दुरुस्ती आणि नूतनीकरणामुळे रूप पालटलेले यशवंतराव चव्हाण नाटय़गृह शनिवारपासून (१६ मे) रसिकांच्या सेवेत दाखल होत आहे. नाटय़गृहाचे उद्घाटन झाल्यानंतर १५ वर्षांत प्रथमच दुरुस्तीच्या कामासाठी तब्बल साडेचार महिने नाटय़गृह बंद ठेवण्यात आले होते. मात्र, महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून १ मे रोजी नाटय़गृह सुरू करण्याची तारीख पाळता आलेली नाही.
पुण्यातील झपाटय़ाने विकसित झालेले उपनगर म्हणून कोथरूडचा गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये समावेश झाला आहे. या भागातील सुसंस्कृत नागरिकांच्या मनोरंजनासाठी नाटय़गृह असावे ही नागरिकांची मागणी पूर्ण करण्यात आली. आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण नाटय़गृह असे या या नव्या नाटय़गृहाचे नामकरण करण्यात आले. कोथरूड-कर्वेनगर, वारजे परिसरातील नाटय़प्रेमी रसिकांसाठी ही पर्वणी झाल्यामुळे हे नाटय़गृह चांगले चालले आणि रंगकर्मीनाही या ठिकाणी प्रयोग करण्यामध्ये समाधान लाभले.
नाटय़गृहातील विविध असुविधांबाबत प्रेक्षक आणि कलाकारांकडून सातत्याने तक्रारी केल्या जात होत्या. त्यामुळे दुरुस्ती आणि नूतनीकरणाच्या कामासाठी महापालिकेने एक जानेवारीपासून नाटय़गृह बंद केले होते. प्रेक्षागृहातील खालच्या आणि बाल्कनीतील खुच्र्या बदलण्यात आल्या आहेत. फॉल सििलग करण्यात आले आहे. स्वच्छतागृह नव्याने बांधण्यात आले असून प्रेक्षकांसाठी पिण्याच्या पाण्यासाठी कूलरची सोय करण्यात आली आहे. हे दुरुस्तीचे काम १ मेपूर्वी पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून नाटय़गृह पुन्हा सुरू करण्याचे निश्चित झाले होते. मात्र, नाटय़गृह सुरू झाल्यापासून १५ वर्षांतील पहिल्याच दुरुस्ती कामासाठी एवढा काळ बंद ठेवण्यात आले होते. दुरुस्तीच्या सर्व कामांची पूर्तता होऊन आता १५ दिवसांनंतर या नाटय़गृहामध्ये तिसरी घंटा वाजणार आहे. नाटय़प्रयोगासाठी संस्थांकडून अर्ज मागविण्यात आले असून चौमाही वाटपानुसार शनिवारपासून या नाटय़गृहामध्ये नियमित प्रयोग रंगणार आहेत.
नाटय़गृहाच्या पार्किंगमध्ये बाळासाहेब ठाकरे मिनी थिएटर साकारण्यात येत आहे. त्यामुळे आता नाटय़गृहामध्ये प्रवेश करण्यासाठी पहिल्या प्रवेशद्वाराचा वापर करण्यात येणार आहे. चारचाकी वाहनांसाठी नाटय़गृहाचे सौंदर्य वाढविणारे कारंजे काढून टाकण्यात आले आहे. ती जागा पार्किंगसाठी राखून ठेवण्यात येणार आहे. तर, नाटय़गृहाच्या पाठीमागील जागा ही दुचाकी वाहने लावण्यासाठी ठेवण्यात आली आहे. नाटय़गृहाच्या दुरुस्ती आणि नूतनीकरणासाठी ७० लाख रुपयांची निविदा काढण्यात आली होती, अशी माहिती महापालिका भवन विभागातील विश्वसनीय सूत्रांनी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Yashwantrao chavan natyagruha renovation open
First published on: 13-05-2015 at 03:15 IST