Walnuts Recipe For Weight Loss: सुक्यामेव्यातील एक अविभाज्य घटक म्हणजे अक्रोड. फार गोडवा नसला तरी एक वेगळ्याच धाटणीची चव असलेला कुरकुरीत आक्रोड अनेकांना आवडतो. आहारतज्ज्ञ तर मानवी मेंदूप्रमाणे दिसणाऱ्या या अक्रोडाला सुपरफूड म्हणून ओळखतात. तुम्ही आजवर अक्रोडाचे अनेक फायदे ऐकले असतील पण तुम्हाला वजन कमी करण्यासाठी अक्रोड कशी मदत करू शकतो हे माहितेय का?

अक्रोडमध्ये ओमेगा-३ फॅटी ऍसिडस्, अँटिऑक्सिडंट्स, जीवनसत्त्वे आणि खनिजे यांसह आवश्यक पोषक तत्वांचा खजिना असतो, ज्यामुळे तुमचे वजन नियंत्रित करताना तुम्ही तुमच्या शरीराचे पोषण मात्र कमी करत नाही याची खात्री होते. अक्रोडमधील फायबरमुळे चयापचय क्रिया सुद्धा वेगाने होण्यास मदत होते असे म्हणतात. आता इतके सगळे फायदे पाहिल्यावर आपल्याही आहारात अक्रोडाचा समावेश करावा असे तुम्हाला वाटत असेल. पण अक्रोडाची चव काही गोड किंवा चमचमीत नसते त्यामुळे असेच मूठभर अक्रोड खाऊ म्हणून खाल्ले जात नाहीत. याऐवजी आपण आज अक्रोड वापरून तुम्ही वजन कमी करण्याच्या काही रेसिपी कशा बनवू शकता हे पाहणार आहोत.

अक्रोड व योगर्ट (Walnuts Yoghurt)

वजन कमी करण्याच्या आहारात तुम्ही अक्रोडाचे दह्यासह (घट्ट योगर्टसह) सेवन करू शकता. ग्रीक योगर्टकिंवा वनस्पती-आधारित पर्याय जसे की बदाम किंवा नारळाच्या दुधाने बनवलेले योगर्ट खात असताना त्यात अक्रोड टाकल्यास त्याची चव, व पौष्टिक मूल्य वाढू शकतात. मलईदार दही आणि कुरकुरीत अक्रोडाचे मिश्रण बेस्ट ब्रेकफास्ट ठरू शकतो.

अक्रोड ओट्स किंवा स्मूदी (Walnuts Smoothie)

तुम्ही ब्रेकफास्टला ओट्स (शक्यतो गोड) किंवा एखाद्या फळाची स्मूदी बनवत असाल तर त्यात अक्रोडाचे काही तुकडे घालू शकतात. तुमच्या ब्रेकफास्टमध्ये फायबर आणि प्रथिने अधिक समाविष्ट होतील तसेच अक्रोडातील निरोगी फॅट्स आणि फायबरचे मिश्रण तुम्हाला पोटभर खाल्ल्याचा भास घडवून देऊ शकतात ज्यामुळे अनावश्यक मंचिंग टाळण्यास मदत होऊ शकते.

रोस्टेड नट्स (Roasted Nuts)

तुम्ही बाजारात छान मसालेदार रोस्ट केलेले काजू, मखाने, बदामही पाहिले असतील अगदी त्याच प्रकारे तुम्ही घरच्या घरी तव्यावर किंवा कढईत काही अक्रोड भाजून घेऊन त्यावर आवडीचे हर्ब्स टाकू शकता. पॉपकॉर्न किंवा चण्याच्या बाऊलमध्ये असे हर्ब्स घातलेले अक्रोड चविष्ट लागतात. तुम्हाला गोड पदार्थ म्हणून अक्रोड खायचा असेल तर यासह मनुके अन्य सुकवलेल्या बेरी यांचा सुद्धा समावेश करू शकता.

कमी कॅलरीचा अक्रोड केक (Walnuts Cake)

तुमच्या बेकिंग रेसिपीमध्ये अक्रोडाचा समावेश करून तुमचे वजन कमी करण्याच्या ध्येयाशी तडजोड न करता गोडाचे सेवन करू शकता. अक्रोड मफिन्स, कुकीज आणि केकसाठी जर तुम्ही हेल्दी पीठ, मध व मेपल सिरप सारखे पर्याय वापरले तर हा एक आरोग्यदायी आणि तरीही चविष्ट पर्याय ठरू शकतो.

हे ही वाचा<< १२ किलो वजन कमी करताना शेहनाज गिलने ‘या’ तीन ड्रिंक्सचे रोज केले सेवन; डाएट प्लॅन व वेटलॉस फंडा वाचा

अक्रोड आणि डार्क चॉकलेट एनर्जी बॉल्स (Walnuts Chocolate Energy Balls)

फूड प्रोसेसरमध्ये, अक्रोड, खजूर, थोड्या प्रमाणात डार्क चॉकलेट चिप्स, एक चमचा कोको पावडर आणि चिमूटभर समुद्री मीठ एकत्र करा. आपल्याकडील साहित्य चिकट कणकेसारखे तयार होईपर्यंत मिक्स करा. या मिश्रणाचे लहान गोळे करा आणि सेट करण्यासाठी सुमारे 30 मिनिटे थंड करा. हे एनर्जी बॉल्स हेल्दी फॅट्स, फायबर आणि नैसर्गिक गोडवा यांचे कमाल कॉम्बो ठरू शकतात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे. गरज भासल्यास वैद्यकीय सल्ला आवर्जून घ्या)