Best recipies from leftover Diwali faral: दिवाळीत आपण आपल्या घरासाठी भरपूर फराळाचे पदार्थ करतो किंवा मग विकत आणतो. त्यानंतर नातलग, मित्रमंडळी, शेजारी यांच्याकडूनही फराळाचे पदार्थ आपल्या घरात येतात. पाहता पाहता सगळा मिळून एवढा फराळ होऊन जातो की मग दिवाळी झाल्यानंतर तो खाण्याचाही कंटाळा येतो. उरलेल्या फराळाचे करायचे काय हा प्रश्न या दिवसांत जवळपास सगळ्याच महिलांना पडलेला असतो. त्यासाठीच हे बघा त्या प्रश्नाचं एक खमंग उत्तर. दिवाळीनंतर उरलेल्या फराळापासून हे काही खमंग पदार्थ करता येतील. पदार्थांची चव एवढी छान असेल की बघता बघता सगळे पदार्थ फस्त होतील.

१. चटपटीत शेव मसाला पोळी

शेव जर उरली असेल तर चटपटीत शेव मसाला पोळी रोल करण्यासाठी तिचा मस्त उपयोग करता येतो. ही रेसिपी करण्यासाठी कांदा, टोमॅटो बारीक चिरून घ्या. तवा गरम करायला ठेवा. त्यावर थोडं तूप टाका आणि घरात तयार असलेली पोळी त्या तुपावर टाका.आता पोळीच्या वरच्या बाजुने टोमॅटो सॉस लावा. त्यावर बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, तिखट, चाट मसाला आणि घरातली शेव असं सगळं टाका. पोळी खालच्या बाजुने खमंग भाजली गेली की ती दोन्ही बाजुने दुमडून तिचा रोल तयार करा. चटपटीत शेव मसाला पोळी झाली तयार..

२. शेव भाजी

घरात उरलेली शेव जर थोडी जाडसर असेल तर घरच्याघरी खमंग शेवभाजीचा बेत करा आणि त्यामध्ये घरात उरलेली फराळाची शेव वापरून टाका. नेहमीपेक्षा थोडी वेगळ्या प्रकारची, वेगळ्या चवीची शेवभाजी खायला मिळेल.

३. भाज्यांमध्ये ग्रेव्ही

शेव, चकल्या खूप जास्त प्रमाणात उरल्या असतील तर शेव थोडी हाताने चुरून घ्या. चकल्यांचे तुकडे करून घ्या. शेव आणि चकली दोन्ही मिक्सरमध्ये टाकून बारीक पावडर करून घ्या.ज्या भाज्या आपण डाळीचं पीठ किंवा बेसन तसेच दाण्याचा कूट लावून करतो, त्या भाज्यांमध्ये पीठाऐवजी किंवा कुटाऐवजी चकल्यांची किंवा शेवेची मिक्सरमधून बारीक केलेली पावडर वापरा. चवीमध्ये बदल झाल्याने भाज्या सगळ्यांनाच खूप आवडतील.