पुणे : आर्थिक विकास आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यांवर केंद्र सरकार अपयशी ठरले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत:ला ‘हिंदू हृदयसम्राट’ म्हणवून घेत त्यांनी श्रीराम मंदिर, हिंदुत्त्वाचा मुद्दा पुढे आणला आहे. परंतु, गेल्या दहा वर्षांत रोजगार न मिळालेले मंदिराने कसे संतुष्ट होतील, असा सवाल काँग्रेसचे खासदार डॉ. शशी थरूर यांनी उपस्थित केला.

महाविकास आघाडीतर्फे काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारार्थ युवक काँग्रेसतर्फे आयोजित ‘युवा संवाद’ कार्यक्रमात डॉ. थरूर बोलत होते. काँग्रेसचे सरचिटणीस आशिष दुआ, ज्येष्ठ नेते उल्हास पवार, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस अभय छाजेड, चिटणीस संजय बालगुडे, प्रवक्ते गोपाळ तिवारी, ‘एनएसयूआय’चे अक्षय जैन या वेळी उपस्थित होते. संग्राम खोपडे यांनी डॉ. थरूर यांच्याशी संवाद साधला. आर्थिक विकास, राष्ट्रीय सुरक्षा, परराष्ट्र धोरण, हिंदुत्त्व, शिक्षण अशा मुद्द्यांवर डॉ. थरूर यांनी केंद्र सरकारवर टीका केली.

हेही वाचा – शरद पवार यांच्या प्रकृती अस्वस्थतेमुळे सोमवारचे सर्व कार्यक्रम रद्द

डॉ. थरूर म्हणाले, की २०१४ मध्ये विकासाच्या मुद्द्यावर सत्तेत आलेल्या मोदी सरकारच्या नोटबंदीमुळे छोटे उद्योग उद्ध्वस्त झाले. जीएसटीचा व्यावसायिकांना फटका बसला. २०१९ च्या निवडणुकीत विकासाचा मुद्दा बाजूला ठेवून पुलवामा हल्ल्यानंतर राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यावर मते मागितली. गेल्या दहा वर्षांत विकास झाला नाही, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट झाले नाही, पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढल्या, इंधनावरील कर वाढला, महागाई वाढली, रोजगार निर्माण झाले नाहीत. चीनही सीमेवर दबा धरून बसला आहे. त्यामुळे आता हिंदुत्व आणि श्रीराम मंदिराच्या नावाने मोदी मते मागण्याची वेळ भाजपवर आली आहे. मोदी सरकारमुळे केवळ श्रीमंतच आनंदात असून, सर्वसामान्यांची परिस्थिती खालावत आहे. त्यामुळेच या सरकारविरोधात वातावरण आहे.

हेही वाचा – पिंपरी: श्रीरंग बारणेंसाठी अभिनेता गोविंदा सरसावला! केला बारणेंचा प्रचार

व्हीव्हीपॅट यंत्रांची संख्या वाढवण्याची गरज

इलेक्ट्रॉनिक मतयंत्रांमध्ये फेरफार झाल्याचे पुरावे नाहीत, पुन्हा मतपत्रिकांवर मतदान घेणे हे मागे नेणारे पाऊल असल्याचे सांगत थरूर यांनी ‘ईव्हीएम’वर शंका घेणाऱ्या काँग्रेसच्या नेत्यांना घरचा आहेर दिला. ‘व्हीव्हीपॅट’ यंत्रांची संख्या वाढवण्याची मागणी त्यांनी केली.