एकुणातच कोणत्याही धर्माकडे पाहण्याची आपली एक ठरलेली चौकट असते. त्यातही आजकाल प्रतीकांनाच अधिक महत्त्व आल्यामुळे तर आणखीनच सावळागोंधळ आहे. किंबहुना आपल्या समाजरचनेकडे जरा मागे जाऊन पाहिले तर हीच भावना वेळोवेळी दिसून येणारी. साहजिकच रणआवेश आणि अभिनिवेशाला इतिहासात अतोनात महत्त्व लाभलं आहे. तेच अनेक वेळा लिखाणातदेखील प्रतिबिंबित होत असतं. असं असलं तरी धर्मासारख्या   विषयांची त्यातही लढवय्या शीख धर्माची मांडणी चिकित्सक पद्धतीने करणं जरा कठीणच. खुशवंत सिंह यांचं ‘शीख’ हे पुस्तक या साऱ्याला पुरून उरणारं आहे. चिकित्सक या शब्दावर जरा अधिकच जोर असला तरी हा रटाळ प्रबंध नाही हे महत्त्वाचं.

हे काही शीख धर्मावर भाष्य करणारं ताजं पुस्तक नाही. ते १९५२ सालीच हे इंग्रजीत लिहिलंय. २००३ सालच्या पुनर्मुद्रित आवृत्तीचं हे मराठी भाषांतर. पण पुस्तकाचा उद्देश हा भूतकाळातील तत्कालीन घडामोडींवर चिकित्सक प्रकाश टाकत वर्तमानाची जाणीव करून देणारा आहे. खुशवंत सिंह हे स्वत: शीख असले तरी त्यांचं शीखपण लेखनात पंक्तीप्रपंच निर्माण करत नाही.

धर्मासारख्या विषयाची मांडणी थोडक्यात आणि अभ्यासू कशी असावी त्याचं हे उत्तम उदाहरण आहे. पुस्तकाची सुरुवात ते थेट विषयाला हात घालून करतात. इतिहास मांडताना आपल्याकडे भूगोलाचा विपर्यास होतो, पण खुशवंत सिंह या भूगोलाच्या हातात हात घालूनच विषयप्रवेश करतात. भौगोलिकदृष्टय़ा पंजाबचे स्थान, तेथील नैसर्गिक परिस्थिती अशा सर्वाचा वेध घेत ते थेट धर्मस्थापनेवर येतात. शीख धर्माची सुरुवात आणि त्यांचे पूज्यनीय गुरू यांचा आढावा घेऊन पुढे टप्प्याटप्प्याने ते शीख धर्माचे असंख्य पैलू उलगडतात.

शिखांचे दहा गुरू त्यांचे सहजधारी, खालसा, नामधारी, सिंह सभा, अकाली असे विविध पंथ. शिखांची सैन्यरचना उलगडणारे त्यांचे मिस्ल हे इतक्या सहजपणे उलगडत जाते की तुम्ही त्या धर्माशी एकरूप होऊन जाता. शीख संघराज्य, स्वतंत्र राज्याचा उदय आणि अस्त, धार्मिक सुधारणा, सिंह सभा, अकालींची चळवळ, गदर चळवळ, राजकीय वाटचाल फाळणी असा हा सारा प्रवास या पुस्तकात अगदी पद्धतशीरपणे उलगडत जातो. महत्त्वाचं म्हणजे हे केवळ इतिहासाचं, युद्धांचं रम्य लिखाण नाही. त्यामुळे खुशवंत सिंह अगदी ठाम विधानं यात करतात. असंख्य कागदपत्रांचा आधार असल्यामुळे ही विधानं विचार करायला लावतात. शीख धर्म हा हिंदू धर्म आणि इस्लाममधील संघर्षांचं फलितस्वरूप असल्याचे ते सुरुवातीलाच सांगतात. त्यामुळे पुढील लिखाणात त्या अनुषंगाने तुलना वाचायला मिळते. तसंच शीख धर्माची वाटचाल नेमकी कशी आणि कोणत्या वेळी हिंदू धर्माकडे झुकू लागली होती याचं विश्लेषण मिळते.

गुरू नानक ते गुरू गोबिंदसिंह हा दोनशे वर्षांचा कालावधी तुलनेने थोडक्यातच आला आहे. त्यानंतर खऱ्या अर्थाने लढवय्या झालेल्या या समाजात अनेक उलथापालथी झाल्या. तेव्हा परकीय आक्रमणासह अंतर्गत संघर्षदेखील मोठा होता. गुरू गोबिंदसिंहानी गुरू परंपरा बंद केली असली तरी त्यांनी धार्मिक कार्याव्यतिरिक्त निवडलेला उत्तराधिकारी बंदा बहाद्दूर ते शीख संघराज्याचा रणजीतसिंह यांच्यापर्यंतचा प्रवास विस्तृतपणे या पुस्तकात उलगडतो. याच काळात वाढलेले अनेक पंथ, ब्रिटिशांचा वाढता अंमल, शीख समाजात वाढलेला वर्ग-वर्णवाद, हिंदूू धर्माकडचे झुकलेपण, जमीनदारी या सर्वाचा आढावा अतिशय रोचक आणि चिकित्सक आहे. शीख समाज म्हटल्यावर जी एक लढवय्या प्रतिमा डोळ्यासमोर येते ती याच काळात प्रकर्षांने तयार झाल्याचे यातून जाणवते. राजा रणजीत सिंहानी १८०९ मध्ये ब्रिटिशांशी केलेला तह ते १८३७ मध्ये पुन्हा एकदा केलेला तह हा त्या लढवय्येपणाचा परमोच्च बिंदू म्हणावा लागेल.

लेखकाचा हेतू केवळ या इतिहासापुरताच मर्यादित नाही. त्यामुळे पंजाब इंग्रजांच्या आधिपत्याखाली गेल्यानंतरचा ते भारताला स्वातंत्र्य मिळण्यापर्यंतच्या काळावर उत्तरार्ध बेतला आहे. हे करताना धार्मिक पुनरुज्जीवनाच्या चळवळी, शिक्षण साहित्यावर भर असलेली सिंह सभा, धर्मस्थळांचा ताबा घेऊन त्यावर धार्मिक अधिष्ठान बसवणं हा उद्देश असणारी अकाली चळवळ आणि तिचं एका राजकीय प्रवाहात झालेलं रूपांतर आणि अखेरीस फाळणी दरम्यानची परिस्थिती असा प्रवास प्रभावीपणे मांडला आहे. अनादी काळापासून अस्तित्वात नसलेला एक धर्म देशाच्या एका मोठय़ा भूभागात त्यामुळे झालेली मोठी धार्मिक, सामाजिक, आर्थिक, राजकीय घुसळणीची जाणीव हा कालखंड करुन देतो.

पुस्तक हे पंजाबात फुटीरतावादी खलिस्तानच्या हालचाली सुरू होण्यापूर्वीचं आहे. त्यामुळे १९८० च्या दशकात देशाला हलवून सोडणाऱ्या या घटनांचा त्यात उल्लेख नाही. त्यानंतर तर पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं आहे. पण तरीदेखील उण्यापुऱ्या चारपाचशे वर्षांच्या या धर्मात किती बदल झाले आणि ते बदल आजच्या काळावर कसे पाहावे हे या पुस्तकातून नक्कीच जाणवणारे आहे. महत्त्वाचं म्हणजे हे सारं मराठीतून तितक्याच सहज सोप्या, पण प्रभावी भाषेत मांडणं हे अनुवादकाचं कौशल्य म्हणावं लागेल.
शीख, लेखक – खुशवंत सिंह, अनुवाद – प्रशांत तळणीकर, चिनार पब्लिशर्स, (सरहद्द रिसर्च सेंटर), पृष्ठसंख्या २१२, मूल्य रु. २००/-
सुहास जोशी – response.lokprabha@expressindia.com