Gudi padwa 2024: मराठी महिन्याची सुरुवात चैत्र महिन्यात गुढीपाडव्याच्या सणाने होते. गुढीपाडवा हा हिंदू नववर्षाचा पहिला दिवस मानला जातो. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सर्वजण घरोघरी गुढ्या उभारतात. एका उंच काठीला रेशमाच्या खणाची घडी बांधतात. त्यावर चांदीचा गडू उपडा ठेवून, कडूनिंबाची डहाळी व आंब्याची पाने त्यावर बांधतात. साखरेची गाठी व फुलांचा हार गुढीला चढवतात. घरासमोर उंच ठिकाणी गुढी उभारली जाते. साखरेच्या गाठी व कडुनिंबाच्या पानांशिवाय गुढी उभारली जाऊच शकत नाही. गुढीपाडव्याला साखरेच्या गाठींचे विशेष महत्व असते.या गाठी बनवायला फारच सोप्या असतात. गाठी बाजारातून विकत आणण्यापेक्षा आपण घरच्या घरी त्या बनवू शकतो. आपण आपल्या आवडीनुसार, विविध रंगांच्या, आकाराच्या गाठी झटपट घरी तयार करु शकतो. या गाठी पारंपरिक पद्धतींनी घरी कशा बनवाव्यात याची सोपी रेसिपी…

साखरेच्या गाठी साहित्य

  • साखर – १ कप
  • दूध – १/२ टेबलस्पून
  • तूप – १ टेबलस्पून
  • खायचा रंग
  • पाणी – १/२ कप
  • गाठी तयार करण्याचा साचा
  • धाग्याची गुंडी

साखरेच्या गाठी कृती –

१. साखरेच्या गाठी तयार करण्यासाठी सर्वप्रथम साच्याला आतून तूप लावून घ्यावे. (आपल्याकडे साचा नसल्यास छोट्या आकाराच्या वाट्या किंवा लहान आकाराच्या डिश किंवा चॉकलेट मोल्ड्सचा वापर केला तरीही चालेल.)

२. आता या साच्यांमध्ये एक लांबसर धागा असा ठेवा की त्याची एकसंध माळ तयार होईल. (हा धागा बरोबर प्रत्येक साच्यांच्या मधोमध आला पाहिजे.)


३. त्यानंतर एका भांड्यात साखर घेऊन त्यात अर्धा कप पाणी घालावे. हे मिश्रण गॅसच्या मंद आचेवर ठेवून हळुहळु चमच्याने ढवळत राहावे. या साखरेपासून मध्यम कन्सिस्टंन्सीचा पाक तयार करुन घ्यावा.


४. साखर संपूर्णपणे पाण्यांत मिसळल्यावर त्यांत अर्धा चमचा दूध घालावे. हे मिश्रण चमच्याने ढवळून घ्यावे.


५. साखरेचा पाक तयार झाला आहे की नाही हे पाहण्यासाठी पाकाचा एक थेंब वाटीत घेऊन, वाटी वाकडी करुन पाहावी. पाकाला ओघळ जात असेल तर पाक अजून तयार झाला नाही. पाकाला ओघळ जात नसेल तो एकाच ठिकाणी घट्ट चिकटून राहिला असेल तर समजावे पाक तयार झाला आहे.


६. जर आपल्याला रंगीत गाठ्या हव्या असतील तर आपल्या आवडीनुसार आपण यात फूड कलरचे २ थेंब घालू शकता.


७. तयार झालेला साखरेचा पाक आपल्याला साच्यांमध्ये चमच्याच्या मदतीने ओतायचा आहे. हा साखरेचा पाक साच्यांमध्ये ओतताना बरोबर धाग्यांच्यावर ओतायचा आहे. हा धागा संपूर्णपणे पाकात भिजेल याची खात्री करुन घ्यावी.

हेही वाचा >> गुढीपाडवा स्पेशल महाराष्ट्रीयन सात्विक थाळी; फक्त ३० मिनिटांत होईल संपूर्ण स्वयंपाक

८. आता २ ते ३ तास हा पाक सुकण्यासाठी ठेवावा. पाक संपूर्णपणे सुकल्यानंतर या गाठी अलगद हातांनी काढून घ्याव्यात.
अशाप्रकारे गुढीपाडव्यासाठी घरच्या घरी आपण झटपट साखरेच्या गाठ्या बनवू शकतो.