[content_full]

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

`शाकाहार योग्य की मांसाहार?` या विषयावरचा परिसंवाद रंगात आला होता. दोन्ही बाजूचे वक्ते तावातावाने बोलत होते. सात्विक आहार आणि विचार संघटनेनं आयोजित केलेल्या सदाचार परिषदेत हा परिसंवाद रंगला होता. अर्थातच दोन्हीकडचे वक्ते पट्टीचे होते. आपापली बाजू ते अतिशय आक्रमकपणे आणि न्यूज चॅनेल्सच्या anchors ना ही लाजवेल, अशा पद्धतीने मांडत होते. आपला मुद्दा योग्यच असल्याची त्यांना खात्री होती, त्यामुळे समोरच्या माणसाचं म्हणणं ऐकून घेण्याचा प्रश्नच नव्हता. शाकाहाराचा पुरस्कार करणाऱ्यांनी शाकाहाराचं महत्त्व सांगितलं. सहज उपलब्ध, कुणालाही त्रास न देता केलेला आहार, स्वस्तातलं अन्न, शेतकऱ्याला मदत आणि पर्यायानं देशभक्ती, असा व्यापक विचार त्यांनी मांडला. मांसाहार म्हणजे मुक्या जिवांची हत्या, प्राण्यांना त्रास, दुर्गंधी, अतिरिक्त खर्च, साफसफाई, पचनाचे त्रास, आरोग्याचा धोका, हे मुद्देही हिरिरीने मांडले. मांसाहाराच्या बाजूनं लढणाऱ्या वक्त्यांनी मग शाकाहारींवर ताव मारला. त्यांचे संकुचित मेंदू भाजून खाल्ले, त्यांच्या हळव्या मनांच्या चिंध्या उडवल्या, त्यांच्या कोमल काळजाचे कलीजा फ्राय केले. मांसाहार हेच माणसाचं पूर्वापार अन्न आहे आणि माणूस कंदमुळांच्या आधी मांसाहार कसा करायला शिकला, इथपर्यंत संदर्भ दिले. वनस्पतींमध्येही प्राण असतो आणि शाकाहार हासुद्धा एक प्रकारे मांसाहारच कसा आहे, याचे दाखले दिले. ऐन रंगात आलेला हा परिसंवाद अचानक आटोपता घेतला गेला, त्यामागे फक्त वेळ संपल्याचं कारण नव्हतं. स्टेजच्याच मागच्या बाजूला शिजत असलेल्या खमंग पदार्थांचा वास स्टेजपर्यंत दरवळायला लागला होता. मंडळींनी आपापल्या तलवारी म्यान केल्या आणि (मानधनाची पाकिटं घेऊन) सगळे संयोजकांच्या आग्रहाखातर भोजनगृहाकडे मार्गस्थ झाले. आज वक्त्यांसाठी खास कोळंबी पुलावाचा बेत होता. सगळ्यांनी त्यावर मनसोक्त ताव मारला आणि पुढचा परिसंवाद कुठे आणि कधी घ्यायचा, यावरही चर्चा केली. एका तत्त्वावर त्यांचा गाढ विश्वास होता. मतभेद कितीही टोकाला जावोत, चर्चा महत्त्वाची!

मराठीतील सर्व रेसिपी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How to make prawns pulao maharashtrian recipe
First published on: 15-12-2016 at 01:15 IST