दोन तालेवार अभिनेते आणि त्यांची जुगलबंदी हे खरे म्हणजे ‘रणांगण’मागचे आकर्षण म्हणायला हवे. एकाच घरातील दोन समर्थ व्यक्तिरेखांचा संघर्ष मग तो सत्तेसाठी असेल किंवा प्रेमासाठी.. हे नाटय़ अनेकांच्या आवडीचे असते. राकेश सारंग दिग्दर्शित ‘रणांगण’ चित्रपटाचे प्रोमोज पाहिल्यानंतर हाच संघर्ष, जुगलबंदी पाहायला मिळेल, अशी अपेक्षा होती. चित्रपटात सचिन पिळगावकर आणि स्वप्निल जोशी यांच्यातील नाटय़, जुगलबंदी अनुभवायला मिळते मात्र त्यासाठी जे नाटय़ रंगवण्यात आले आहे त्याची इतकी नाटय़मय मांडणी करण्यात आली आहे की त्या ओघात या संघर्षांची धारच हरवून बसते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

देशमुख घराण्याभोवती ही कथा फिरते. शिक्षणसम्राट असलेले श्यामराव देशमुख (सचिन पिळगावकर) यांना त्यांच्या घरासाठी वारस हवा आहे. त्यांच्या ओळखीतील गुरुजींची नात सानिका (प्रणाली घोगरे)लग्नाआधीच गर्भवती राहिली आहे. तिचे लग्न आपल्या मुलाशी वरदशी (सिद्धार्थ चांदेकर) लावून देत तिचे आयुष्य मार्गी लावण्याचा सोपस्कार देशमुख करतात. मात्र लग्नानंतर घरी आलेल्या या सूनेची गाठ श्लोकशी (स्वप्निल जोशी)पडते. श्लोकला पाहून सानिका गर्भगळीत होते. त्यानंतर प्रत्येक प्रसंगात श्लोक बासरी वाजवत राहतो, सानिका त्याच्या मागे जाते आणि त्याला पाहिल्यावर आजारी पडते. सानिकाचा आजार वरदच्या लक्षात येत नाही, मात्र श्यामरावांच्या लक्षात येतो. चित्रपटाच्या अगदी सुरुवातीच्या काही प्रसंगातून आपल्या प्रेयसीला कडय़ावरून लोटून देणारा श्लोक आपण पाहिला असल्याने तो खलनायक आहे हे एव्हाना आपल्या मनात पक्कं बसलेलं आहे. त्यामुळे श्लोक विरुद्ध श्यामराव हा संघर्ष आपल्याला अपेक्षितच असतो. सुरुवातही तशीच होते, मात्र शेवटाला जे नाटय़ घडते ते पाहता ना खलनायक खरा वाटत ना त्यांचा संघर्ष..

तद्दन फिल्मी धाटणीची कथा आणि त्याच फिल्मी पद्धतीची मांडणी यामुळे ताकदीचे कलाकार असूनही ‘रणांगण’ची खेळी फोल ठरली आहे. कथेतच नाही तर पात्रांकडून अपेक्षा काय करायची? खरे तर चित्रपटाचे आधीचे नाव ‘वारस’ असे होते. चित्रपटाच्या उत्तरार्धात हेच नाव सार्थ होते असे वाटत राहते. ना धड या दोन्ही व्यक्तिरेखा वाईट म्हणून समोर येत ना चांगल्या.. जो चांगला दिसतो तो वाईट आहे आणि जो वाईट दिसतो तो चांगला आहे, अशीही फुटपट्टी लावली तरी दोघेही तितकेच गुन्हेगार आहेत. त्यामुळे चित्रपटातील या दोन प्रमुख व्यक्तिरेखांबद्दल प्रेक्षकांना कुठलाही भावनिक संबंध जोडता येत नाही. उलट चित्रपटभर बासरी आणि ‘सख्या रे घायाळ मी हरिणी’चे नाद घुमत राहतात. स्वप्निलच्या तोंडी असलेले बालभारतीचे संवादही त्यामुळे फिके पडतात.

त्यातल्या त्यात प्रेक्षकांची सहानुभूती तेवढी वरदच्या वाटय़ाला आली आहे, कारण चित्रपटात तो एकच संवेदनशील व्यक्ती आहे. फिल्मी मसाला आणि मांडणीला विरोध असण्याचे कारण नाही. मात्र त्यातले नाटय़ मनोरंजक असायला हवे, थरारक असायला हवे मात्र त्याच वेळी ते तर्काला धरूनही असायला हवे. ते हास्यास्पद झाले की त्यातला रस संपतो. जागोजागी केलेली मोठय़ा कलाकारांची आणि गाण्यांची पेरणीही चित्रपटाला साथ देत नाही. स्वप्निल जोशी आणि सचिन पिळगांवकर दोघांनीही चित्रपट उचलून धरला आहे. सचिन पिळगावकरांचा अभिनय ही अर्थातच प्रेक्षकांसाठी पर्वणी आहे. त्या अर्थाने, श्यामरावांची त्यांच्या वाटय़ाला आलेली भूमिका ही महत्त्वाची होती. त्यांनी या व्यक्तिरेखेला योग्य तो न्याय दिला आहे. त्या तुलनेत स्वप्निलने प्रचंड मेहनत घेतली असली तरी त्याचे पात्रच फसवे आहे. स्वप्निलची व्यक्तिरेखा खलनायकीच असती तर ती प्रेक्षकांनी आनंदाने स्वीकारली असती. मात्र त्यांच्यात घडणारे नाटय़च तकलादू मागणीवर आधारित आहे. आपलाच वारस असावा यासाठीचा श्यामरावांचा अट्टहास आणि त्यांचे अतिरेकी प्रयत्न तर माझ्या आईला न्याय द्या नाही तर मला माझा मुलगा द्या.. ही श्लोकची मागणीच क ळत नाही. त्यामुळे लुक आणि अभिनय या जोरावर स्वप्निलने रंगवलेला श्लोक खलनायकही वाटत नाही आणि नायक म्हणून त्याला कथेत जागाच दिलेली नाही. हे गोंधळलेपण त्याच्या व्यक्तिरेखेला घातक ठरले आहे. खरे तर या चित्रपटासाठी शारीरिक आणि मानसिक दोन्ही पद्धतीची स्वप्निलची मेहनत दिसून येते, मात्र त्याचा प्रभाव पडत नाही. पहिलाच चित्रपट असूनही प्रणाली घोगरेने सानिकाची भूमिका उत्तम निभावून नेली आहे. कथेत क्षमता असूनही दिग्दर्शक राकेश सारंग यांच्या नाटय़मय मांडणीच्या अट्टहासामुळे हे ‘रणांगण’ ताकदीचे योद्धे असूनही प्रभावी ठरत नाही.

रणांगण

  • दिग्दर्शक – राकेश सारंग
  • कलाकार – स्वप्निल जोशी, सचिन पिळगावकर, सिद्धार्थ चांदेकर, प्रणाली घोगरे, सुचित्रा बांदेकर, आनंद इंगळे.
मराठीतील सर्व चित्रपट समिक्षण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: %e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%9f%e0%a5%9f%e0%a4%ae%e0%a4%af %e0%a4%b0%e0%a4%a3%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%97%e0%a4%a3
First published on: 12-05-2018 at 02:30 IST