Nachni Papad Recipe: उन्हाळ्याला सुरुवात झाली की अनेक महिला घरातच लोणची, पापड, कुरडया, सांडगे बनवायला सुरुवात करतात. उडदाचे, साबुदाण्याचे, तांदळाचे पापड कसे बनवायचे हे अनेकांना माहीत असतं. पण, आज आम्ही तुमच्यासाठी नाचणीचे पौष्टिक पापड कसे बनवायचे हे सांगणार आहोत. नाचणीत कॅल्शियमबरोबरीने लोह, नायसिन, थायमिन, रिबोफ्लेविन ही महत्त्वाची पोषकद्रव्ये असतात. शिवाय यामुळे अशक्तपणादेखील दूर होण्यास मदत होते. शरीरात हिमोग्लोबिनची कमतरता असल्यासदेखील नाचणीचे पदार्थ खाणं फायदेशीर आहे.

नाचणीचे पापड बनवण्यासाठी साहित्य :

१. १ किलो ग्राम नाचणीचे पीठ
२. १ चमचा पापड खार
३. दीड चमचा तीळ
४. दीड चमचा जिरे
५. दीड चमचा हिंग
६. मीठ चवीनुसार

हेही वाचा: उपवासाला वरई, साबुदाणा खाऊन कंटाळलात? मग नक्की करून पाहा रताळ्याची चटपटीत कचोरी

नाचणीचे पापड बनवण्याची कृती:

१. सर्वात आधी नाचणी धुवा आणि ती वाळवून घ्या, त्यानंतर ती गिरणीतून दळून आणा.

२. त्यानंतर एका जाड पातेल्यामध्ये दोन लिटर पाणी गरम करायला ठेवा आणि
आता त्यामध्ये पापड खार, हिंग, जिरे, तीळ, मीठ घालून पाणी उकळल्यावर त्यात नाचणीचे पीठ घालून मिक्स करा.

३. नाचणीचे पीठ शिजल्यानंतर थोडे पीठ परातीत काढून घ्या.

४. काही वेळाने थंड झाल्यावर ते मळून घ्या आणि एका प्लास्टिकच्या पेपरला तेल लावून पापड लाटून घ्या.

५. पापड थोडा मोठा लाटून लहान वाटीने लहान पापड कापून घ्या.

६. अशा पद्धतीने तुमचे नाचणीचे पापड तयार होतील.