रोजच्या रोज एसएमएस, ट्विटर आणि बाकीच्या सोशल नेटवर्किंग साईट्सवर मजकूर टाकताना वापरली जाणारी शब्दांची लघुरूपे आता शाळा-महाविद्यालयांच्या उत्तरपत्रिकांमध्येही दिसून येत आहेत.. विद्यार्थ्यांच्या या नव्या भाषेमुळे शिक्षक मात्र हैराण झाले आहेत.
एकाच एसएमएसवर खूप सारा मजकूर कमीतकमी अक्षरांमध्ये टाकण्याच्या गरजेतून इंग्लिशची एसएमएसची एक स्वतंत्र परिभाषा तयार झाली. इंग्लिशमध्ये नेहमी वापरण्यात येणाऱ्या शब्दांची लघुरुपे तयार झाली आणि अल्पावधीत ती प्रचलितही झाली. त्यानंतर सोशल नेटवर्किंग साईट्सनी यामध्ये आणखी भर घातली. आता शब्दांची ही नवी रूपे इतकी अंगवळणी पडली आहेत की त्याचे प्रतििबब विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकांमध्येही दिसू लागले आहे. सध्या एसएमएस लँग्वेजमध्ये लिहिलेल्या उत्तरपत्रिका समूजन घेताना शिक्षकांनाच नव्या परीक्षेला सामोरे जावे लागत आहे.
एसएमएस परिभाषेमध्ये यू, युवर, अॅम, गुड, गिव्ह, देअर, द, बिकॉझ, बी, विल, व्हॉट, व्हेअर, व्हेन, व्हाय, देम, दॅट, हॅव, हॅड, नो, विथ या शब्दांची लघुरूपे प्रामुख्याने वापरलेली दिसतात. एसएमएसमध्ये अंक आणि अक्षर मिळून तयार करण्यात आलेले फ्रॉम, फॉर, बीफोर यांसारख्या शब्दांचा वापर मात्र दिसत नाही. अगदी दहावी, बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेतही अशा प्रकारे लिहिलेल्या उत्तरपत्रिका आढळून येत असल्याचे काही परीक्षकांनी सांगितले. भाषेतर विषयांमध्ये या परिभाषेचा वापर अधिक दिसून येत असल्याचे निरीक्षण शिक्षकांनी नोंदवले आहे. विद्यार्थ्यांच्या या नव्या भाषेमुळे शिक्षक मात्र आता हैराण झाले आहेत. अनेकदा विद्यार्थ्यांना विषय कळलेला असतो, त्यांनी उत्तरामध्ये मुद्दाही मांडलेला असतो, व्याकरणदृष्टय़ा वाक्यरचनाही बरोबर असते. मात्र, शब्दांच्या लघुरूपांमुळे विद्यार्थ्यांना गुण द्यायचे की नाही असा प्रश्न शिक्षकांना पडला आहे.
‘गुणांवर विशेष फरक नाही’
भाषेतर विषयांमध्ये वाक्याचा अर्थ कळत असेल, पण शब्दाचे स्पेलिंग चुकले असेल तरी अनेकदा त्या प्रश्नाचे गुण कमी केले जात नाहीत. किंवा स्पेलिंग चुकल्यामुळे कमी होणारे गुण अत्यल्प असतात. त्यामुळे याचा म्हणावा इतका मोठा परिणाम विद्यार्थ्यांच्या गुणांवर झाल्याचे दिसत नाही. मात्र, ही नवी शब्दरचना अजूनही प्रमाण मानण्यात आलेली नाही. त्यामुळे भाषेच्या दृष्टिकोनातून या लघुरूपांचा वापर चुकीचा असल्याचे शिक्षकांनी सांगितले. एखाद्या विद्यार्थ्यांने नकळतपणे ही लघुरूपे वापरली असली, तर ते लक्षात येते. मात्र, या लघुरूपांचा वापर जास्त असेल, तर त्याचे गुण कमी केले जातात. वर्षभर विद्यार्थ्यांच्या वह्य़ा किंवा उत्तरपत्रिकांमध्ये ही परिभाषा वापरण्यात आली असेल, तर त्याचे गुण कमी करून विद्यार्थ्यांना चूक लक्षात आणून दिली जाते, असे शिक्षकांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘‘भाषा ही प्रवाही असते. सध्या वापरल्या जाणाऱ्या शब्दाच्या रूपांना समाज मान्यता नाही. त्यामुळे ती चुकीचीच असतील. मात्र, काळाच्या ओघात हे शब्द प्रमाण मानले जाऊ शकतात. आतापर्यंत काळाच्या ओघात अशाप्रकारे अनेक शब्दांचे स्वरूप बदलल्याची उदाहरणे आहेत. शास्त्र विषयामध्ये शब्दांसाठी वापरली जाणारी चिन्हे भाषेच्या परीक्षेत विद्यार्थ्यांकडून वापरली जात असत. ज्या वेळी विद्यार्थ्यांची ही सवय लक्षात येते त्या वेळी त्यांना चूक निदर्शनास आणून दिली जाते. मात्र, मुळात विद्यार्थी दिवसभर अशा प्रकारची भाषा वापरत असतील, तर ती त्यांच्या अंगवळणी पडते आणि नकळत तीच वापरली जाते. मात्र, परीक्षेच्या दृष्टिकोनातून विचार करायचा झाल्यास या शब्द रुपांचा वापर करणे हे चूक आहे. बोर्डाच्या परीक्षेत भाषेचा अशाप्रकारचा वापर किती प्रमाणात होत आहे, हे नेमके सांगता येणार नाही. त्याचा स्वतंत्रपणे अभ्यास करावा लागेल.’’
– उमेश प्रधान, इंग्लिश विषयाचे शिक्षक
शब्दांची प्रचलित लघुरूपे – मूळ शब्द आणि कंसात त्याचे लघुरूप
the – (d), there – (der), that – (dat), then – (den), have – (hv), had – (hd), will – (ll), with – (wit), what – (wat), when – (wen), where – (wer), why – (wy), be – (b), becouse – (bcoz), talk – (tlk), sorry – (sry), you – (u), your – (ur), am – (m), know – (kno), good – (gud), give – (giv), about – (abt), check – (chk), could – (cld), click – (clk), see – (c), fabulous – (fab), okay – (k), never – (nvr), people – (ppl), quick – (qik), really – (rly), thanks – (thnx), very – (vry).

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Youth sms twitter exam
First published on: 23-04-2014 at 03:17 IST