पुणे : ‘ज्यांना संघ काय हे कधीच माहिती नव्हते, हिंदुत्व पटले नव्हते, नैतिकतेचा लवलेश नव्हता अशा आयारामांमुळे संघ परिवार प्रदुषित झाला आहे, असे विधान रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरी यांनी केले, तर मृत्युंजय देशासाठी संघ आणि हिंदुत्व आवश्यक असून संघ परिवाराने सावध राहण्याची आवश्यकता आहे, असा सल्ला देत संघाची राजकीय शाखा असलेल्या भाजपला ‘आयाराम संस्कृती’वरून अप्रत्यक्ष खडसावले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य भैय्याजी जोशी लिखित ‘हमारा सांस्कृतिक चिंतन’ या हिंदीतील आवृत्तीचे ‘मृत्यूंजय भारत’ या मराठी अनुवादीत पुस्तकाचे प्रकाशन बुधवारी पुण्यातील मा. स. गोळवलकर गुरुजी विद्यालयातील गणेश सभागृहात स्वामी गोविंद गिरी यांच्या हस्ते करण्यात आले. पश्चिम महाराष्ट्राचे प्रांत संघचालक प्राचार्य नानासाहेब जाधव, मोरया प्रकाशनचे दिलीप महाजन यावेळी उपस्थित होते.
गोविंद गिरी म्हणाले, ‘प्राचीन ते मध्ययुगीन काळात भारतावर वेगवेगळ्या शक्तींची, परकीयांची मोठी आक्रमणे झाली, अनेक संकटे आली, मंदिरे पाडली, विद्यापीठे उध्वस्त केली, हिंदूत्वावर आघात केला. परंतु, संघाने योजनाबद्ध पद्धतीने प्रतिकार केला. देशाची संस्कृती, आंतरिक सजीवता कायम ठेवली आहे. त्यामुळे भारत देशाला कोणीही संपवू शकले नाहीत. इतकेच नव्हे, तर संघाला संपविण्याचा तीनवेळा प्रयत्नही केला. हीच विरासत सांभाळून देशाला पुढे न्यायचे आहे.’
हे सांगताना गोंविंददेव गिरी जपानच्या लोकसंख्येचे उदाहरण देत भारतात हिंदूंची संख्या कमी झाली नाही पाहीजे, असे आवाहन केले. जगाच्या इतिहासात काही धर्मांध शक्तींनी अनेक धार्मिक स्थळे उध्वस्त केली. परंतु, जगाच्या पाठीवर भारतच असा एकमेव देश आहे, ज्याने हिंदूत्वाची आस्था, प्रेरणा असलेले अयोध्येतील श्रीराम मंदिर पुन्हा त्याच ठिकाणी उभारले आहे, अशी आठवण त्यांनी करून देत यापूर्वी देशाच्या सीमांचा संकोच झाला; पण यापुढे संकोच नको. पण हिंदूंची संख्या कमी झाली तर काय करणार ? समाजाला लागलेली कीड शोधताना हिंदूंची संख्या कमी होणार नाही हे भान ठेवावे लागणार आहे. जग सुखी हवे असेल तर समर्थ भारतासाठी हिंदू पाहिजे,’ असे आवाहन गोविंददेव गिरी यांनी केले.
इंदिरा गांधींचे प्रयत्नही निष्फळ
संघ संपण्यासाठी इंदिरा गांधी यांनी प्रयत्न केले. संघ संपला, असे त्यांचे सहकारी सांगायचे. त्यामुळे त्यांना खूप आनंद झाला होता. मात्र, त्यानंतर झालेल्या निवडणुकीतील निकालानंतर त्यांना संघ अस्तित्वात आहे, हे समजले. संघ बंद करण्याची ताकद केवळ शाखेचा शिक्षक आणि कार्यवाह यांच्यातच आहे, असे भैय्याजी जोशी यांनी सांगितले.