पुणे : पुणे-बंगळुरू महामार्गावरील नवले पुलाजवळ असलेल्या स्वामी नारायण मंदिर येथे ट्रक आणि ट्रॅव्हल बसचा आज मध्यरात्री भीषण अपघात झाला. या घटनेमध्ये एकूण चौघांचा जागीच मृत्यू झाला असून, २१ जण जखमी झाले आहेत. ट्रकचा ब्रेक फेल झाल्याने अपघात झाला असावा, अशी शक्यता राष्ट्रवादी पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली.

“नवले पूल येथील अपघाताच्या घटनेबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशीदेखील चर्चा करणार”, असे खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले. खासदार सुप्रिया सुळे यांनी स्वामी नारायण मंदिर परिसरात ट्रक आणि ट्रॅव्हल बसचा अपघात झालेल्या ठिकाणी भेट दिली. त्यानंतर त्या प्रसार माध्यमांशी बोलल्या.

हेही वाचा – VIDEO: गोष्ट पुण्याची-भाग ७७ : इ. स. पूर्व १२०० व्या शतकातील पांडवकालीन ‘बाणेश्वर लेणी’

सुप्रिया सुळे म्हणाल्या की, या मार्गावर मागील चार महिन्यांपूर्वीदेखील अपघात झाला होता. या मार्गावर अपघात होऊ नये यासाठी उपाययोजना करण्यात आल्या आहेत. आपल्याला आणखी काय करता येईल याबाबत प्रशासनाने अहवाल द्यावा, तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशीदेखील चर्चा करणार, असे त्या म्हणाल्या. त्याचबरोबर, वाढत्या अपघातांची संख्या लक्षात घेता आपण सर्वांनी रोड सेफ्टीकडे गांभीर्याने पाहण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले.

महाराष्ट्रामध्ये गुंडागर्दी चालणार नाही – सुप्रिया सुळे

सत्तेत असलेला एक आमदार दगड मारायची भाषा करित आहे. हा गंभीर विषय असून याबाबत मी संसदेत निश्चित भूमिका मांडणार आहे. त्यावर राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी भूमिका मांडली पाहिजे. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. पण राज्यातील एखादा नेता एखाद्या ठिकाणी सभेसाठी जात असेल तर त्यात गैर काय? आम्ही त्याच्यावर दगड मारू, अशी भाषा सत्तेतील आमदार करीत आहे. महाराष्ट्रामध्ये गुंडागर्दी चालणार नाही आणि मी त्याचा निषेध व्यक्त करते, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मंत्री गुलाबराव पाटील यांच्या विधानाचा खरपूस समाचार घेतला. तसेच, ही बाब मी देशाचे गृहमंत्री अमित शाह यांच्या निदर्शनास आणून देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

हेही वाचा – पिंपरी महापालिकेने नऊ वॉशिंग सेंटरचे बेकायदा नळजोड तोडले

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे ठाकरे गटाचे प्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज सभा होणार आहे. त्या सभेवरून मोठ्या प्रमाणावर राजकारण पाहण्यास मिळत असून, शिवसेनेचे मंत्री आणि जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सभेवर दगड मारण्याची भाषा केली आहे. त्या प्रश्नावर सुप्रिया सुळे यांनी सदर भूमिका मांडली.