पुणे शहरात मागील काही दिवसांपासून करोना विषाणूचे रुग्ण वाढत आहे. आज दिवसभरात २०८ रुग्ण आढळले. तर त्याचदरम्यान सात रुग्णांचा मृत्यू झाला आहे, आरोग्य विभागामार्फत ही माहिती देण्यात आली.

देशभरात करोना विषाणूच्या रुग्णांची संख्या एक लाख १० हजाराच्या पुढे गेली आहे. देशभरात दररोज दोन हजाराहून अधिक रुग्ण वाढत आहेत. पुण्यात देखील रुग्ण संख्या दिवसेंदिवस वाढत असून आज नव्याने २०८ रुग्ण आढळले आहेत. यामुळे ४ हजार १०७ एवढी रुग्णसंख्या झाली आहे. त्याचदरम्यान आज दिवसभरात सात रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे आज अखेर २२७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

तसेच उपचार घेतलेल्या १५९ रुग्णांची पुन्हा टेस्ट घेण्यात आली. त्यामध्ये त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने, त्या सर्वांना घरी सोडण्यात आले आहे. आज अखेर दोन हजार १८२ रुग्ण करोनामुक्त झाल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र, वाढती रुग्णसंख्या आणि मृतांची वाढ ही पुणेकरांच्या दृष्टीने चिंतेची बाब ठरली आहे.

पिंपरी-चिंचवडमध्ये करोनाच्या रुग्णांनी केला अडीचशेचा टप्पा पार

पिंपरी-चिंचवड शहरात करोना विषाणूने अडीचशेचा टप्पा पार केला असून दिवसभरात १२ करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे शहरातील बाधितांची संख्या २५२ वर पोहचली आहे. तर चार करोनामुक्त व्यक्तींना आज डिस्चार्ज देण्यात आला आहे. शहरातील बरे झालेल्या व्यक्तींची संख्या १४२ वर पोहचली आहे. आज पॉझिटिव्ह आलेले रुग्ण हे चिंचवड स्टेशन, दिघी, पिंपळे सौदागर, वाल्हेकरवाडी, पिंपरी, मुंबई या परिसरातील आहेत.