पुणे : लोकसभा निवडणुकीपाठोपाठ विधानसभा निवडणुकीतही पराभव पत्करावा लागलेले काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर शिवसेनेच्या ( शिंदे) वाटेवर असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यातच पुणे दौ-यावर आलेले शिवसेना नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची धंगेकर यांनी भेट घेतल्याने या धंगेकर यांच्या पक्ष प्रवेशालीही बळ मिळाले आहे. धंगेकर यांचा शिवसेनेत प्रवेश झाल्यास काँग्रेसची शहरातील ताकद कमकुवत होण्याची शक्यता आहे.

धंगेकर यांनी अडीच वर्षांपूर्वी झालेल्या कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपच्या बालेकिल्ल्यात धक्कादायक विजयाची नोंद केली होती. धंगेकर यांनी कसब्याचे विद्यमान आमदार हेमंत रासने यांचा पराभव केला होता. त्यानंतर त्यांनी काँग्रेसकडून लोकसभा निवडणूक लढविली होती. मात्र भाजपचे उमेदवार केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी त्यांना पराभूत केल्यानंतर ऑक्टोबर महिन्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीतही धंगेकर यांना हेमंत रासने यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला होता. मूळचे शिवसैनिक असलेल्या धंगेकर महापालिका निवडणुकीवेळी काँग्रेसचे पुरस्कृत उमेदवार होते.महापालिका निवडणुकीतील विजयानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.

भाजपच्या बालेकिल्ल्यातील विजयानंतर काँग्रेसला ‘जवळचे’ झालेले रवींद्र धंगेकर सलग दोन पराभवानंतर काँग्रेसपासून ‘अंतरावर’ गेले होते. त्यामुळे धंगेकर स्वत:च काँग्रेसला अंतर देणार, की काँग्रेस त्यांच्यापासून अंतर राखणार, असा प्रश्न शहराच्या राजकीय वर्तुळात चर्चिला जाण्यास सुरूवात झाली होती. काँग्रेसमध्ये असूनही कधी शिवसेना कार्यकर्त्याच्या, तर कधी ‘मनसे’ शैलीप्रमाणे ‘खळ्ळखट्याक’च्या भूमिकेत धंगेकर वावरत असल्याची काँग्रेस कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी सातत्याने तक्रारी केल्या होत्या.

आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धंगेकर काँग्रेस पासून फारकत घेणार असल्याची चर्चा शहरात गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. राजकीय गणिते लक्षात घेऊन ते शिवसेनेत ( शिंदे) जातील अशी शक्यताही व्यक्त होत हाेती. त्यातच त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याने धंगेकरांच्या पक्ष प्रवेशालाही जोर मिळाला आहे. त्यांचा लवकरच प्रवेश होईल अशी चर्चाही राजकीय वर्तुळात आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान पक्ष प्रवेशाच्या चर्चेचे धंगेकर यांनी खंडन केले आहे. वैयक्तिक कामासंदर्भात शिंदे यांना भेटलो होतो. या भेटीचा पक्ष प्रवेशाशी संबंध नाही. मी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही भेटू शकतो. मी काँग्रेसमध्येच असून शिवसेनेत जाणार नाही असे धंगेकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.