घरातील फ्लॉवर, बटाटा, भेंडीची भाजी खाऊन कंटाळा आला की, लगेच आपल्याला हॉटेलमध्ये जेवायला जाण्याची इच्छा होते. हॉटेलमध्ये जाऊन आपण नेहमी न खाणाऱ्या भाज्या, ग्रेव्ही किंवा इतर पदार्थ मागवतो. त्यामध्ये पनीर हा पहिल्या क्रमांकावर येत असला तरीही त्याच्यापाठोपाठ लगेचच मशरूमचा नंबर लागतो. मशरूम मसाला, मशरूम हंडी, मशरूम कढई असे कितीतरी प्रकार या एका पदार्थापासून बनवले जातात. जर झणझणीत काही खायचे नसेल, तर बहुतेकदा आपली पहिली निवड ही क्रिमी मशरूम ग्रेव्हीची असते.
आता घरी मशरूमपासून काही पदार्थ बनवायचे म्हटले, तर बऱ्याच जणांना तो कसा बनवायचा हे समजत नाही. इतर भाज्यांप्रमाणे त्याला पटकन फोडणी दिली की, काम झाले, असे हे प्रकरण नाही. त्यामुळे अनेकदा इच्छा असूनही मशरूम घरी बनवणे टाळले जाते. परंतु, इन्स्टाग्राम या सोशल मीडियावर @mygardenofrecipes या अकाउंटद्वारे शेअर केल्या गेलेल्या व्हिडीओमध्ये ‘क्रिमी मशरूम राईस बाउल’च्या रेसिपीमध्ये हॉटेलसारखी क्रिमी आणि स्वादिष्ट मशरूम ग्रेव्ही कशी बनवायची ते सांगितले आहे. तुम्हीही ही रेसिपी एकदा बघा आणि बनवून पाहा.
हेही वाचा : कधी हिरव्या मिरचीच्या गोड हलव्याबद्दल ऐकलेय का? विचार नको; पाहा ‘ही’ रेसिपी करून….
क्रिमी मशरूम ग्रेव्ही रेसिपी
साहित्य
मशरूम
कांदा
लसूण
टोमॅटो
कोथिंबीर
बटर
क्रीम
चिली फ्लेक्स
मिक्स हर्ब्स
मिरपूड
मीठ
कृती
पूर्वतयारी–
सर्वप्रथम सर्व मशरूम पाण्यात स्वच्छ धुऊन आणि चिरून घ्या.
टोमॅटो मिक्सरवर वाटून, त्याची पेस्ट बनवून घ्या. [तयार टोमॅटो प्युरीही चालेल]
कांदा, कोथिंबीर व लसूण बारीक चिरून घ्या.
गॅसवर एक पॅन ठेवून, त्यामध्ये थोडे बटर घाला.
बटर वितळल्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालून हलके परतून घ्या.
आता त्यात मशरूम, बारीक चिरलेला लसूण आणि तयार टोमॅटोची पेस्ट घालून, सर्व पदार्थ व्यवस्थित ढवळा.
आता त्यामध्ये क्रीम, चिली फ्लेक्स, मिक्स हर्ब्स, मीठ, मिरपूड घालून, शेवटी पुन्हा एकदा आपली मशरूम ग्रेव्ही ढवळून घ्यावी.
गॅस बंद करायच्या काही मिनिटे अगोदर तयार झालेल्या ग्रेव्हीमध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाका.
क्रिमी मशरूम ग्रेव्ही तयार आहे.
ही ग्रेव्ही तुम्ही भात किंवा जिरा राइससोबत खाऊ शकता.
@mygardenofrecipes या अकाउंटद्वारे शेअर केलेल्या या व्हिडीओला आजपर्यंत दोन दशलक्ष इतके व्ह्युज मिळाले आहेत.