यशवंत सिन्हा यांचा केंद्र सरकारला इशारा

पुणे : नागरिकत्व नोंदणी आणि सुधारित  नागरिकत्व कायद्याद्वारे धार्मिक आधारावर देशाची पुन्हा फाळणी करण्याचा घाट घातला जात आहे. हा काळा कायदा त्वरित रद्द करावा, अशी आमची मागणी आहे. सरकारने हा कायदा मागे न घेतल्यास आंदोलन तीव्र केले जाईल, असा इशारा माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा यांनी गुरुवारी दिला. राज्यघटनेचे रक्षण, एकतेचा संदेश, गांधीजींची पुन्हा हत्या होऊ  न देणे यासाठी गांधी शांती यात्रा सुरू केल्याचे त्यांनी सांगितले.

सिन्हा यांच्या नेतृत्वाखाली मुंबईच्या गेट वे ऑफ इंडिया येथून सुरुवात झालेली गांधी शांती यात्रा सायंकाळी कोथरूड येथील गांधी भवन येथे पोहोचली. महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष डॉ. कुमार सप्तर्षी, अन्वर राजन, शिवाजीराव कदम, अभय छाजेड यांनी यात्रेचे स्वागत केले. त्यानंतर सिन्हा यांच्यासह ज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हा, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि माजी आमदार आशिष देशमुख यांनी पत्रकार परिषदेत भूमिका स्पष्ट केली.

सिन्हा म्हणाले, देशात प्रचंड अशांतता आणि अस्वस्थता आहे. सुधारित नागरिकत्व कायद्याच्या विरोधात ठिकठिकाणी लोक रस्त्यावर उतरले आहेत. युवा वर्गही आंदोलनात सक्रिय असून विद्यापीठे ही आंदोलनाची केंद्र बनली आहेत. अशा परिस्थितीत भाजपशासित राज्यांमध्ये हे शांततेच्या मार्गाने होणारे आंदोलन दडपले जात आहे, ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या निर्णयांमुळे देशात आधीच भीतीदायक वातावरण आहे. सुधारित नागरिकत्व कायद्यामुळे तसेच त्यानंतरच्या हिंसाचारामुळे या भीतीत भर पडली आहे. जवाहरलाल नेहरू विद्यापीठात झालेल्या मारहाणीची निष्पक्ष चौकशी करून संबंधितांना कडक शासन केले पाहिजे. यात्रेच्या शुभारंभाला जमलेल्या हजारो नागरिकांच्या उपस्थितीने देशाची जनता आजही गांधीजींसोबत आहे, हे सिद्ध केले. चव्हाण म्हणाले, जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थ्यांवरील हल्ला हा सामान्य जनतेवरील हल्ला आहे. देशाची राज्यघटनाच धोक्यात आली आहे. या कायद्यांच्या आधारे सरकार जातीय राजकारण करू पाहत आहे. मात्र, विद्यार्थी रस्त्यावर उतरताना पाहून आपले प्रयत्न अयशस्वी होत असल्याच्या भावनेतून सरकार दडपशाही करत आहे. प्रतिभावंतांची खाण असलेल्या विद्यापीठावरील हल्ला राजाश्रय असल्याशिवाय झालेला नाही. त्याला कुलगुरूंची संमती होती.

मोदी आणि शहा यांच्या अहंकारामुळेच केंद्र सरकार मदमस्त हत्ती बनले आहे, अशा शब्दांत शत्रुघ्न सिन्हा यांनी सरकारवर निशाणा साधला. आपण मनमानी कायदे करू शकतो, असे त्यांना वाटते. या कायद्यांविरोधात देश एकवटला आहे. युवक एकत्र आले आहेत. त्यामुळे ही ‘जेपीं’ची (जयप्रकाश नारायण) चळवळ असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तम अभिनेते असून त्यांच्या भाषणात आता दम राहिलेला नाही.

कुलगुरूंच्या नियुक्त्या रद्द कराव्यात

राज्यातील बहुतांश विद्यापीठांचे कुलगुरू, प्र-कुलगुरु आणि अधिकार मंडळांवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ विचारांच्या व्यक्तींच्या झालेल्या नियुक्त्या रद्द कराव्यात, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली असल्याचे आशिष देशमुख यांनी सांगितले.