िपपरी महापालिकेच्या वतीने महिला दिनाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या विशेष कार्यक्रमास महापौर शकुंतला धराडे, पक्षनेत्या मंगला कदम यांच्यासह अन्य महिला पदाधिकारी व नगरसेविकांनी पाठ फिरवली. यामुळे महिला कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरल्याचे दिसून आले.
पालिकेत २५ वर्षे सेवा केलेल्या ६५ महिलांचा सत्कार महिला दिनी महापौरांच्या हस्ते होणार होता. चिंचवडच्या रामकृष्ण मोरे नाटय़गृहात होणाऱ्या या कार्यक्रमासाठी सकाळपासूनच महिला कर्मचाऱ्यांनी गर्दी केली होती. मात्र, सर्वपक्षीय महिला पदाधिकाऱ्यांनी त्याकडे पाठ फिरवली. बरीच वाट पाहिल्यानंतर साडेअकरा वाजता कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. महिला व बालकल्याण समितीच्या सभापती गीता मंचरकर, सहायक आयुक्त प्रशांत खांडकेकर, कामगार कल्याण अधिकारी चंद्रकांत इंदलकर, आशा दुर्गुडे आणि अवघ्या दोन नगरसेविका तेव्हा उपस्थित होत्या.
िपपरी महापालिकेत ६५ नगरसेविका आहेत. बहुतांश महत्त्वाच्या पदावर महिलाच पदाधिकारी आहेत. मात्र, त्यापैकी कोणीही महिला दिनाच्या या कार्यक्रमाकडे फिरकले नाही. केवळ सत्ताधारीच नव्हे तर विरोधी पक्षाच्या महिला पदाधिकाऱ्यांनीही पाठ फिरवली. मुंबईला होणाऱ्या एका महत्त्वाच्या बैठकीसाठी महापौरांना व आयुक्तांना जावे लागले, त्यामुळे ते कार्यक्रमाला नाहीत, असा खुलासा आयोजकांनी केला. आपले प्रमुखच कार्यक्रमाला नाहीत, हे स्पष्ट झाल्याने उपस्थित महिला कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली. दरम्यान, यावेळी केंद्रीय उत्पादन शुल्क विभागाच्या उपायुक्त वैशाली पतंगे यांचे व्याख्यान झाले. तसेच, नागरवस्ती विभागाच्या वतीने देण्यात येणाऱ्या धनादेशांचे प्रातिनिधीक वाटप करण्यात आले. प्रास्ताविक खांडकेकर यांनी केले. सूत्रसंचालन चारुशीला जोशी यांनी केले. चंद्रकांत इंदलकर यांनी आभार मानले.
संग्रहित लेख, दिनांक 9th Mar 2016 रोजी प्रकाशित
महिला दिन कार्यक्रमास महापौरांसह महिला लोकप्रतिनिधींचीच दांडी
महिला दिनाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमास महापौर शकुंतला धराडे, पक्षनेत्या मंगला कदम यांच्यासह अन्य पदाधिकारी व नगरसेविकांनी पाठ फिरवली.
Written by लोकसत्ता टीम
First published on: 09-03-2016 at 02:49 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Womans day representative absent