‘न्यूड’ अर्थात नग्न….. हा नुसता शब्द उच्चरला तरीही एक संकोचलेपणा पाहायला मिळतो, जाणवतो. पण हे असं नेमकं का, केव्हा आणि कसं होतं याच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न मात्र फार कमी लोकांनी केलाय. ज्यांनी तो प्रयत्न केलाय ते खरंच प्रशंसनीय. त्यातलंच एक नाव म्हणजे रवी जाधव. एखाद्या गोष्टीविषयी जेव्हा जास्त विचार केला जातो तेव्हा त्या विषयाच्या मुळाशी जात काहीतरी शोधण्यासाठी मनाची धडपड सुरु होते. रवी जाधव यांची हीच धडपड ‘न्यूड’च्या प्रत्येक दृश्यातून प्रेक्षकांना पाहायला मिळते.

रवी जाधव दिग्दर्शित न्यूड या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणारी पात्र म्हणजे यमुना, चंद्राक्का, लहान्या आणि या चित्रपटातील प्रत्येक घटक. गावाकडे नवरा, मुलगा असं कुटुंब असणाऱ्या ‘यमुना’चं विश्वं तसं फारसं मोठं नाही. पण, तिच्यातला खमकेपणाही काही केल्या लपलेला नाही. नवऱ्याच्या बाहेर असणाऱ्या भानगडी आणि आपल्या अंगावरचे दागिने, आपलं अस्तित्वं सर्व काही ओरबाडणाऱ्या त्या माणासाला क्षणाचाही विचार न करता यमुना सोडून थेट मुंबईची वाट धरते. आपल्या मावशीच्या आधाराच्या बळावर ती या शहरात येते. शहरात आल्यानंतर यमुनाच्या संघर्षासोबतच सुरुवात होते ती तिच्या मुलाची म्हणजे लहान्याच्या आयुष्यातील बदलांची आणि त्या बदलांमधून त्याच्यावर होणाऱ्या बऱ्यावाईट, बऱ्या म्हणण्यापेक्षा जास्त प्रमाणात होणाऱ्या वाईट संस्कारांची. यमुना ही आक्काच्या कुटुंबावर भार नको म्हणून या शहराच्या वाटा झिजवते खरी. पण, खरे रंग दाखवले नाही तर ही मुंबई कसली, याचा प्रत्यय तिला येतोच. इथे काम मिळवण सोपं नसलं तरीही अशक्य नक्कीच नाही ही या नाण्याची दुसरी बाजू.

यमुनेची कामासाठीची शोधमोहिम सुरु असतानाच ज्या नजरेतून या मायानगरीला टीपण्यात आली आहे त्या नजरेचीही दाद द्यावी तितकी कमीच. ‘न्यूड’मधील प्रत्येक दृश्य, प्रत्येक फ्रेम प्रेक्षकांना एका वेगळ्या दृष्टीकोनातून कथानक समजवण्याचा प्रयत्न करतेय याची अनुभूती होते. या दमदार कथानकाला साथ लाभली आहे ती म्हणजे तितक्याच वास्तवदर्शी आणि प्रभावी संवादांची. उगाचच अलंकारिक भाषेची उधळण न करता ती अलंकारिकता कथानकात येणाऱ्या प्रत्येक वळणामध्ये कायम ठेवण्यात रवी जाधव यशस्वी झाले आहेत असंच म्हणावं लागेल.

कामाच्या शोधात असणारी यमुना प्रतिष्ठीत अशा जे.जे. स्कूल ऑफ आर्टपर्यंत येऊन पोहोचते आणि न्यूड मॉडेलिंगच्या नव्या दुनियेत यमुना हळूच डोकावून पाहते. यमुनेसाठी प्रथमदर्शनी या साऱ्यामध्ये कलेपेक्षा प्रचंड अश्लीलताच दडलेली दिसते. पण, आक्काच्या सांगण्यावरुन तीसुद्धा काहीशा बुजलेल्या अवस्थेत चित्रकारांसाठी न्यूड मॉडेलिंग सुरु करते. कलाकारांच्या सानिध्ध्यात तिलाही एक कलात्मक नजर मिळते. ज्याला स्वप्नांची झालर असते. कलाकारांसमोर न्यूड मॉडेल म्हणून बसणारी यमुना याच कामाने आपल्या मुलालाही शिकवून मोठा करण्याची स्वप्न पाहते. मुळात त्याच्याचसाठी ती झटत असते. पण, आपलंच रक्त एका वळणावर आपल्यावर चुकीच्या पद्धतीने बोट उचलेल याची मात्र तिला पुसटशीही कल्पना नसते.

‘न्यूड’ या चित्रपटातून दिग्दर्शकाने न्यूड मॉडेलिंग या विषयाला अतिशय संवेदनशीलपणे हाताळत प्रत्ययकारी रुपात प्रेक्षकांसमोर सादर केलं आहे. प्रत्येक व्यक्तिरेखेला आपलं अस्तित्वं असून, अक्षरश: निर्जीव वस्तूंनासुद्धा या चित्रपटाने वाचा फोडली आहे असं म्हणायला हरकत नाही. एखाद्या स्त्रीकडे पाहणाऱ्या पुरुषांच्या भेदक नजरा आणि त्याच स्त्रीकडे किंबहुना नग्न स्त्रीकडे एका कलाकाराची रोखलेली नजर यात असणारा फरक चित्रपटातून लक्षात येतोच. पण, त्यासोबतच विचारसरणीमध्ये असणाऱ्या असुरी वृत्तीला सणसणीत चपराक देतो हेसुद्धा तितकच खरं.

चित्रपटात पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत झळकणाऱ्या नसिरुद्दीन शाह यांचं असणंही बरंच महत्त्वाचं ठरुन जातं. एक कलाकार म्हणून असणारी नजर आणि तो बाज त्यांच्या भूमिकेतून प्रेक्षकांची मनं पुन्हा एकदा जिंकून जातो. तर त्यांना भाबडे प्रश्न विचारणारी यमुना खरंच एखादीचं मन किती निर्मळ असू शकतं, याचा प्रत्यय देऊन जाते. कलाकारांच्या वाट्याला येणाऱ्या अडचणीसुद्धा या चित्रपटातून टीपण्यात आल्या आहेत. चित्रपटात येणारी गाणी, आणि पार्श्वसंगीत म्हणजे ‘न्यूड’ची जमेची बाजू. तंबोऱ्यापासून ते व्हायोलिनपर्यंत आणि लोकलमध्ये सुरु असणाऱ्या भजनांपर्यंतच्या प्रत्येक वाद्याच्या आवाजाच्या माध्यमातून ‘न्यूड’ बरंच काही सांगून जातो. यमुना आणि आक्का साकारणाऱ्या दोन्ही अभिनेत्रींचा पडद्यावरील वावर खरंतर ‘न्यूड’ आपल्यापर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्यास सर्वाधिक जबाबदार आहे हे खरं. अतिशय वेगळा आणि तितकाच संवेदनशील असं कथानक असणारा हा चित्रपट अभिनेत्री कल्याणी मुळे (यमुना) आणि छाया कदम (चंद्राक्का) खऱ्या अर्थाने जगल्या आहेत. त्यांना साथ मिळाली आहे ती म्हणजे मदन देवधर (लहान्या) या तरुण कलाकाराची. कलाकारांचा चांगलाच फौजफाटा गोळा करत रवी जाधव यांनी मोठ्या मेहनतीने चित्रपटरुपी कॅन्व्हासवर उतरवलेलं हे चित्र समाजाच्या विचारसरणीला भेदत अंगावर काटा आणतंय आणि मग नेमकं न्यूड काय? आपली विचारसरणी की हा समाज? हाच प्रश्न चित्रपगृहातून बाहेर पडताना सर्वांच्याच मनात घर करुन जातोय.

-सायली पाटील

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

sayali.patil@loksatta.com