[content_full]

उपास ही अत्यंत प्रेमाने, भक्तीने आणि श्रद्धेने करायची गोष्ट आहे. हे प्रेम, भक्ती किंवा श्रद्धा संस्कारांशी, भावनेशी निगडीत असली, तरी हरकत नाही, पण ती पोटाशी निगडीत असणं महत्त्वाचं आहे. एकादशी, दुप्पट खाशी, आधी पोटोबा, मग विठोबा असे काही सुविचार आणि सुवचनं फार थोर लोक सांगून गेले आहेत. त्यामुळे उपास म्हणजे पोटाला आराम वगैरे अंधश्रद्धा पाळण्याची कुणाचीच मानसिकता असण्याचं काही कारण नाही. तशी ती असली, तर त्या व्यक्तीमध्ये काहीतरी गडबड आहे, असं समजायला हरकत नाही. उपास ही खाण्याची चंगळ करण्याची सुवर्णसंधी. भरपूर तूप, जिरं, बटाटे, शेंगदाण्याचं कूट घालून केलेली साबूदाण्याची खिचडी असो, खरपूस शिजलेली भगर-शेंगदाण्याची आमटी असो, रताळ्याचा-बटाट्याचा खमंग कीस, उपासाचं थालीपीठ, रताळ्याची खीर, राजगिऱ्याचे लाडू, अशी सगळी चंगळ उपासाच्या दिवशीच करता येते. रोज आपण नेहमीचीच भाजी, भाकरी-पोळी, आमटी, असलंच काहीतरी खात असतो. उपास हेच खरं पंचपक्वान्न झोडण्याचं निमित्त. उपास ही संकल्पना ज्यांनी कुणी आणली, रुजवली त्याला सलाम करायला हवा. चांगल्या कल्पना उचलून फुलवणं आणि आपल्या पद्धतीनं त्या फिरवून घेणं, हे तर भारतीय माणसाचं वैशिष्ट्य. उपासाच्या बीजावरही आपापल्या पद्धतीनं संस्कार करून, आपल्या प्रांताच्या संस्कृतीची त्यांना जोड देऊन भारतीयांनी त्या बीजाचा वटवृक्ष केला. आता त्या वटवृक्षाचीच फळं आपण उपासाच्या दिवशी चाखत, ओरपत किंवा गटकवत आहोत. उपास हा लंघनाचा दिवस न मानता, खाद्य-पर्यटनाचा दिवस मानण्याच्या प्रवृत्तीला सलाम! उपासाचा एवढा महिमा सांगितल्यानंतर उपासाचा एखादा पदार्थही बघायला हवा ना? आज शिकूया, उपासाची पुरी-भाजी.

[/content_full]

[row]

[two_thirds]

साहित्य


  • चार मोठे बटाटे
  • दोन वाट्या राजगिर्‍याचे पीठ
  • दोन वाट्या साजूक तूप
  • एक चमचा जिरे
  • चवीनुसार ३-४ हिरव्या मिरच्या
  • चवीनुसार मीठ
  • चिमूटभर साखर
  • एक चमचा किसलेले आले
  • अर्धी वाटी चिरलेली कोथिंबीर
  • ५-६ कढीपत्त्याची पाने
  • अर्धी वाटी खोवलेला ओल्या नारळाचा चव.

[/two_thirds]

[one_third]

पाककृती


  • भाजी
  • बटाटे उकडून घ्या. त्यांच्या छोट्या छोट्या फोडी करून घ्या.
  • गॅसवर एका कढईत साजूक तूप गरम करून घ्या व त्यात जिरे टाका.
  • जिरे चांगले तडतडले की मग हिरव्या मिरच्यांचे बारीक चिरलेले तुकडे, ५-६ कढीपत्त्याची पाने आणि किसलेले आले घालून पुन्हा दोन मिनिटे चांगले परतून घ्या.
  • नंतर बटाट्याच्या बारीक चिरलेल्या फोडी व चवीनुसार मीठ व चिमूटभर साखर घालून झार्‍याने भाजी खाली-वर हलवून मिक्स करा.
  • नंतर कढईवर झाकण ठेवून एक वाफ काढून घ्या. झाकण काढून भाजीवर बारीक चिरलेली कोथिंबीर घालून पुन्हा झाकण ठेवा.
  • पुर्‍या
  • एका परातीत राजगिर्‍याचे पीठ घ्या.
  • त्यात चिमूटभर मीठ व दोन चमचे साजूक तुपाचे मोहन घालून नेहमीच्या पुर्‍यांसाठी भिजवतो त्याप्रमाणे घट्ट पीठ भिजवा व १० मिनिटे पातळ सूती कपड्याने झाकून ठेवा.
  • दहा मिनिटांनी कापड काढून पीठ पुन्हा एकदा चांगले मळून घ्या व नेहमीसारख्या पुर्‍या लाटून साजूक तुपात टाळून काढा.

[/one_third]

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

[/row]