दिवाळी म्हणजे घराघरात गोडधोड, फराळ, लाडू आणि मिठाईचा जल्लोष असतो. दिवाळीला प्रत्येक घरात गोडाचे पदार्थ बनवले जातात आणि तोंडाला पाणी सुटण्यासारखी चव अनुभवायला मिळते. पण, ज्यांना वजन कमी करायचं आहे किंवा फिटनेसचा विचार करून काही लोक हे गोड पदार्थ टाळतात. मग त्यांना गोड खाण्याची इच्छा होऊन तोंडाला पाणी सुटलं तरी मन म्हणतं, नको डाएटवर आहेस! आणि मग गोडाचा आनंद घेण्यापासून ते दूर राहतात.
पण, यंदा दिवाळीला असं काही होणार नाही. एक अशी वेगळी रेसिपी आज तुम्हाला सांगणार आहोत, जिथे तुम्ही वजन वाढण्याची चिंता न करता गोड मिठाई खाण्याचा आनंद घेऊ शकता. तर, ही मिठाई आहे मखाने आणि ग्रीक दह्याची आरोग्यदायी रसमलाई, जी स्वादिष्ट, मऊसर व पोषकही आहे. पारंपरिक रसमलाईप्रमाणे दुधात मुरलेली ही मिठाई तितकीच चवदार आहे; पण यात साखर नाही, मैदा नाही आणि कॅलरीजही फार कमी आहेत. त्यामुळे तुम्ही गोडाचा आनंद तर घेऊ शकालच; पण तुमच्या फिटनेसच्या उद्दिष्टांनाही मदत होईल.
त्यामुळे यंदाच्या दिवाळीत तुम्ही फक्त गोड नाही, तर आरोग्यदायी गोडाचा आनंदही अनुभवू शकता. ही रेसिपी म्हणजे फिटनेसची काळजी घेणाऱ्यांसाठी एक परफेक्ट पर्याय आहे, ज्यामुळे सणाची मजा आणि आरोग्य, अशी दोन्ही उद्दिष्टे साधता येतात.
हेल्दी रसमलाई रेसिपी
साहित्य
मखाने – २०० ग्रॅम
ग्रीक दही
केसर
मध
८ ते १० भिजवलेले व सोललेले बदाम
इलायची पावडर
कृती
सर्वप्रथम मखान्यांना थोड्याशा तुपात ड्राय तव्यामध्ये छान भाजून घ्या. ते खमंग झाले की, थंड होऊ द्या. नंतर एका छोट्या वाटीत केसरचे काही तंतू कोमट पाण्यात भिजत ठेवा, जेणेकरून त्याचा रंग आणि सुगंध छान उतरू शकेल. आता मिक्सरच्या भांड्यात भाजलेले मखाने, भिजवलेले बदाम, इलायची पावडर व थोडं केसर पाणी टाका. त्यात साखरेऐवजी एक-दोन चमचे मध घालून, सर्व एकत्रित करून स्मूथ पेस्ट तयार करा. ही पेस्ट एका वाटीमध्ये काढून सुमारे एक तास फ्रिजमध्ये सेट होण्यासाठी ठेवा. सेट झाल्यावर वरून थोडे पिस्त्याचे कापलेले तुकडे, उरलेले केसर टाकून गारेगार सर्व्ह करा.
या मिठाईचे फायदे
१ . मखाने हे कमी कॅलरीजचे; पण जास्त फायबरने भरलेले असतात.
वजन कमी करायचं असेल, तर मखाने हा सर्वांत परफेक्ट पर्याय असतो. त्यात फार कमी कॅलरीज असतात; पण फायबर भरपूर असतं. त्यामुळे मखाने खाल्ल्यानंतर बराच वेळ पोट भरल्यासारखं वाटतं आणि वारंवार भूक लागत नाही. त्यामुळे नकळत होणारा ओव्हर इटिंगचा धोका कमी होतो.
२. ग्रीक दही स्नायूंसाठी शक्तिशाली प्रथिने प्रदान करते
सामान्य दह्यापेक्षा ग्रीक दह्यामध्ये जवळजवळ दुप्पट प्रोटीन असतं. त्यामुळे हे फक्त चवदारच नाही, तर तुमच्या स्नायूंना योग्य पोषण देतं. वजन कमी करताना स्नायू कमजोर होण्याचा धोका असतो; पण ग्रीक दही शरीराला अधिक टोन आणि मजबूत ठेवते.
३. बदाम आणि मध हे नैसर्गिक गोडवा व निरोगी चरबी यांचे परिपूर्ण मिश्रण आहे!
साखरेऐवजी जेव्हा मधाचा वापर केला जातो तेव्हा शरीराला नैसर्गिक गोडवा तर मिळतोच; पण त्याचबरोबर अँटिऑक्सिडंट्सही मिळतात. तसेच भिजवलेले बदाम मेंदू आणि हृदयासाठी फायदेशीर असतात. त्यामध्ये असलेली आरोग्यदायी चरबी त्वचेला चमक देते आणि हार्मोनल संतुलन राखते.