शहरातील रस्त्यांचे डांबरीकरण तसेच केबलच्या कामांसाठी खोदलेल्या रस्त्यांची दुरुस्ती आदी कामे ऐंशी ते नव्वद टक्के पूर्ण झाल्याचा दावा महापालिकेकडून केला जात असला, तरी जागोजागी नागरिकांना दिसणारे चित्र मात्र वेगळेच आहे. अनेक रस्त्यांच्या डांबरीकरणाची कामे दूरच, काही रस्ते खणण्याची कामे अजूनही सुरू असल्याचे चित्र शहरात दिसत आहे. राडारोडा उचलण्याची कामे तर ठेकेदारांनी अजिबात केलेली नाहीत.
शहरात दरवर्षी पावसाळ्यामध्ये रस्त्यांचा विषय गाजतो. रस्त्यांचे आवश्यक तेथे डांबरीकरण आणि योग्य पद्धतीने दुरुस्ती ही कामे गेले दोन महिने शहरात सुरू होती आणि ती आता पूर्ण झाल्याचे सांगितले जात असले, तरी शहरातील चित्र मात्र वेगळे आहे. ठेकेदारांनी कामे करताना घाईगर्दीने कामे केल्याचे जागोजागी दिसत असून रस्त्यांवर डांबर व खडीचा एकच थर अनेक ठिकाणी देण्यात आला आहे. रस्त्यांचे पूर्ण डांबरीकरण होणे आवश्यक असताना त्या पद्धतीची कामे करण्यात आलेली नाहीत. त्यामुळे प्रशासनाकडून कामे पूर्ण होत आल्याचा दावा करण्यात येत असला, तरी केवळ कामे झाल्याचे दाखवण्यासाठीच ती घाईने पूर्ण करण्यात आली आहेत.
शहरात रस्ते खोदाईला पूर्णत: बंदी करण्यात आली असली, तरी रस्ते खोदाई अनेक ठिकाणी सुरू आहे. पूर्वी ती दिवसा केली जात होती. बंदी घालण्यात आल्यानंतर हीच कामे आता रात्री केली जात आहेत. रस्ते खोदाई झाल्यानंतर ज्या कारणासाठी रस्ता खोदला गेला असेल, ते काम करण्यासही विलंब होत आहे. रस्त्यांची तसेच अन्य कामे झाल्यानंतर जो राडारोडा निघाला आहे तो उचलण्याची कामेही ठेकेदारांना देण्यात आली असली, तरी शहरातील अनेक चौकांमध्ये आणि रस्त्यांच्या कडेला राडारोडा पडून आहे. वास्तविक सर्व राडारोडा उचलण्यासाठी जी ३१ मे पर्यंतची मुदत देण्यात आली होती ती संपली असली, तरी या कामाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Yet to complete premonsoon works
First published on: 06-06-2015 at 03:30 IST