Bhau bij 2025 : दिवाळी हा सण फक्त प्रकाश आणि आनंदासाठी नाही, तर तो खाद्यपदार्थांच्या विविधतेसाठीही ओळखला जातो. वसुबारसपासून ते भाऊबीजेपर्यंत प्रत्येक दिवशी नवीन पदार्थांची रेलचेल असते. विशेषतः भाऊबीजेला भावाला काही खास बनवून देण्याची पारंपरिक संधी असते. यंदा भाऊबीजेला भावाच्या तोंडाला गोड चव देण्यासाठी ‘केशरी भात’ बनविण्याची रेसिपी अगदी सोप्या पद्धतीत देत आहोत. हा केशरी भात केवळ स्वादिष्टच नाही, तर पौष्टिक आणि सजावटीसुद्धा उत्तम आहे. चला तर मग जाणून घेऊया ही रेसिपी, जी घरच्या लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वांना नक्कीच आवडेल.

साहित्य

  • १ कप तांदूळ
  • १ कप साखर
  • २ चमचे तूप
  • अडीच कप पाणी
  • २ तमालपत्रे
  • ३-४ केशर काड्या
  • १ दालचिनीचा तुकडा
  • ३ ते ४ काजू
  • ३ ते ४ बदाम
  • चिमूटभर वेलची पावडर
  • ४ लवंग
  • १०-१२ खोबऱ्याचे तुकडे
  • पिस्त्याचे काप

कृती

एका भांड्यात तांदूळ घेऊन, त्यात अडीच कप पाणी टाकून भिजवून ठेवा. कुकरमध्ये तूप गरम करून त्यात काजू आणि बदाम सोनेरी रंग येईपर्यंत भाजा. त्यात तमालपत्रे, दालचिनी, लवंग आणि भिजवलेले तांदूळ टाका. त्यात केशर घालून, सर्व साहित्य व्यवस्थित मिसळा. मग कुकरचे झाकण लावा आणि भात शिजू द्या. कुकर उघडल्यानंतर त्यात साखर, वेलची पावडर व खोबऱ्याचे तुकडे घालून मंद आचेवर भात पुन्हा ५-१० मिनिटे शिजवा. शेवटी गरमागरम भात पिस्त्याच्या कापांनी सजवून सर्व्ह करा.

हा केशरी भात केवळ स्वादिष्टच नाही, तर तो भावासाठी तयार केलेला गोड उपहारही आहे. भाऊबीजेला भावाला हा भात बनवून दिला की, नक्कीच आनंद होतो. पारंपरिक पदार्थ असला तरी आजच्या युगातही घरच्या लोकांना हा भात अगदी सहजपणे बनवता येतो. तसेच, घरच्या लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वांना तो आवडतो.

यंदा भाऊबीजेला तुम्ही तुमच्या भावासाठी हा केशरी भात बनवून पाहा आणि आनंदात दिवसभर भरभरून गोडीचा अनुभव घ्या. सोपी रेसिपी, पौष्टिक घटक, स्वादिष्ट चव – हे सगळे मिळून तयार होतो भाऊबीजेसाठी अनुपम असा खाद्यपदार्थ. कारण- तोंड गोड, तर नातं गोड आणि आठवणी गोड होण्यासाठी भावाला समोर बसवा आणि या तुम्ही स्वत: बनवलेल्या केशरभाताची चव घेऊन, त्याच्या चेहऱ्यावरील खुशीचा अनुभव घ्या.