पुणे : चारित्र्याचा संशय घेणाऱ्या पतीचा पत्नीने मुलाच्या मदतीने खून केल्याची धक्कादायक घटना कात्रज भागात घडली. पतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा बनाव भारती विद्यापीठ पोलिसांनी उघड केला. शालन प्रकाश जाधव (वय ४०, रा. लक्ष्मीमाता मंदिराजवळ, कात्रज) असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. प्रकाश किसन जाधव (वय ४२) असे खून झालेल्याचे नाव आहे.


या प्रकरणात जाधव यांच्या सतरा वर्षीय मुलाला ताब्यात घेण्यात आले आहे. प्रकाश जाधव पत्नी शालनच्या चारित्र्याचा संशय घेत होते. या कारणावरून त्यांच्यात वाद व्हायचे. चार दिवसांपूर्वी प्रकाश यांचा मृतदेह लक्ष्मीमाता मंदिराजवळ असलेल्या खांबावर गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला होता.


भारती विद्यापीठ पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. प्रकाश यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रूग्णालयात पाठविण्यात आला होता. त्यांचा गळा दाबण्यात आला. तसेच डोक्यावर कठीण वस्तूने प्रहार करण्यात आल्याचे शवविच्छेदन अहवालात नमूद करण्यात आले होते. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल केला होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.


वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू करण्यात आला. जाधव यांची पत्नी शालन आणि मुलाची चौकशी करण्यात आली. चौकशीत दोघांनी प्रकाश यांना मारहाण करून त्यांचा खून केल्याचे उघड झाले. प्रकाश यांनी आत्महत्या केल्याचा बनाव त्यांनी रचल्याचे उघडकीस आले.