भारतीय जेवण म्हटलं की, थाळीशिवाय अपूर्णच वाटते. त्या थाळीत चपाती-भाजी, वरण-भात वा आमटी-भात, असं काहीतरी असायलाच हवं. पण, अनेकदा असं होतं की, आपल्याकडून जरा जास्तच अन्न बनतं आणि ते रात्रीच्या जेवणानंतर उरतं. काही लोक ते सकाळी पुन्हा गरम करून खातात; तर काही जण सरळ कचर्यात टाकून देतात. पण, खरं तर उरलेलं अन्न हे कंटाळवाणं किंवा वाया घालवण्यासारखं नसून, त्याचा योग्य त्या पद्धतीनं उपयोग केला गेला, तर त्यातून चविष्ट पदार्थ तयार होऊ शकतात. थोडी कल्पनाशक्ती, काही घरगुती युक्त्या वा जुगाड आणि थोडी चविष्ट मसाल्यांची जोड दिली तर रात्रीच्या उरलेल्या अन्नाचा वापर करून उत्तम अशी नवी डिश तयार होऊ शकते. उरलेल्या चपाती-भाजी, वरण-भात किंवा फ्रिजमध्ये ठेवलेला ब्रेड यांचा उपयोग करून, तुम्ही झटपट स्नॅक्स, नाश्त्याचे पदार्थ आणि पराठे सहज तयार करू शकता. एवढंच नव्हे, तर हे पदार्थ इतके चवदार लागतात की, घरातल्या मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळे पुन्हा पुन्हा खाण्याची मागणी करतात.
भाजीपासून बनवा भरलेले पराठे
रात्री उरलेली बटाटा, पनीर, फ्लॉवर यांपैकी एखादी भाजी किंवा मिश्र शाकाहारी भाजी फेकून देऊ नका. सकाळी या भाजीचं सारण तयार करून, ते पराठ्याच्या पिठात भरून तव्यावर खरपूस भाजा. त्यात थोडा कांदा, कोथिंबीर व हिरवी मिरची यांचा वापर केला, तर हे पराठे अधिक चविष्ट होतील. गरमागरम पराठ्याबरोबर लोणचं किंवा दह्यासोबत खाल्लं की, हा नाश्ता करण्यास मजा येईल.
चपातीपासून बनवा क्रिस्पी चिप्स
बर्याचदा चपात्या जास्त होतात आणि सकाळी त्यांना कोणी हात लावत नाही. पण, या जुन्या चपात्या चिप्समध्ये बदलल्या, तर घरची लहान मुलं याची मागणी करतील. चपात्या त्रिकोणी किंवा गोल कापा. त्यावर मीठ, मिरची, चाट मसाला भुरभुरा. नंतर त्यांना तेलात तळा किंवा एअर फ्रायरमध्ये क्रिस्पी करा. टीव्ही पाहताना अशा चटकदार नाश्त्याचा आस्वाद घेताना येणारी मजा काही वेगळीच असते
वरणापासून बनवा पकोडे किंवा पराठे
उरलेल्या डाळीचं काय करायचं हा प्रश्न प्रत्येक घरात पडतो; पण त्यावर शोधलेलं उत्तर तुम्हाला नव्या चवीकडे नेऊ शकतं. या डाळीत बारीक चिरलेला कांदा, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर व बेसन टाकून छोटे छोटे पकोडे तळा. किंवा पिठात मिसळून मस्त पराठे भाजा. मग तुमच्यासाठी चहा किंवा दह्यासोबत पोटभर स्नॅक तयार होतो.
भातापासून करा कटलेट
रात्रीचा भात फेकण्याऐवजी सकाळी त्यापासून नवा पदार्थ तयार करा. भातामध्ये उकडलेले बटाटे, कांदा, हिरव्या मिरच्या व मसाले टाका. कटलेटचा आकार देऊन, तव्यावर शॅलो फ्राय करा. बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊ असे हे कटलेट्स मुलांना डब्यातही देता येतात.