पिंपरी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे लोकांमधील मुख्यमंत्री आहेत. लाेकांमध्ये मिसळून, रस्त्यावर उतरून ते काम करतात. त्यामुळे मुख्यमंत्र्यांबराेबर काेणी छायाचित्र काढल्यास त्यांना कसे जबाबदार धरता येईल, असा सवाल उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केला. जे लाेक कधी बंगल्याच्या बाहेर आले नाहीत. त्यांना दुसऱ्यांबरोबर छायाचित्र काढणे हे माहीत नसावे, असा टोला सामंत यांनी खासदार संजय राऊत यांना लगाविला.
पुणे इंटरनॅशनल प्रदर्शन आणि कनव्हेन्शन सेंटर यांच्यावतीने १७ ते १९ फेब्रुवारी या कालावधीत मोशी येथे होणाऱ्या निर्यातक्षम संरक्षण सामग्री प्रदर्शन (महाराष्ट्र एमएसएमइ डिफेन्स एक्स्पो) पूर्वतयारीचा सामंत यांनी वाकड येथे आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते.
खासदार संजय राऊत हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे गुन्हेगारांसोबतचे छायाचित्र समाजमाध्यमावर प्रसारित करत आहेत. याबाबत बोलताना मंत्री सामंत म्हणाले, सध्या प्रत्येकाच्या हातात माेबाईल संच आहे. राजकीय नेत्यांसाेबत छायाचित्र काढण्याची सर्वांची इच्छा असते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लाेकांमधले असून काेणीही छायाचित्र काढल्यास त्यांना कसे जबाबदार धरता येईल.
महाराष्ट्रातील एकही प्रकल्प गुजरातला गेलेला नाही. काही लाेक नकारात्मक वातावरण तयार करण्यात यशस्वी हाेत असल्याचे दिसून येत आहे. तीन लाख ३० हजार काेटींचे करार दावाेसमध्ये केले असून परदेशी गुंतवणूक महाराष्ट्रात आणली आहे. पवना, इंद्रायणी नदी सुधार प्रकल्प तीन हजार काेटी रुपयांचा आहे. उगमापासून शेवटपर्यंत नदी स्वच्छ केली जाणार आहे. औद्याेगिक, नागरी भागातील मैलापाणी बंद करणे, नदीतील गाळ, घाण, कचरा, जलपर्णी कशी काढली जाईल. यावर आराखडा तयार केला जाणार आहे. त्यानंतर निविदा प्रक्रिया राबविली जाणार आहे. महायुतीमध्ये काेणतेही मतभेद नाहीत. लोकसभेला महायुतीच्या ४८ ही जागा निवडून येतील, असा दावा सामंत यांनी व्यक्त केला.
हेही वाचा – पुण्यातील तरुणाचा अनैतिक संबंधातून गुवाहाटीत खून, महिलेसह दोघांना अटक
‘प्रदर्शनामुळे उद्योगांच्या विकासाला चालना’
पुणे इंटरनॅशनल प्रदर्शन आणि कनव्हेन्शन सेंटर यांच्यावतीने आयोजित प्रदर्शनाला राज्यातील लघु व मध्यम उद्योजक मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहण्याची शक्यता आहे. या प्रदर्शनामध्ये ४६ गाळे लावण्यात येणार असून आतापर्यंत ३०० उद्योजकांनी सहभागी होण्यासाठी नोंदणी केली आहे. संरक्षण उत्पादनासाठी महाराष्ट्र एक प्रमुख केंद्र बनवण्यासाठी शासन वचनबद्ध आहे. या प्रदर्शनामुळे लघु व मध्यम उद्योगांच्या विकासाला चालना मिळेल, असेही सामंत म्हणाले.