पिंपरी : निगडी येथील त्रिवेणीनगरमार्गे नाशिक महामार्ग, तसेच जुन्या पुणे-मुंबई महामार्गाला जोडणाऱ्या पर्यायी (मिसिंग लिंक) रस्त्याचे काम पूर्णत्वाकडे आले आहे. तात्पुरत्या स्वरूपात हा रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. या दोन्ही महामार्गांसह मुंबई-बंगळुरू महामार्ग (देहूरोड-कात्रज बाह्यवळण मार्ग) आणि मुंबई-पुणे महामार्गही जोडला जाणार आहे. त्यामुळे वाहतुकीची कोंडी सुटणार आहे.निगडीतील भक्ती-शक्ती चौकातून नाशिक महामार्गाला जोडणाऱ्या ५५० मीटर लांबी असलेल्या या रस्त्याचे काम भूसंपादनाअभावी रखडले होते. पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाकडील विशेष भूसंपादन विभागाने संबंधित जागेचा ताबा हस्तांतरित केल्यानंतर रस्त्याचे काम तातडीने हाती घेण्यात आले. सध्या या प्रकल्पाचे ८० टक्के काम पूर्ण झाले असून, एकूण ४५० मीटर लांबीचा रस्ता विकसित करण्यात आला आहे. दोन्ही बाजूंना प्रत्येकी तीन अशा एकूण सहा मार्गिकांचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित आनुषंगिक कामे वेगाने सुरू आहेत.

मंजूर विकास आराखड्यानुसार हा रस्ता ७५ मीटर रुंद असून, सद्य:स्थितीत ३७ मीटर रुंद रस्ता विकसित करण्यात आला आहे. दोन्ही बाजूंस १२ मीटर रुंद तीन मार्गिका आहेत. मध्यभागी नऊ मीटर रुंदीचा उच्च क्षमतेचा ‘मास ट्रान्झिट’ मार्ग असणार आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूंस दोन मीटर रुंदीचे ‘पेव्ह शोल्डर’ असणार आहेत. पहिल्या टप्प्यामध्ये दुहेरी मार्गाचे २७० मीटर लांबीच्या रस्त्याचे डांबरीकरणाचे काम पूर्ण करण्यात आले आहे. ५५० मीटर लांबी असलेल्या या रस्त्यातील मंजूर विकास आराखड्यातील ४५० मीटर रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे.

अवजड वाहनांची वाहतूक कमी

या प्रकल्पामुळे निगडी येथील भक्ती-शक्ती चौकातून पुणे-नाशिक आणि मुंबई-पुणे महामार्गाशी होणारे दळणवळण सुधारण्यास मदत होईल. मुख्य रस्त्यांवरील अवजड वाहनांची वाहतूक कमी होणार असल्याने प्रवासाचा वेळ व इंधन बचतीस मदत होईल. हा रस्ता तळवडे संगणकीय औद्योगिक केंद्रमार्गे चाकण एमआयडीसीला जोडण्यात महत्त्वाचा दुवा म्हणून काम करणार आहे. जलनिःसारण, पावसाळी पाण्याचा निचरा त्वरित होऊन प्रदूषण कमी होईल, असा महापालिकेचा दावा आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्रिवेणीनगरमार्गे नाशिक महामार्गाला जोडणाऱ्या रस्त्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. नागरिकांच्या सोयीसाठी तात्पुरत्या स्वरूपात हा रस्ता खुला करण्यात आला आहे. उर्वरित कामे जलद गतीने सुरू असून, लवकरच हा रस्ता पूर्ण क्षमतेने वापरासाठी उपलब्ध होईल, असे पिंपरी-चिंचवड महापालिकेचे मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे यांनी सांगितले.