15 August 2020

News Flash

गर्वगाणे गाउ नये

‘मराठी दिना’च्या निमित्ताने या भाषेस अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा मुद्दा पुन्हा एकदा उगाळला गेला असेल.

कालच्या ‘मराठी दिना’च्या निमित्ताने या भाषेस अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा मुद्दा पुन्हा एकदा उगाळला गेला असेल. असा दर्जा मिळाल्याने सरकारदरबारातून अधिक अनुदान मिळण्याखेरीज नक्की काय होणार, हे अभिजात दर्जावाल्यांनाच ठाऊक. तो मिळेल तेव्हा मिळेल. परंतु यानिमित्ताने मराठीच्या भवितव्याचा मुद्दाही चच्रेत चघळला गेला असेल.
भाषा ही त्या व्यक्तीच्या विचारांची निदर्शक असते. याचा अर्थ एखाद्याला स्वच्छपणे सरळ एका भाषेत काही सांगता येत नसेल, तर त्याची विचारप्रक्रिया दोषपूर्ण आहे. या असल्यांच्या विचारप्रक्रियेमुळेच आज आसपास ना धड मराठी, ना इंग्रजी, आणि हिंदी तर नाहीच नाही, अशा र्अधकच्च्या भाषा बोलणारे बरेच दिसतात. अशा मंडळींनी आपली भाषा सुधारावयाची असेल तर आधी स्वत:च्या विचारप्रक्रियेवर काम करावे आणि ते झाल्यावर भाषेकडे लक्ष द्यावे. या दोन्ही कामांत अशा इच्छुकांना रामदासांचा उपयोग मोठय़ा प्रमाणावर होऊ शकतो.
ते कसे, ते पाहण्याआधी भाषेच्या वापराबाबतचा आणखी एक मुद्दा ध्यानात घ्यावयास हवा. तो म्हणजे भाषा ही प्रसंगोपात बदलावयाची असते. महाविद्यालयीन काळात सवंगडय़ांसमवेत आपण ज्या भाषेत बोलतो त्याच भाषेत वाडवडील वा अन्य वडिलधाऱ्यांशी बोलतो काय? नाही. तसेच भाषा ही प्रसंगानुसारही बदलणे गरजेचे असते. म्हणजेच एखाद्या औपचारिक व्यावसायिक उद्दिष्टांसाठी करावयाचे एखाद्या प्रसंगाचे वर्णन आणि कौटुंबिक सहलींचे वर्णन यांची भाषा एकच असता नये. तसेच या दोघांत गल्लत करूनही चालत नाही. म्हणजे व्यावसायिक कारणांची भाषा ही सहलीच्या वर्णनासाठी वापरणे हास्यास्पद ठरेल. उलट झाल्यासही तसेच होईल. भाषेचा वापर समयोचित कसा करावा, हे समजून घेण्यासाठी त्यामुळेच रामदासांच्या वाङ्मयाचे परिशीलन आवश्यक ठरते.
आता हेच पाहा. मराठी घरांत लोकप्रिय असलेल्या दोन आरत्या समर्थ रामदासांनी लिहिलेल्या आहेत. या दोन्ही कथित देवांची स्वभाववैशिष्टय़े वेगळी. त्यांचे गुणधर्म वेगळे. ते ध्यानात घेऊन रामदासांनी त्यांचे वर्णन करताना भाषा किती सहज बदलली आहे, ते पाहा. उदाहरणार्थ, काहीशा लडिवाळ, क्षमाशील, कलासक्त गणपतीचे वर्णन करताना ते म्हणतात-
रत्नखचित फरा तुज गौरीकुमरा
चंदनाची उटी कुंमकुमकेशरा
हिरेजडित मुकुट शोभतो बरा
रुणझुणती नूपुरे चरणी घागरीया..
पण तेच रामदास जेव्हा डोक्यात राख घालून घेणाऱ्या गणपतीच्या वडिलांचे वर्णन करतात तेव्हा लिहितात-
लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा
वीषें कंठ काळा त्रिनेत्रीं ज्वाळा
लावण्यसुंदर मस्तकीं बाळा
तेथुनियां जल निर्मळ वाहे झुळझुळां..
म्हणजे गणपतीचे वर्णन करावयाचे शब्द आणि शंकराच्या वर्णनाची भाषा यांत किती फरक आहे ते पाहा. हेच रामदास जेव्हा देवी भवानीस-
तुझा तु वाढवी राजा
शीघ्र आम्हांसि देखता..
असे शिवाजी महाराजांविषयी म्हणतात तेव्हा त्यातील आर्तता ही वेगळी असते. ती भाषेतून समोर येते. याच देवीचे वर्णन करताना रामदास म्हणतात-
दुग्रे दुर्घट भारी तुजविण संसारीं
अनाथ नाथे अंबे करुणा विस्तारीं
वारीं वारीं जन्म-मरणातें वारीं
हारीं पडलों आतां संकट निवारीं..
भाषेचे हे वैविध्य शिकण्यासारखेच. एका बाजूला गणपतीचे वर्णन करताना आलेले ‘रुणझुणती नूपुरे’ यासारखे नादमय शब्द. पण हीच नादमयता कडय़ावरून पडणाऱ्या नदीच्या प्रवाहाचे वर्णन जेव्हा रामदास करतात तेव्हा वेगळी भासते..
गिरीचे मस्तकी गंगा
तेथुनी चालली बळे
धबाबा लोटल्या धारा
धबाबा तोय आदळे..
या वर्णनातून त्या प्रपाताची भव्यता वाचकाच्या डोळ्यांसमोर उभी राहीलच राहील. आपले सर्व लेखन हे रामदासांनी कोणास काही ना काही सांगण्यासाठी, शिकविण्यासाठीच केले. उगाच वेळ जात नाही म्हणून ते कथा-कविता करीत बसले असे झालेले नाही. तरीही त्यांचा मोठेपणा म्हणजे- आपण काही आता तुम्हाला शिकवणार आहोत, असा त्यांचा आविर्भाव कोठेही आढळत नाही. शिकविणाऱ्याला दडपण येता नये आणि शिकणाऱ्याला कंटाळा येता नये, याची काळजी रामदास पुरेपूर घेतात. ही काळजी घ्यायची म्हणजे काय करायचे? तर-
मुलाचे चालीने चालावे
मुलाच्या मनोगते बोलावे
तसे जनासि सिकवावे
हळुहळु..
असे रामदासांचे सांगणे आहे. ते सांगतानाची भाषादेखील पाहा किती समजावण्याची आहे. तीत अभिनिवेश नाही. तो आला, की समोरच्याच्या मनात एक प्रकारचा दुरावा तयार होतो. रामदासांना तो टाळायचा आहे. त्यासाठीच ते भाषेला देत असलेले महत्त्व लक्षात घ्यायला हवे. अलीकडे अनेक विद्यार्थी त्यांच्या शिक्षकांविषयी वारंवार तक्रार करीत असतात. बऱ्याचदा त्या तक्रारी रास्तही असतात. कारण विद्यार्थ्यांशी कसे बोलावे, त्यांना कसे आपलेसे करावे, आणि त्यांच्या पातळीवर जाऊन त्यांच्या मनाचा ठाव कसा घ्यावा, हे त्यांना कोणी सांगितलेलेच नसते. अशा शिक्षकांची मग भाषाही त्यामुळे कोरडीठाक असते. तीत ओलावा नसतो. तो कसा आणावयाचा, हे समजून घ्यावयाचे असेल तर अशांनी रामदास वाचावा.
सोपा मंत्र परी नेमस्त
साधे औषध गुणवंत
साधे बोलणे सप्रचीत
तसे माझे..
समर्थ रामदासांच्या नंतर ३०० वर्षांनी जन्मलेल्या विख्यात संशोधक आइनस्टाईन याचे एक वाक्य आहे. तो म्हणतो : एखाद्याला एखादा विषय सहज-सोप्या भाषेत मांडता येत नसेल, समजावून सांगता येत नसेल तर त्याला त्या विषयाचे पुरेसे आकलन झालेले नाही असे खुशाल समजावे. रामदासांनी वेगळ्या शब्दांत हीच बाब सतराव्या शतकातच सांगून ठेवलेली आहे. जे आपल्याला सांगावयाचे आहे, त्यावर मुळात आपले प्रेम हवे. ते असल्यास आपल्या विषयाचा सखोल अभ्यास हवा. आणि त्यानंतर हा अभ्यास प्रकट करणारी साजेशी भाषा हवी. हे नसेल तर सर्व व्यवहार कंटाळवाणा होतो.
भक्तीहीन जे कवित्व
तेचि जाणावे ठोंबे मत
आवडीहीन वक्तृत्व
कंटाळवाणे
म्हणजे विषयाचे आकलन हवे आणि तो विषय समजावून सांगणारी साजेशी भाषाही हवी. याखेरीज आणखी एक मुद्दा असा की- एकदा का भाषेवर हुकमत आली, की ती भाषा आपणास हवी तशी वाकवता येते. शब्दांचे फुलोरे मांडता येतात. शब्द वाकवता येतात. आपल्याला हवे तसे तयार करता येतात. ते करण्याचे कौशल्य आणि त्याअभावी होणारी वरवरची कारागिरी यांतील फरक रामदासांच्या लिखाणातून स्पष्ट समजून घेता येतो. आता हेच पाहा-
खटखट खुंटून टाकावी
खळखळ खळांसी करावी
खरे खोटे खवळो नेदावी
वृत्ती आपली..
त्यांच्या शब्दकळेचा आणखी एक नमुना-
गर्वगाणे गाउ नये
गाता गाता गळो नये
गौप्य गुज गर्जो नये
गुण गावे
एका बाजूला हे असे लिहिणारे रामदास दुसरीकडे शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाने सद्गदित होतात आणि लिहून जातात..
त्रलोक्य चालिला फौजा
सौख्य बंदी विमोचने
मोहीम मांडिली मोठी
आनंदवनभुवनी..
तेव्हा या भाषिक आनंदासाठी तरी आपण दासबोध आणि समर्थाच्या अन्य वाङ्मयाचा आनंद घ्यावा. मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने इतके जरी आपण करू शकलो तरी त्यामुळे मराठीचे भले होण्यास मदतच होईल.

समर्थ साधक – lokrang@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 28, 2016 1:01 am

Web Title: classical language status for marathi issue raise on occasion of marathi language day
Next Stories
1 तरी अन्न मिळेना खायाला
2 आळस उदास नागवणा
3 रामदास विनवी :  ऐसी विचाराची कामे
Just Now!
X