“देवा… आत्ताच केवढं गरम होतंय..” अशी वाक्य आता प्रत्येकजण म्हणत असेल. उन्हाचे वाढते तापमान, घाम, उकाडा, दिवसभर कामाची दगदग या सगळ्या गोष्टींमधून आपल्याला जेव्हा काहीतरी थंडगार खायला किंवा पायाला मिळते तेव्हा पोटाबरोबर मनाला थंडावा आणि तृप्ती मिळण्यास मदत होते. सरबत, मिल्कशेक, थंडगार कॉफी किंवा आईस्क्रीम अशा पदार्थांमुळेच खरंतर कडक उन्हाळाही सुकर होतो.

मात्र बाहेर जाऊन एखादी कोल्ड कॉफी पिण्यापेक्षा जर त्याच चवीची थंडगार कॉफी घरी बनवता येत असेल तर किती सोईचे होईल, नाही का? मग नुसता विचार कशाला, झटपट बनवूनसुद्धा पाहू. फेसाळ, घट्ट आणि आईस्क्रीम घातलेली कोल्ड कॉफी कशी बनवायची याची सोपी रेसिपी bhannat_swaad या इन्स्टाग्राम अकाउंटने शेअर केली आहे. तसेच त्या कॉफीला कॅफेसारखा घट्टपणा कसा आणायचा याची एक भन्नाट ट्रिकदेखील पाहूया. चला तर झटपट पदार्थाची रेसिपी बघा आणि करून पाहा.

हेही वाचा : Holi recipe : ‘होळी रे होळी पुरणाची पोळी’! पाहा पदार्थाचे अचूक प्रमाण अन् पुरण वाटायची सोपी पद्धत

आईस्क्रीम कोल्ड कॉफी

साहित्य

कॉफी पावडर
साखर
पाणी
दूध [फुल फॅट]
बर्फाचे खडे
व्हॅनिला आईस्क्रीम
गाळणे

कृती

सर्वप्रथम एका बाऊलमध्ये एक ते दीड चमचा कॉफी पावडर घालून घ्या.
त्यामध्ये साधारण एक चमचा साखर घालावी.
आता कॉफी पावडर आणि साखरेच्या मिश्रणात १ ते २ चमचे पाणी घालून घ्या.
आता चहा गाळायच्या स्वच्छ गाळणीने बाऊलमधील कॉफी, साखर आणि पाणी घातलेले मिश्रण चांगले फेटून घ्यावे.
अंदाजे ५ ते १० मिनिटे बाऊलमधील कॉफी गाळण्याने फेटून घेतल्यावर कोल्ड कॉफी बनवण्यासाठी कॉफीचे फेसाळ आणि घट्टसर मिश्रण तयार होईल.

हेही वाचा : Recipe : उन्हाळ्यात बनवा खास थंडगार ‘पेरू आइस्क्रीम’! केवळ चार पदार्थांमध्ये होईल तयार; पाहा रेसिपी…

आता एका काचेच्या ग्लासमध्ये सुरवातीला बर्फाचे चार ते पाच खडे घालून त्यावर थोडे व्हॅनिला आईस्क्रीम घाला.
आता आईस्क्रीमवर तयार केलेल्या कॉफीच्या मिश्रणाचे २ ते ३ चमचे घालावे.
तुम्हाला हवे असल्यास त्याच कॉफीच्या मिश्रणाच्या मदतीने ग्लासला आतल्याबाजूने थोडी सजावट करून घ्यावी.
ग्लासमधील मिश्रणात थंडगार दूध ओतून पुन्हा त्यामध्ये थोडे व्हॅनिला आईस्क्रीम घाला.
सर्वात शेवटी तयार कॉफीचे मिश्रण घालून आपल्या तयार झालेल्या कोल्ड कॉफीची सजावट करावी.
यंदाच्या उन्हाळ्यात उन्हाची काहिली कमी करण्यासाठी या कोल्ड कॉफीची चांगलीच मदत होईल.

टीप – तुमच्या आवडीनुसार कॉफी आणि साखरेचे प्रमाण कमी किंवा अधिक करावे. वरील प्रमाण ही अंदाजे दिलेले आहे.

इन्स्टाग्राम या सोशल मीडियावरील @bhannat_swaad नावाच्या अकाउंटने कोल्ड कॉफीची हे अतिशय साधी आणि सोपी अशी रेसिपी शेअर केलेली आहे. या रेसिपी व्हिडीओला आत्तापर्यंत ६७.३K इतके व्ह्यूज मिळाले आहेत.