लायन्स पॉइंट येथील दरीच्या तोंडावर सेल्फी काढताना पाय घसरून दरीत पडल्याने एका पंचवीस वर्षीय युवकाचा शनिवारी मृत्यू झाला. दुपारी सव्वादोनच्या सुमारास ही घटना घडली. अॅग्नेल सिरिल पेरिस (वय २५, रा. कलिना, ठाणे) असे या मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. कलिना, ठाणे येथील चार तरुण शनिवारी दुपारी लोणावळ्यातील लायन्स पॉइंट येथे पर्यटनासाठी आले होते. ते दुपारी सव्वादोनच्या सुमारास सुरक्षा कठडा ओलांडून दरीच्या तोंडावर धोकादायक रीत्या सेल्फी काढत होते.
मात्र सेल्फी काढण्याच्या नादात अॅग्नेल याचा पाय घसरून तोल गेल्याने तो दरीत जवळपास अडीचशे फूट खोल पडल्याने त्याचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर लोणावळा ग्रामीण पोलीस व शिवदुर्ग मित्र अॅडव्हेंचर क्लबचे सदस्य सुनील गायकवाड, अजय राऊत, राजेंद्र कडू, ब्रिजेस ठाकूर, प्रणय अंभोरे, रोहित वर्तक, योगेश उंबरे, वैभव राऊत, अनुराग यादव, अजय शेलार, विकी मावकर, मधुर मुंगसे, महेश म्हसणे, कपिल दळवी घटनास्थळी पोहोचले. शिवदुर्गच्या सदस्यांनी दोराच्या साहाय्याने दरीत उतरत शोध घेतला.
त्या वेळी अॅग्नेलचा मृतदेह आढळला. या प्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलीस अधिक तपास करत आहेत.