पुरवठा करण्यात आलेला नसल्याचे निरीक्षण जिल्हा प्रशासनाकडून नोंदविण्यात आले.
सात तालुक्यांत एकही टँकर नाही
सध्या टँकरची संख्या २९ पर्यंत घटली असली, तरी पावसाने उघडीप दिल्यावर आणखी टँकरची गरज भासण्याची शक्यता नाकारता येत नाही. जिल्ह्यात सध्या आंबेगाव तालुक्यात पाच, तर शिरूरमध्ये सर्वाधिक १५ टँकर सुरु आहेत. त्या पाठोपाठ खेड तालुक्यात सहा टँकरने पाणी पुरवठा सुरु आहे. तसेच बारामती, जुन्नर, पुरंदर या ठिकाणी प्रत्येकी एक पुरस्कृत टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे. सध्या वेल्हे, भोर, दौंड, इंदापूर, हवेली, मावळ, मुळशी या ठिकाणी आजमितीला एकही टँकर सुरू नसल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.