दिग्दर्शक बदलला की एकाच गोष्टीकडे पाहण्याचा पूर्ण वेगळा दृष्टिकोन आपल्याला मिळतो. छोटय़ा छोटय़ा शहरांतून फुलणाऱ्या प्रेमकथा गेल्या काही वर्षांत अनेकदा पाहायला मिळाल्या आहेत आणि त्यांना लोकांनी डोक्यावरही घेतले आहे. पण अलंकृता श्रीवास्तव जेव्हा याच शहरांतल्या चार स्त्रियांची ‘लिपस्टिक अंडर माय बुरखा’ घेऊन येते तेव्हा एक वेगळा आयाम नजरेसमोर येतो. अश्विनी अय्यर तिवारी दिग्दर्शित ‘बरेली की बर्फी’ हा ‘लिपस्टिक..’ इतका अर्थपूर्ण नाही. पण यातही ‘बर्फी’ प्रतीकात्मक घेत बरेलीतील एका हसऱ्या-खेळकर आणि बंडखोर तरुणीची कथा पाहायला मिळते. हलकीफुलकी आणि नावाप्रमाणेच चित्रपटाची प्रकृतीही गोड असल्याने तुमच्या चेहऱ्यावर हसू पसरवणारा असा हा चित्रपट आहे.

जग कितीही आधुनिक झाले, बदलले तरी उत्तर प्रदेश असो वा महाराष्ट्र इथल्या छोटय़ा-छोटय़ा शहरांमधून गोष्टी अजून फार बदललेल्या नाहीत. भौतिक सुखाचे बदल सगळीकडे दिसत असले तरी त्यामुळे लोकांच्या दृष्टिकोनात जो बदल व्हायला हवा होता तो अभावानेच आढळतो. नाही म्हणायला बिट्टीला पाहायला आलेला मुलगा तिला एकांतात सगळ्यात पहिला प्रश्न विचारतो तो ते ती ‘व्हर्जिन’ आहे का?, स्वयंपाकावरून व्हर्जिनिटीपर्यंत झालेला प्रश्नांतला बदल तेवढा ठळकपणे जाणवतो. दोनदा साखरपुडा होऊन लग्न मोडले, मुलांकडून नकार आला म्हणून नाराज असलेली बिट्टी (क्रिती सनन) आईच्या सततच्या तक्रारीमुळे एका रात्री घर सोडायचा निर्णय घेते. त्या रात्रीत तिच्या हातात एक कादंबरी लागते. ती वाचल्यानंतर आपल्यासारख्या नाचायला आवडणाऱ्या, सिगारेट ओढणाऱ्या, रात्री भटकणाऱ्या, मनमुराद गप्पा मारणाऱ्या मुली आणखीही आहेत. आणि त्या आहेत तसे त्यांना स्वीकारणारे तरुणही आहेत हे समजल्यानंतर ती मनोमन सुखावते. आणि मग सुरू होतो या पुस्तकाच्या लेखकाचा शोध. हा शोध पूर्ण करण्यासाठी तिला मदत करणारा चिराग (आयुषमान) आणि मग लेखकाच्या रूपात समोर आलेला प्रीतम विद्रोही (राजकुमार राव) या तिघांची ही मजेशीर गोष्ट आहे.

वाचा : सचिन- लक्ष्मीकांत बेर्डे यांचा घरोबा नव्या पिढीच्या साथीने जाणार पुढे

‘बरेली की बर्फी’ चित्रपटाचे सगळ्यात मोठे वैशिष्टय़ आहे ती मुख्य तीन पात्रांचीच नव्हे तर सगळ्या कलाकारांची निवड अचूक केली आहे. बिट्टीच्या भूमिकेत आपला अत्याधुनिक ग्लॅमरस अवतार सोडून बरेलीची तरुणी म्हणून क्रिती सनन अगदी सहजतेने फिट बसली आहे. आपली देहबोली-उच्चार या सगळ्यात बदल करत अत्यंत विश्वासाने क्रितीने बिट्टी साकारली आहे. बिट्टीचे हिरो म्हणून एकीक डे आयुषमान खुराणा आणि दुसरीक डे राजकुमार राव या दोघांनीही कमाल केली आहे. राजकुमार राव इथे जास्त प्रभावी ठरतो. कारण एकाच व्यक्तिरेखेत त्याला दोन प्रतिमा रंगवायच्या आहेत. एक अगदी मुळातला साधाभोळा तरुण. जो चिरागच्या दबावाखाली ‘रंगबाज’ तरुण होण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे एकाचवेळी या दोन वेगवेगळ्या प्रतिमा रंगवण्याचे आव्हान राजकुमारने सहज पेलले आहे. पटकथेतही राजकुमारची भूमिका आयुषमानच्या व्यक्तिरेखेवर भारी पडते. त्यामुळे पडद्यावर राजकुमार जास्त भाव खाऊन गेला आहे. आयुषमानला या भूमिकेत पाहणे नवीन नाही. पण त्याची आणि राजकुमारची मैत्रीची केमिस्ट्री एकीकडे, एकाच मुलीवरून झालेल्या वादानंतर बदललेला रागरंग असे वेगळे कंगोरे चित्रपटाला आहेत. बिट्टीच्या आईच्या भूमिकेत सीमा पहावा या जशा वेगळ्या ठरतात. तसेच आजवर कित्येकदा खलनायकी किंवा पोलिसांच्या भूमिकेत अडकलेल्या अभिनेता पंकज त्रिपाठी यांना बिट्टीच्या वडिलांच्या भूमिकेत पाहणे हा मजेशीर अनुभव आहे. आयुषमानचा मित्र आणि बिट्टीची मैत्रीण या दोन्ही व्यक्तिरेखाही मस्त रंगवल्या आहेत. एकूणच अभिनय आणि संवादाची भट्टी दिग्दर्शिकेने इतकी मस्त जमवली आहे की त्याचे अफलातून मिश्रण होऊन तयार झालेली ही बरेलीची बर्फी मुळातच गोड आहे. अडचण फक्त एकच होते, चित्रपटाची मांडणी करताना दिग्दर्शिकने त्याला छुपे वळण देण्याचा प्रयत्न केला आहे तरीही पुढे काय होणार याची कल्पना त्याचवेळी येते. त्यामुळे केवळ कलाकार चित्रपट पुढे कसा नेतायेत, एवढी एकच उत्सुकता उरते. ती उत्सुकता टिकवण्याचे काम कलाकारांनी चोख निभावले असल्याने ही गोड, पचायलाही हलकीफुलकी अशी मनोरंजक बर्फी आपल्यासमोर येते. तिची चव जिभेवर खूप काळ रेंगाळणारी नाही, पण तेवढा मनोरंजनाचा गोडवा यात नक्कीच आहे.

वाचा : …तर १४ वर्षांपूर्वीच ‘बालिका वधू’मध्ये दिसले असते रणबीर- आलिया

 

चित्रपट समिक्षण- रेश्मा राईकवार