अनेकांना पोळी-भाजीपेक्षा भाजी-भाकरी खायला आवडते. त्यात विशेषत: महाराष्ट्रात भाकरी म्हणजे पोटभर जेवण, असे म्हटले जाते. चवीला उत्तम व पौष्टिक अशी एक भाकरी खाल्ली तरी पोट भरते. त्यामुळे अनेकांच्या घरी ज्वारी, बाजरी, नाचणी व तांदळाची किंवा या सर्व धान्यांच्या मिक्स पिठाची भाकरी बनवली जाते. भाकरी पचायलादेखील हलकी असते. आजवर तुम्ही तांदूळ, नाचणीच्या भाकऱ्या खाल्ल्या असतील; पण आज आम्ही भाकरीचा असा एक वेगळा प्रकार सांगणार आहोत की, जो अनेकांनी यापूर्वी कधी ऐकला किंवा पाहिलाही नसेल. आज आपण गोकर्णाच्या फुलांपासून ‘निळी भाकरी’ बनविण्याची रेसिपी पाहणार आहोत. चला, तर मग जाणून घ्या ही रेसिपी…
गोकर्णाच्या फुलांमध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, जस्त व लोह मोठ्या प्रमाणात असते. त्यासह ही फुले मानसिक आरोग्य, सर्दी-खोकला, केसांची समस्या व मधुमेह यांसारख्या आजारांवरही गुणकारी मानली जातात. या फुलांपासून बनवलेला चहा नियमित प्यायल्यास रक्त शुद्ध होते त्यामुळे त्वचेचे विकार आपोआपच कमी होतात. त्यामुळे या फुलांपासून बनविलेली भाकरी आरोग्यासाठी एकदम पौष्टिक अशी आहे.
साहित्य
१) १ कप पाणी
२) ६ ते ८ गोकर्णाची सुकलेली फुले
३) १ वाटी तांदळाचे पीठ
कृती
सर्वप्रथम एका भांड्यात एक कप पाणी घेऊन, त्यात गोकर्णाची फुले पाच मिनिटे उकळून घ्या. पाणी निळसर झाल्यानंतर त्यात एक कप तांदळाचे पीठ मिसळा. त्यानंतर गॅस बंद करून हे पीठ असेच १० मिनिटे वाफवून घ्या. आता वाफवलेले पीठ एका प्लेटमध्ये काढून, चांगले मळून घ्या. त्यानंतर आपण ज्या प्रकारे तांदळाची भाकरी थापटून शेकवतो अगदी त्याच प्रकारे याची भाकरी बनवा. अशा प्रकारे तयार झाली तुमची निळी भाकरी. तुम्ही ही भाकरी मेथी किंवा कोणत्याही पालेभाजीबरोबर अथवा पिठले वा झुणक्याबरोबर खाऊ शकता.
nutribit.app या इन्स्टाग्राम अकाउंटवरून आपण गोकर्णाच्या फुलांपासून निळी भाकरी बनविण्याची रेसिपी पाहिली. तुम्हालाही ही रेसिपी जर ट्राय करून पाहायची असेल, तर तुम्ही वरील व्हिडीओची मदत घेऊ शकता.