लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री, वित्तमंत्री अजित पवार यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अंतरिम अर्थसंकल्प विधिमंडळात सादर केला. राज्याच्या सन २०२४-२५ वर्षाच्या एकूण खर्चासाठी सहा लाख ५२२ कोटी रुपयांची तरतूद असलेल्या या अर्थसंकल्पात पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून अजित पवार यांनी पुण्याला झुकते माप दिल्याचे दिसून येत आहे. पायाभूत सुविधा प्रकल्प आणि त्यांचे भूसंपादन, नागपूरच्या धर्तीवर पुण्यात एम्ससह परिचर्या महाविद्यालय, डे केअर केमोथेरपी सेंटर आणि पर्यटन याकरिता भरभरून निधी देण्यात आला आहे.

पुणे जिल्ह्यासाठी मौजे वडज, तालुका जुन्नर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित शिवनेरी संग्रहालय उभारण्यात येणार आहे. रिंगरोडच्या भूसंपादनासाठी तब्बल १० हजार ५१९ कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. पुणे-नाशिक या नवीन रेल्वे मार्गांचे भूसंपादन सुरु असल्याचा केवळ उल्लेख अर्थसंकल्पात करण्यात आला आहे. तसेच पुणे-लोणावळा मार्गिका तीन आणि चार या रेल्वे मार्गांकरिता येणाऱ्या खर्चात ५० टक्के आर्थिक सहभाग राज्य सरकारचा असणार आहे. बारामती येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांशी संलग्न प्रत्येकी १०० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे शासकीय परिचर्या महाविद्यालय उभारण्यात येणार आहे.

आणखी वाचा-पुण्यातील रोपवाटिकेत गावठी दारूचा अड्डा

नागपूर एम्सच्या धर्तीवर औंध, पुणे येथे अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था उभारण्यात येणार आहे. पुणे जिल्ह्यात १५ खाटांचे अद्ययावत डे केअर केमोथेरपी सेंटर, तर लोणावळ्यातील जागतिक दर्जाचा स्कायवॉक प्रकल्प – ३३३ कोटी ५६ लाख किंमतीचा असणार असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. हवेली तालुक्यातील छत्रपती संभाजी महाराजांचे बलिदान स्थळ मौजे तुळापूर आणि शिरूर तालुक्यातील समाधी स्थळ वढू बुद्रुक येथील स्मारक – २७० कोटी रुपये किंमतीचा आराखडा असून त्याचे काम सुरु असल्याचे अर्थसंकल्पात म्हटले आहे. एकविरादेवी मंदिर जिल्हा पुणे तीर्थक्षेत्र विकास प्राधिकरणांची स्थापना करण्याची घोषणा करण्यात आली आहे. याशिवाय संगमवाडी, पुणे येथे लहुजी वस्ताद साळवे यांचे स्मारक, तर हुतात्मा श्री शिवराम हरी राजगुरु जन्मस्थळ परिसर विकासासाठी १०२ कोटी ४८ लाख रुपयांचा आराखडा असणार आहे.