पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार स्वीकारल्यानंतर केलेल्या भाषणात पुण्यातील मनोज पोचट यांचा नामोल्लेख केला. त्यामुळे मनोज पोचट यांच्याविषयी कुतुहल निर्माण झाले. पंतप्रधानांनी उल्लेख केलेले मनोज पोचट हे माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात कार्यरत असून, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक आहेत.

पंतप्रधानांनी भाषणात नाव घेतलेल्या मनोज पोचट यांच्याशी लोकसत्ताने संवाद साधला. ‘२०१३ मध्ये जुलैमध्येच नरेंद्र मोदी पुण्यात फर्ग्युसन महाविद्यालयात विद्यार्थ्यांशी संवाद साधायला आले होते. त्यावेळी त्यांनी देशात विविध क्षेत्रांत ट्रस्ट डेफिशिट म्हणजे विश्वासाची तूट कशी आहे या विषयावर भाष्य केले होते. ती तूट भरून काढण्यासाठी काय करायला हवे ते सुचवा असे त्यावेळी मोदी यांनी तरुणांना आवाहन केले होते. त्यावेळी त्यांनी केलेली पोस्ट व्हायरल झाली होती. त्या कार्यक्रमानंतर मोदी यांचे नाव पंतप्रधान पदासाठी निश्चित झाले. आता दहा वर्षांनी जुलैमध्येच ते पुण्यात येत असल्याने त्या भाषणाचा उल्लेख करून समाजमाध्यमात पोस्ट केली होती. त्यावेळी ट्रस्ट डेफिशिट असलेला देश आता ट्रस्ट सरप्लस झाला आहे. त्यामुळे ट्रस्ट डेफिशिट ते ट्रस्ट सरप्लस या प्रवास मांडण्याबाबत त्या पोस्टमध्ये नमूद केले होते,’ असे पोचट यांनी सांगितले.

हेही वाचा – ‘केसरी’चा पहिला अंक, पुणेरी पगडी व टिळकांसारखं उपरणं, मोदींना दिलेल्या पुरस्काराचं स्वरूप काय?

हेही वाचा – “सर्जिकल स्ट्राईकचे जनक छत्रपती शिवराय होते, कारण..”; शरद पवारांनी सांगितला इतिहासातला ‘तो’ प्रसंग

माझी पोस्ट पंतप्रधानांपर्यंत पोहोचणे, त्यांनी त्याची दखल घेणे ही तंत्रज्ञानाची शक्ती आहे. माझ्यासारख्या सर्वसामान्याचा उल्लेख पंतप्रधानांनी त्यांच्या भाषणात करणे ही माझ्यासाठी अत्यंत अभिमानास्पद गोष्ट आहे, अशी भावना आहे. मीही संघ स्वयंसेवक आहे. माझा आणि पंतप्रधानांचा परिचय नाही. मात्र त्यांनी माझा नामोल्लेख केल्याने अतीव आनंद झाला आहे, अशा शब्दांत पोचट यांनी त्यांची भावना व्यक्त केली. करोना काळात पोचट यांनी सामाजिक कामाच्या माध्यमातून महत्त्वपूर्ण योगदान दिले होते.