पुणे : सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या आवारात एका विद्यार्थ्याला मारहाण करण्यात आल्याची घटना घडली. अन्य धर्मातील तरुणीशी केलेली मैत्री त्याने तोडावी म्हणून मारहाण करण्यात आल्याचा आरोप तरुणाने केला आहे. याबाबत तरुणाने विद्यापीठाच्या वसतिगृह प्रमुखांकडे लेखी तक्रार दिली आहे. मात्र, याप्रकरणी अद्याप गुन्हा दाखल करण्यात आला नाही.

विद्यार्थ्याने दिलेल्या तक्रारीनुसार, संबंधित तरुण विद्यापीठातील कौशल्य विकास केंद्राचा विद्यार्थी आहे. तो आणि त्याची मैत्रीण विद्यापीठातील उपहारगृहातून निघाले होते. त्या वेळी दुचाकीवरून आलेल्या दहा ते बाराजणांनी विद्यार्थ्याला अडवले. त्यांनी आपण एका हिंदुत्ववादी संघटनेचे कार्यकर्ते आहोत, असे त्यांनी सांगितले. विद्यार्थी आणि त्याच्या मैत्रिणीकडे त्यांनी आधारकार्ड मागितले. दोघांच्या धर्मांबाबत त्यांनी विचारणा केली. त्यानंतर तू लव्ह जिहाद करतोस का, असा तरुणावर आरोप करून, कार्यकर्त्यांनी तरुणीला बाजूला नेले आणि लव्ह जिहादबाबत तिचे समुपदेशन केले. तरुणाला धमकावून त्याच्या कुटुंबीयांच्या मोबाइल क्रमांकावर कार्यकर्त्यांनी संपर्क साधला. तुमच्या मुलाला घेऊन जा, असे त्यांनी तरुणाच्या वडिलांना सांगितले. त्यानंतर कार्यकर्त्यांनी तरुणाला बेदम मारहाण केली.

हेही वाचा – ‘कॅशलेस’ आरोग्य विम्याला डॉक्टरांचा विरोधच! जाणून घ्या कारणे…

हेही वाचा – बलिदान दिनानिमित्त ज्योत घेऊन निघालेल्या तरुणांना ट्रकची धडक; एकाचा मृत्यू, तिघे जखमी

‘मला धमकावून वसतिगृहावर नेले. कपडे भरून निघून जा. परत येथे दिसता कामा नये,’ अशी धमकी कार्यकर्त्यांनी दिली, असा आरोपही तरुणाने वसतिगृहप्रमुखांकडे दिलेल्या तक्रारीत केला आहे. दरम्यान, या प्रकाराची चौकशी करून कारवाई करण्यात येईल, असे विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. सुरेश गोसावी यांनी स्पष्ट केले.