अनेकदा आपलं एखाद्या माणसावर अतोनात प्रेम असतं. त्याच्यावर विश्वास ठेवून आपणं भविष्याची स्वप्नही रंगवत असतो. प्रत्यक्षात जेव्हा त्या व्यक्तीसोबत राहायला लागतो तेव्हा मात्र त्याच्यातल्या उणीवा आणि अपेक्षा यांची जाणीव व्हायला लागते. त्यातून मग मनाला प्रश्न विचारला जातो की आपण या व्यक्तीसोबत राहणं खरंच गरेजचं आहे का? हा प्रश्न तुमच्या आमच्या सर्वांच्याच मनात येत असेल.. या प्रश्नाचं उत्तर आपल्या परिने देण्याचा दिग्दर्शक विक्रम फडणीसने प्रयत्न केला आहे.
कोणालाही हेवा वाटेल असं शेखर जोशी (सुबोध भावे) आणि समायरा जोशी (मुक्ता बर्वे) हे जोडपं. पण चार भिंतीच्या आत दोघांमध्ये आदर्श असं काहीच नसतं. शेखरला व्यवसायापुढे कुटुंबाला वेळ देता येत नाही तर समायराला तो वेळ का देत नाही या प्रश्नाचं उत्तर मिळत नाही. नात्याच्या या गुंतागुंतीत समायराचं मन त्यांच्या दोन मुली नित्या आणि नायशा यांच्यात रमत असतं. १२ वर्षांच्या संसारानंतर हे दोघं एकत्र राहण्याचं एकही कारण न सापडल्यामुळे वेगळं होण्याचा निर्णय घेतात. पण या चौकोनी कुटुंबात अशी काही एक घटना घडते की नात्यांची व्याख्याच बदलून जाते. कोणत्या गोष्टीला प्राधान्य दिलं पाहिजे.. कोणती गोष्ट जास्त बहुमोल आहे याकडे बघण्याचा वेगळा दृष्टीकोन शेखर आणि समायरा दोघांनाही मिळतो. त्यांचा हा दृष्टीकोन प्रेक्षकगृहात बसलेल्यांनाही खूप काही देऊन जाईल असाच आहे.
खूप काही मिळवण्याच्या या स्पर्धेत जे आपल्या जवळ आहे त्याकडे आपण दुर्लक्ष करतो आणि पळत्याच्या मागे धावतो. संसार हा दोघांचा असतो पण कधी कधी तो एकट्याने पुढे न्यावा लागतो हा अनुभव अनेकांनाच आला असेल. पण यात कोणाचं चूक किंवा बरोबर हे पाहण्यापेक्षा आयुष्य जास्तीत जास्त सुकर कसं करता येईल याकडे बघण्याचा नवा दृष्टीकोन ‘हृदयांतर’ सिनेमा देऊन जातो. सिनेमाची कथा तशी साधी आणि सरळ आहे आणि हिच या सिनेमाची जमेची बाजू आहे. ही कथा जेवढी सरळ आहे ती त्याच पद्धतीने मांडलीही गेली आहे. उगाचचा भंपकपणा किंवा लार्जर दॅन लाइफ गोष्टी सिनेमात दाखवण्याचा प्रयत्न केलेला नाही. आयुष्य हे सिनेमासारखं नसतं ते जगताना त्यातले खाचखळगे अनेकांना उभारी तरी देतात किंवा आत्मविश्वास गमवायला लावतात. शेखर आणि समायराच्या आयुष्यात आलेल्या या वादळाने त्यांना जवळ आणलं की अजून लांब नेलं हे तर तुम्हाला सिनेमा पाहताना कळेलच.
दोन माणसांना कधी तरी दूर व्हावं लागतं स्वतःला शोधण्यासाठी…. हृदयांतर होण्यासाठी.. आयुष्य सेलिब्रेट करण्यासाठी.. असे सिनेमातील काही संवाद हृदयाला भिडणारे आहेत. ते ऐकताच ज्यांनी हे लिहिले त्यांना दाद दिल्याशिवाय राहवत नाही. तसेच सिनेमातले काही दृश्य कलाकारांचा अभिनयही साजेसा आहे. विक्रमचा हा दिग्दर्शित असा पहिला सिनेमा असला तरी सिनेमा पाहताना असे कुठेही वाटत नाही. कोणत्याही प्रकारचा भडकपणा सिनेमात दिसत नाही. एका लयीत हा सिनेमा एक कथा सांगत जातो आणि त्याचे वेगवेगळे पैलू उलगडत जातो.
विक्रम फडणीस हे नाव मराठी सिनेसृष्टीसाठी नवीन असलं तरी ते बॉलिवूडमध्ये चांगलच परिचीत आहे. विक्रम फडणीस हे नाव नेमक काय आहे याचा प्रत्यय सिनेमासाठी वापरलेल्या हिंदी कलाकारांच्या नावावरुन येतो. मराठीचा प्रेक्षक हा कलाकार बघून नाही तर कथानक बघून चित्रपटगृहात येतो. त्यामुळे हिंदी कलाकारांना न घेताही त्या जागी दुसऱ्या कोणाची वर्णी लावली असती तरी चालले असते असे प्रकर्षाने जाणवते. सिनेमाचा पूर्वार्ध थोडा संथ असला तरी उत्तरार्ध तुम्हाला खुर्ची वरून उठू देत नाही. सुखाची नवी परिभाषा समजण्यासाठी ‘हृदयांतर’ पाहावा असाच आहे.
मधुरा नेरुरकर
madhura.nerurkar@indianexpress.com