[content_full]

इजिप्त ही नाईलची देणगी आहे, चहा ही इंग्रजांची देणगी आहे, व्हॅलेंटाइन डे ही युरोपीयांची देणगी आहे, तशीच नूडल्स ही चीनची देणगी आहे. चिनी मालावर बहिष्कार टाकण्याचा कितीही संकल्प केला, तरी नूडल्सना रोजच्या जगण्यातून हद्दपार करणं म्हणजे चहाऐवजी ग्रीन टी पिण्याच्या संकल्पाएवढंच कठीण काम आहे. एकवेळ बायकोबरोबरच्या भांडणात आपण जिंकल्याचा काही काळ आनंद घेता येईल, जवळच्या नातेवाइकांच्या प्रश्नांच्या सरबत्तीला यशस्वीपणे तोंड देता येईल, रोज मॉर्निंग वॉकचा दृढनिश्चय चक्क महिनाभर सुरळीतपणे, विनाअडथळा पार पाडता येईल, पण नूडल्सशिवाय जगणं? अशक्य! नूडल्सचे अनेक प्रकार आहेत. खरंतर नूडल्स हा पदार्थ चीनचा मानला जात असला, तरी आपल्याला हा प्रकार अगदीच नवीन नाही. आपल्याकडच्या शेवया म्हणजे याच नूडल्सची मावसबहीण. दोघींचं माहेर एकच. वळायची पद्धत एकच. शेवया गहू, तांदूळ, नाचणीपासूनही केल्या जातात, तर नूडल्सचा मुख्य आधार मैदा हा असतो, एवढाच फरक. अर्थात, शेवयांपासून गोड, तिखटाचे वेगवेगळे पदार्थ तयार होतात, ते वैशिष्ट्य नूडल्समध्ये नाही. नूडल्सचा चमचमीत आणि चटपटीतपणा शेवयांमध्ये नाही, असंही नूडल्सप्रेमी सांगू शकतील. नूडल्स हा खास चायनीज हॉटेल्समध्ये (म्हणजे, चीनमधून आपल्याकडे आलेले पदार्थ मिळण्याचं भारतीय ठिकाण!) खाण्याचा पदार्थ आहे. नूडल्स आणि त्याबरोबर मिळणारे सॉस, ते करण्याची पद्धत, हा काहींच्या अगदी आवडीचा, तर काहींच्या अतिशय तिटकाऱ्याचा विषय असू शकतो. चीनला आपला कितीही विरोध असला, तरी नूडल्स हा चमचमीत पदार्थांच्या यादीत पहिल्या दहामध्ये येणारा प्रकार आहे, हे नाकारता येणार नाही. घरीसुद्धा उत्तम प्रकारे नूडल्स करता येतात आणि मोकळ्या, स्वच्छ, आरोग्यदायी वातावरणात खाता येतात. आज शिकूया, हक्का नूडल्स.

[/content_full]

[row]

[two_thirds]

साहित्य


  • १ पाकीट चायनीज नूडल्स
  • तेल अंदाजानुसार
  • १/२ टी स्पून सोया सॉस
  • ५ मोठ्या लसूण पाकळ्या
  • १/२ इंच आलं
  • २ हिरव्या मिरच्या
  • १ टी स्पून चिली सॉस
  • चवीपुरते मीठ
  • १/२ टी स्पून व्हिनेगर
  • भाज्या: भोपळी मिरची, गाजर, कोबी, कांदापात – पातळ उभे चिरून
    (शिजलेल्या नूडल्सच्या १/३ प्रमाणात सर्व भाज्या सम प्रमाणात घ्याव्यात.)

[/two_thirds]

[one_third]

पाककृती


  • नूडल्स बुडतील इतके पाणी घेऊन त्यात १ चमचा मीठ आणि एक चमचा तेल घालावे.
  • पाण्याला उकळी आली कि नूडल्स घालून शिजवाव्यात. नूडल्स जास्त शिजवू नयेत.
  • नूडल्स शिजल्या कि लगेच चाळणीत काढून गार पाण्याखाली धराव्यात. पाणी निघून गेले की तेलाचा हात लावून ठेवाव्यात.
  • आलं, लसूण, मिरचीची पेस्ट करून घ्यावी.
  • कढईत तेल गरम करावे. त्यात आलं, लसूण, मिरची पेस्ट घालून परतावे.
  • सर्व भाज्या घालून परतावे. भाज्या अर्धवट शिजवून घ्याव्यात.
  • सोया सॉस, व्हिनेगर, ग्रीन चिली सॉस घालून मिक्स करावे.
  • चवीनुसार थोडे मीठ घालावे.
  • नंतर शिजवलेल्या नूडल्स घालून एकजीव करून एक वाफ आणावी.
  • वरून कांद्याची पात घालून सर्व्ह करावे.

[/one_third]

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

[/row]