पुण्यात घरांच्या मागणीत मोठी घसरण होत असताना कार्यालयीन जागांच्या मागणीत मात्र मोठी वाढ होत आहे. सर्वसाधारपणे एकमेकांना पूरक असणाऱ्या या घटकांमध्ये मोठी तफावत दिसून येत आहे. यामुळे शहरातील विरोधाभासी चित्र समोर आले आहे.

एखाद्या शहरात कार्यालयीन जागांना मागणी वाढल्यानंतर तिथे घरांनाही मागणी वाढते, असे चित्र सातत्याने दिसते. कारण कंपन्यांकडून नवीन कार्यालये सुरू झाल्यानंतर रोजगारामध्ये वाढ होते. त्या निमित्ताने रोजगाराची संधी उपलब्ध झालेल्या नोकरदारांकडून घरांना मागणी वाढते. हे चक्र नेहमी याच दिशेने फिरत असते. पुण्यात मात्र, यंदा हे चक्र उलटे फिरू लागले आहे. यंदा पहिल्या तिमाहीत १६ हजार ८६० घरांची विक्री झाली होती. त्या तुलनेत दुसऱ्या तिमाहीत घरांच्या विक्रीत १६ टक्के घसरण होऊन १४ हजार २२० घरांची विक्री झाली. गेल्या वर्षातील दुसऱ्या तिमाहीच्या तुलनेत त्यात तब्बल २७ टक्के घसरण झाली. केवळ विक्रीच नव्हे, तर नवीन घरांचा पुरवठाही कमी झाला. गेल्या वर्षी त्या तुलनेत दुसऱ्या तिमाहीत नवीन घरांच्या पुरवठ्यात २५ टक्के घट झाल्याचे ‘अनारॉक ग्रुप’चा अहवाल दर्शवतो.

घरांच्या मागणीत घट होण्यास प्रामुख्याने किमतीत झालेली वाढ कारणीभूत असून, देशांतर्गत आणि जागतिक पातळीवरील काही घटकही यामागे आहेत. याबाबत ‘अनारॉक ग्रुप’चे अध्यक्ष अनुज पुरी म्हणाले, की भारत-पाकिस्तान युद्ध आणि इस्राईल-इराण युद्धाचा परिणाम गृहनिर्माण बाजारपेठेवर मोठ्या प्रमाणात झाला आहे. युद्धजन्य स्थितीमुळे ग्राहकांकडून घरखरेदीचा निर्णय लांबणीवर टाकला गेला. याच वेळी गेल्या दोन वर्षांत सातत्याने घराच्या किमतीत सुरू असलेली वाढही विक्रीला मारक ठरली आहे. रिझर्व्ह बँकेने केलेल्या व्याजदर कपातीमुळे आगामी काळात घरांच्या मागणीत वाढ होण्याचा अंदाज आहे.

आता कार्यालयीन जागांचा विचार करता त्यात मोठी वाढ होताना दिसत आहे. यंदा पहिल्या सहामाहीत ६८ लाख चौरस फूट कार्यालयीन जागेचे भाडेतत्त्वावरील करार झाले. गेल्या वर्षातील याच कालावधीच्या तुलनेत त्यात ६७ टक्के वाढ अनुभवल्याचे कुशमन ॲण्ड वेकफिल्डच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. यात कार्यालयासाठी नव्याने जागा घेणे, भाडेकराराचे नूतनीकरण यांचा समावेश आहे. कार्यालयीन जागांच्या व्यवहारांमध्ये देशात पुणे हे पहिल्या चार महानगरांमध्ये आहे, असे ‘कुशमन अँड वेकफिल्ड’च्या अहवालातून समोर आले आहे.

अभियांत्रिकी आणि निर्मिती, माहिती तंत्रज्ञान-व्यवसाय प्रक्रिया, कार्यालयीन जागा सहकार्य या क्षेत्रातून कार्यालयीन जागांना मोठी मागणी आहे. एकूण मागणीत त्यांचा वाटा ४६ लाख चौरस फूट आहे. याचबरोबर जागतिक पातळीवर अनेक कंपन्या पुण्यात जागतिक सुविधा केंद्रे सुरू करीत आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून कार्यालयीन जागांना मागणी वाढू लागली आहे. यंदा पहिल्या सहामाहीत एकूण २७ लाख चौरस फूट जागेची मागणी जागतिक सुविधा केंद्राकडून आली. जागतिक सुविधा केंद्रामध्ये बँकिंग, वित्तीय सेवा व विमा क्षेत्र,(बीएफएसआय), अभियांत्रिकी आणि निर्मिती या क्षेत्रांचा वाटा सर्वाधिक आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गेल्या काही वर्षांत पुण्यात कार्यालयीन जागा सहकार्यात मोठी वाढ होत आहे. स्वतंत्र कार्यालयाऐवजी या पर्यायाकडे कल अधिक दिसून येत आहे. देशात कार्यालयीन जागा सहकार्यात बंगळुरू आघाडीवर असून, त्यानंतर पुण्याचा क्रमांक आहे. गेल्या तीन वर्षांपासून पुण्यातील कार्यालयीन जागा सहकार्याची मागणी सरासरी १५ लाख चौरस फूट आहे. शहरातील एकूण कार्यालयीन जागांच्या व्यवहारात हे प्रमाण १९ टक्के आहे. पुण्यातील कार्यालयीन जागांचे व्यवहार यंदा १ कोटी चौरस फुटांचा टप्पा ओलांडतील, असा अंदाज ‘कुशमन अँड वेकफिल्ड’चे पुण्याचे व्यवस्थापकीय संचालक मोईनुद्दीन पटेल यांनी व्यक्त केला आहे.
sanjay.jadhav@expressindia.com