पुणे : युद्ध हा नेहमीच शेवटचा पर्याय असतो. शांतता हवी असल्यास युद्ध सज्ज राहावे लागते. मात्र, युद्ध हे अतार्किक असते. युद्धात नुकसान होते, असे मत माजी लष्करप्रमुख जनरल ( निवृत्त) मनोज नरवणे यांनी रविवारी मांडले. ‘मेक इन इंडिया’ अंतर्गत चांगले काम होत असले, तरी गेल्या ५०-६० वर्षांत जे झाले नाही ते लगेच साध्य होणार नाही. आपल्याला स्वदेशी संशोधन विकासावर भर देण्याची गरज असून, एखाद्या देशावर बंदी घालून काही होणार नाही, अशी भूमिकाही त्यांनी मांडली.
आद्य संचालक आप्पा पेंडसे यांच्या जन्मदिनानिमित्त ज्ञान प्रबोधिनीतर्फे आयोजित ‘रूप पालटू या’ व्याख्यानमालेअंतर्गत आयोजित कार्यक्रमात नरवणे बोलत होते. पत्रकार सारंग दास्ताने यांनी नरवणे यांच्याशी ‘नव्या आंतरराष्ट्रीय व्यवस्थेसाठी भारताची संरक्षण सिद्धता’ या विषयावर संवाद साधला. नरवणे यांनी या संवादात अंतर्गत सुरक्षा, चीन-पाकिस्तान, तंत्रज्ञान, लष्कराची पुनर्रचना, संरक्षण उत्पादन, लष्करातील महिलांना संधी अशा वेगवेगळ्या मुद्द्यांवर भाष्य केले.
नरवणे म्हणाले, ‘अनिश्चित सीमांमुळे चीनबरोबर वाद आहेत. त्या बाबत १९ व्या फेरीनंतर थांबलेली चर्चा पुन्हा सुरू होणे अपेक्षित आहे. त्यातून होणारा निर्णय राजकीय असेल. मात्र, त्याबाबत लवकर निर्णय होईल असे वाटत नाही. पाकिस्तानबरोबरही सीमाविषयकच वाद असला, तरी तो प्रामुख्याने विचारसरणीचा वाद आहे. भारत हा धर्मनिरपेक्ष, लोकशाही असलेला देश आहे, तर पाकिस्तान धर्माचे प्राबल्य असलेला, नावापुरती लोकशाही असलेला देश आहे. पाकिस्तानबरोबरचा वादही लवकर सुटणारा नाही. भारताच्या तुलनेत पाकिस्तान छोटा देश आहे. आर्थिकदृष्ट्या तर भारत फारच पुढे निघून गेला आहे. पाकिस्तानमध्ये आज खायला नाही, प्यायला पाणी नाही. तेथील जनता उठाव करेल, तेव्हाच काहीतरी होईल.
देशासमोर अंतर्गत आणि बाह्य सुरक्षेची आव्हाने आहेत. बाह्य सुरक्षेसाठी लष्कर सज्ज आहे. अंतर्गत सुरक्षा हे लष्कराचे प्रमुख काम नसले, तरी आवश्यकतेनुसार लष्कराकडून मदत केली जाते. अंतर्गत सुरक्षा सर्वांनी मिळून हाताळावी लागेल. देशात जात, धर्म, प्रांत, भाषा अशा कोणत्याही प्रकारचा भेद असणे योग्य नाही. या भेदाचा फायदा परकीय शक्ती घेऊ शकतात. गेल्या काही वर्षांत अंतर्गत सुरक्षेच्या दृष्टीने चांगले काम झाले आहे. नक्षलवाद, ईशान्येकडील राज्यांतील घुसखोरी ही आव्हाने आहेत. मात्र, त्यात कधीही वाढ होऊ शकते, असेही नरवणे यांनी सांगितले.
युद्धाचे स्वरुप कायम बदलते असते. युद्धात तंत्रज्ञान कायमच होते. बदलत्या तंत्रज्ञानासह बदलत राहिले पाहिजे. तंत्रज्ञानाबाबत भारत कुठेही मागे नाही. मात्र, सुधारणेसाठी वाव आहेच. नवीन शोध लागल्यावर तो स्वीकारणे, त्यानुसार बदल करणे ही कायमची प्रक्रिया असते. ऑपरेशन सिंदूरमधून तंत्रज्ञानाचा वापर दिसलाच आहे, असेही त्यांनी नमूद केले. कोणताही देश १०० टक्के उत्पादन करत नाही. अगदी अमेरिका, रशियाही काही भाग आयात करतात. मेक इन इंडियाअंतर्गत आता खासगी क्षेत्राला संरक्षण उत्पादनाला संधी मिळाली आहे. इंजिनासारखे महत्त्वाचे भाग आपण तयार केले पाहिजेत, ते अजून होत नाही. उदाहरणार्थ, ड्रोनची मोटार चीनमध्ये तयार होते, औषधनिर्मितीसाठीचे एपीआय चीनमधूनच येतात. ही बाब लक्षात घेता देशातील उत्पादनासाठी थोडा वेळ द्यावा लागेल. मात्र, महत्त्वाचे भाग आपण कसे विकसित करणार हा प्रश्न आहे, असेही ते म्हणाले.
लष्कराची पुनर्रचना, थिएटर कमांड ही नवी कल्पना नाही. कारगिल युद्धानंतरपासून ही चर्चा सुरू आहे. २०१९ मध्ये जनरल बिपीन रावत सरसेनाध्यक्ष झाल्यावर बदलाची प्रक्रिया सुरू झाली. मात्र, हे बदल करणे सोपे नाही. अधिकारी, जवानांना प्रशिक्षण देण्यापासून बरेच काही करावे लागणार आहे. संरक्षण दलांच्या तिन्ही दलांच्या समन्वयाने काम सुरू झाले आहे, असे नरवणे यांनी सांगितले.