दहशतवाद हा तसा कोण्या एका देशाचा शत्रू नाही. तो मानवतेचा शत्रू आहे आणि त्याच्याविरोधात लढायचे तर जात-पात-धर्म-देश सगळ्या भिंती मोडून एकत्र यायला हवे. हे सत्य असले तरी तो आताच्या परिस्थितीत भाबडा आशावादच. पण नेमका हाच भाबडा आशावाद रुपेरी पडद्यावर मांडताना लोकांच्या काळजाला हात घालण्याचे कसब बॉलीवूडमधल्या कसलेल्या दिग्दर्शकांकडे आहे. विशेषत: हाताशी सलमान खानसारखा लोकप्रिय हुकमी एक्का असेल तर अशा विषयांची मांडणी बिनधास्त ‘भाई’च्या खांद्यावर चित्रपटाच्या यशासह सगळे ओझे देऊन करता येते. ‘टायगर जिंदा है’ मध्ये कदाचित नाटकी वाटला असता असा दोन देशांमधला ‘भाई’चारा दिग्दर्शकाने संयत पद्धतीने तरीही व्यावसायिक मनोरंजनाची कास न सोडता यशस्वीपणे मांडला आहे.
‘एक था टायगर’ चित्रपटात अविनाश राठोड ऊर्फ मनीष झा ऊर्फ ‘टायगर’ हा भारताचा ‘रॉ’ एजंट आणि ‘झोया’ पाकिस्तान ‘आयएसआय’ची एजंट दोघेही मिशनवर असताना प्रेमात पडतात. आणि प्रेम की देश यापैकी एक निवडताना ‘प्रेमा’वर शिक्कामोर्तब होते, मात्र देश आणि काम दोन्ही सोडून आता दोघांनीही दूर ऑस्ट्रियामध्ये छोटेसे घर वसवले आहे. इथे दूर टायगरच्या मायदेशी एक बातमी येऊन थडकते. इराकमध्ये ४० परिचारिकांचे अपहरण करून त्यांना तेथील रुग्णालयात इराकमधील दहशतवादी संघटना आणि त्याचा प्रमुख अबू उस्मानने (सज्जाद देलफरोझ)ओलीस ठेवले आहे. त्यांना आठवडय़ाभरात तेथून सोडवले नाही तर अमेरिकी सैन्याच्या हल्ल्यात सगळेच बेचिराख होणार. एवढय़ा कमी वेळात या परिचारिकांना सोडवण्याच्या मिशनसाठी म्हणून ‘टायगर जिंदा है’चा नारा आळवला जातो. आणि इथून पुढे टायगर आणि त्याच्या टीमचे मिशन चित्रपटभर पाहायला मिळते. ‘एक था टायगर’चा सिक्वल असल्याने दोन चित्रपटांची तुलना करण्याचा मोह आवरत नाही आणि पहिला चांगला होता हे उत्तर झटक्यात मिळते. तरीही ‘टायगर जिंदा है’ हा सलमान खानचा आणखी एक यशस्वी चित्रपट ठरला आहे, हे कबूल केले पाहिजे इतकी चांगली भट्टी दिग्दर्शकाने जमवून आणलेली आहे. दोन्ही चित्रपटांचा आत्मा वेगळा आहे चेहरा एकच ‘टायगर’.
‘एक था टायगर’मध्ये दिग्दर्शक कबीर खानसाठी चित्रपटातली दोन देशांच्या दोन गुप्तहेरांची प्रेमकथा महत्वाची होती. तोही अॅक्शनपॅक्ड चित्रपट होता मात्र या चित्रपटात अॅक्शनचा डोस तुलनेने जास्त आहे. आणि मग सलमानला अॅक्शनला वाव मिळावा हे भारतीय परिचारिकांचे इराकी अपहरणनाटय़ आधारासाठी वापरण्यात आले आहे. त्यामुळे पहिला चित्रपट विषयाशी प्रामाणिक होता तर हा ‘टायगर’शी प्रामाणिक आहे त्यामुळेच असेल पण सलमान खानच्या चाहत्यांसाठी त्यांचा ‘हिरो’ जसा चित्रपटात दिसायला हवा, असायला हवा तसा तो दिसतो आणि जोरदार टाळ्या पडतात. मागच्या चित्रपटातून शेणॉय सर (गिरीश कर्नाड), टायगर आणि झोया यांच्याबरोबर तिसरी व्यक्तिरेखा आहे ती कॅप्टन अब्रार या पाकिस्तानी एजंटची भूमिका सिक्वलमध्ये पुन्हा पाहायला मिळते.
बाकी या वेळी मिशनसाठी सलमानबरोबर कुमद मिश्रा (शर्मा), अंगद बेदी (नवीन) अशी नवीन मंडळी आहेत. पण ही सगळीच मंडळी सध्या फॉर्मात असल्याने त्यांनी टायगरला साजेशी साथ दिली आहे. मूळ चित्रपट कबीर खानचा त्यामुळे त्याची कलाकार मंडळी आणि दिग्दर्शक अली अब्बास जफरची स्वत:ची निवडक कलाकार मंडळी अशी दोन पद्धतीची कलाकार मंडळी यात एकत्र आहेत. कुमुद मिश्रा अलीच्याच ‘सुलतान’मध्ये होते, शिवाय या चित्रपटात सुलतानच्या मित्राची भूमिका साकारणारा अनंत शर्मा यातही छोटय़ा पण महत्त्वाच्या भूमिकेत आहे. आणखी एक धमाल व्यक्तिरेखा या चित्रपटात आहे ती फिर्दोज झालेल्या परेश रावल यांची.. टायगरच्या अॅक्शनला विनोदाची फोडणी देत हलके -फुलके करण्याचे काम या मंडळींनी केला आहे. त्यामुळे हा चित्रपट अॅक्शन-विनोद यांनी परिपूर्ण आहे.
भारत-पाकिस्तान एकत्र येण्याचा प्रसंग हा या चित्रपटात शंभर टक्के यशस्वी ठरला आहे आणि त्याचे श्रेय दिग्दर्शक अली अब्बास जफरला द्यायलाच हवे. यशराजचा बिग बजेट चित्रपट आणि सलमानला असलेली हिटची गरज या दोन्हीची कावड अंगावर घेत ते पेलून धरत एक संपूर्ण मसालापट दिग्दर्शकाने दिला आहे. या क्षणाला निदान सलमानबरोबर त्याच्या चाहत्यांनाही अशाच चित्रपटाची गरज होती. कारण, काही काळ भारत-पाकिस्तान संबंध, इराक- तेलविहिरींचे राजकारण – अमेरिके चा हल्ला या सगळ्या घटना तपशीलवार दिग्दर्शकाने चित्रपटात नावासाठी घेतल्या आहेत मात्र त्या पाहताना चित्रपटगृहात सन्नाटा पसरतो. ही शांतता तेव्हाच भंग होते जेव्हा एकटा सलमान बंदूक घेत धाड-धाड-धाड करीत समोरच्या दहशतवाद्यांना मारताना दिसतो किंवा अंगावरचा शर्ट काढून जीवघेण्या संकटातूनही शत्रूवर हल्ला चढवत थाटात बाहेर येतो. तेव्हा टाळ्या आणि शिटय़ांनी त्याचे स्वागत होते. सलमान या भूमिकांना सरावला असल्याने इथे त्याने नेहमीप्रमाणे सगळ्यांना चीत केले आहे.
‘एक था टायगर’पेक्षा या चित्रपटात त्याने साहस दृश्यांवर मेहनत घेतलेली दिसून येते. शिवाय, त्याचे वय लक्षात घेता त्याला चित्रपटभर कुठल्याही गाण्यांवर नाचवण्याचा मोह दिग्दर्शकाने टाळला आहे. चित्रपटात सुरुवातीला एक प्रेमगीत आहे जे पाश्र्वभूमीवर वाजते. चित्रपट संपल्यावर दिसणारे ‘स्व्ॉग से स्वागत’ सोडले तर तो कुठेही नाचताना दिसलेला नाही. कतरिना कैफ झोयाच्या भूमिकेत पुन्हा भाव खाऊन गेली आहे. या वेळी हिंदीच्या उच्चारांबरोबरच तिने उत्तम साहस दृश्ये दिली आहेत. या चित्रपटाचा कितीही जमाखर्च मांडला तरी हा चित्रपट ‘टायगर’चा आहे आणि अली अब्बास जफरने प्रेक्षकांची अचूक नस पकडत त्यांना हवा तसा त्यांचा ‘टायगर’ पुन्हा मिळवून दिला आहे हेच तिकीटबारीवरचे खणखणीत सत्य आहे!
चित्रपट : टायगर जिंदा है
- दिग्दर्शक – अली अब्बास जफर
- कलाकार – सलमान खान, कतरिना कैफ, गिरीश कर्नाड, अनंत शर्मा, परेश रावल, अंगद बेदी, सज्जाद देलफरोझ.