हळूहळू थंडी वाढायला सुरुवात होत आहे. अशात जेवणामध्ये गरमागरम डाळ खिचडी, पापड आणि लोणचं खायला फारच मजा येते. पण, पटकन तयार होते म्हणून सारखी खिचडी खाऊनसुद्धा कंटाळा येतो. त्यामुळे याला गरम भात आणि त्यावर राजस्थानी आंबट-गोड डाळ हा एक जबरदस्त पर्याय आहे. आता राजस्थानी डाळ करायची म्हणजे कांदा, टोमॅटो, लसूण हे सर्व चिरून, स्वयंपाकघरात तासभर घालवावा लागणार का? तर तसं अजिबात नाही. कारण हा पदार्थ काही मसाले वापरून आणि केवळ एका पातेल्यात तयार होणारा आहे. झटपट आणि कमी कष्ट असणाऱ्या या राजस्थानी आंबट-गोड डाळीची रेसिपी इन्स्टाग्राम या सोशल मीडिया माध्यमातून @craveyourcraving या हँडलरने शेअर केलेली आहे.
राजस्थानी आंबट-गोड डाळीची रेसिपी पाहा
साहित्य
१/२ कप तूर डाळ
तूप/तेल
वाळवलेल्या कढीपत्त्याची पावडर
वाळवलेली मिरची
२-३ वाळवलेले कोकम
जिरे
मोहरी
लवंग
लाल तिखट
धणे पावडर
हळद
आले पावडर
साखर किंवा गुळ
चिंचेची पेस्ट
मीठ
कृती :
एका कुकरमध्ये एक चमचा तूप घालून तापू द्यावे. त्यानंतर यात मोहरी, जिरे, वाळवलेले कोकम, वाळवलेल्या कढीपत्त्याची पावडर, धणे पावडर, आले पावडर, लवंग, लाल तिखट, हळद आणि मीठ हे सर्व पदार्थ घालून थोडे खमंग करून घ्यावे. त्यानंतर यामध्ये दोन तासांसाठी भिजवून ठेवलेली तूर डाळ घालून, सर्व मसाल्यांसोबत एकदा परतून घेऊन थोडी साखर किंवा गूळ घालून त्यामध्ये पाणी घालावे. आता त्यामध्ये एक ते दीड चमचा चिंचेची पेस्ट घालावी.
या कुकरमध्ये कुकरचा स्टॅन्ड ठेऊन त्यावर, भात तयार करण्यासाठी तांदूळ व पाणी घातलेला डबा ठेवावा. [तुम्हाला हवे असल्यास भात वेगळा बनवून घेऊ शकता.]
आता हे सर्व पदार्थ शिजण्यासाठी तयार आहे. कुकरचे झाकण लावून घेऊन कुकरच्या चार ते पाच शिट्या काढून घ्याव्यात.
तयार आहे तुमची एका पातेल्यात झटपट तयार होणारी राजस्थानी आंबट-गोड डाळ. भात आणि राजस्थानी डाळीसोबत एखादा पापड खाण्यास फार सुंदर लागतो.