संजय जाधव यांचे ‘चेकमेट’ आणि ‘रिंगा रिंगा’ हे दोन चित्रपट ज्यांनी पाहिले आहेत त्यांना ‘येरे येरे पैसा’मधली हेराफेरी तितकीशी भावणार नाही कारण, यावेळी चित्रपटात केवळ अॅक्शनचा थरार न ठेवता त्याला विनोदाची फोडणी दिली आहे. त्यामुळे तर्काला तिलांजली देऊन निव्वळ करमणूक म्हणून पाहायचा असेल तर ‘येरे येरे पैसा’ हा मनोरंजनाचा पाऊस पाडणारा चित्रपट आहे. संजय जाधव दिग्दर्शित ‘येरे येरे पैसा’ या चित्रपटात खूप दिवसांनी नायकाचाही चेहरा बदलला आहे आणि नायिकेचाही.. तसे खुद्द दिग्दर्शकानेच चित्रपटात कबूलही केले आहे. मात्र यातला गमतीचा भाग बाजूला ठेवला तर वेगळ्या कलाकारांमुळे हा चित्रपट तितकाच ताजा वाटतो. आधीच्या एकाही कलाकाराला चित्रपटात घेण्याचा मोह दिग्दर्शकाने आवरला आहे, हे खरेच कौतुकास्पद आहे.
‘येरे येरे पैसा’ ही मुख्यत: तिघांची कथा आहे. आणि या तिघांच्या मदतीला खलनायकासह बाकीही बराच फौजफाटा असला तरी आदित्य (उमेश कामत), सनी (सिद्धार्थ जाधव) आणि बबली (तेजस्विनी पंडित) या तिघांच्या आयुष्यात पैशामुळे होणाऱ्या उलाढालींची ही कथा आहे. आदित्यला हिरो व्हायचे आहे, शाहरूख खान त्याचा आदर्श आहे. आणि बबलीलाही दीपिका पदुकोण व्हायचे आहे, तर सनीला फक्त बबलीशी लग्न करायची इच्छा आहे. ही तिकडी स्वत:तील मूर्खपणामुळे अण्णाच्या (संजय नार्वेकर) तावडीत सापडतात. अण्णाचे पैसे या तिकडीमुळे हरवले आहेत. ते वसूल करण्यासाठी अण्णाने त्यांच्यामागे तगादा लावला आहे. अण्णाला पैसे परत करण्याच्या बोलीवर बाहेर पडलेला आदित्य पैशाच्या शोधात विजय मेहरा (बिजॉय आनंद) आणि जान्हवी मुझुमदार (मृणाल कुलकर्णी) यांच्यापर्यंत जाऊन पोहोचतो. तर सनी आणि बबली पैशाच्याच पाठीपाठी आदित्यपर्यंत पोहोचतात. हे सगळे बिंदू एकत्र आल्यानंतर पाठशिवणीचा खेळ रंगतो. या खेळात सगळ्यांना हवा असतो तो पैसा..
‘येरे येरे पैसा’ या चित्रपटाची मांडणी आपल्या इतर सगळ्या चित्रपटांपेक्षा वेगळी करण्याचा प्रयत्न संजय जाधव यांनी केला आहे. त्यामुळे या चित्रपटात आणखी एक कलाकार आहे जो चित्रपटाची कथा सुरू करतो आणि पुढे नेतो. तो कोण हे पडद्यावरच पाहणे इष्ट ठरेल. मात्र त्याच्या कथाकथनातून चित्रपटातली एकेक व्यक्तिरेखेची ओळख आपल्याला होते. हा जो काही ओळख करून देण्याचा प्रकार आहे तो अगदी नवीन नाही, आधीही अनेक चित्रपटांमधून पाहिलेला आहे. त्यामुळे त्यात फार नावीन्य नाही आणि नाही म्हणायला हा प्रकार इतका ताणला गेला आहे की सुरुवातीचा बराच वेळ आपण फक्त चित्रपटामध्ये कोण कोण आहेत त्यांचे भूत, वर्तमान एवढेच जाणून घेण्यात वेळ दवडतोय की काय असे वाटत राहते. दिग्दर्शकाची ही तोंडओळख कधी संपणार आणि चित्रपट कधी सुरू होणार या चिंतेत आपण असतो. अर्थात ही चिंता सुसह्य़ झाली आहे ती या चित्रपटातील खटकेबाज संवाद आणि उत्तम कलाकार. सिद्धार्थ जाधव खूप काळानंतर एक पूर्ण लांबीच्या विनोदी भूमिकेत पाहायला मिळाला आहे. त्याच्या एंट्रीपासूनच तो लक्ष वेधून घेतो. तेजस्विनी आणि उमेश कामत या दोघांनाही आधी फार गंभीर किंवा सालस भूमिकांमधून आपण पाहिलेले आहे. त्यामुळे डोक्यावर पडलेत का हे, असा प्रश्न पडावा इतक्या धमाल व्यक्तिरेखा या दोघांच्या वाटय़ाला आल्या आहेत. अण्णाच्या भूमिकेत संजय नार्वेकरही चपखल बसले आहेत. विशाखा सुभेदार, आनंद इंगळे असा विनोदी कलाकारांचा फौजफाटा असल्यावर चित्रपटात इनोद अंमळ जास्त आहे हे सांगायला नको. एकेकाळी हिंदी चित्रपटांतून हिरो म्हणून पाहिलेला बिजॉय आनंद या चित्रपटात छोटेखानी भूमिकेत आहे. तर मृणाल कुलकर्णी यांच्या वाटय़ाला आलेली भूमिकाही त्यांच्या आजवरच्या प्रतिमेला छेद देणारी असल्याने वेगळी वाटते. चित्रपटातील संवाद अरविंद जगताप यांचे आहेत. यापुढे अधिक सांगणे न लगे. गाण्यांचा मात्र भडिमार आहे. त्यातल्या त्यात चित्रपटाचे शीर्षकगीत आणि क्लायमॅक्सचे गाणे उडते असले तरी जमून आलेले आहे. पंचेस, चुरचुरीत विनोदांची ठिकठिकाणी केलेली पेरणी आणि परिस्थितीतून निर्माण होणाऱ्या विनोदावर दिलेला भर यामुळे चित्रपट कुठेही कंटाळवाणा वाटत नाही. अर्थात, त्याचा शेवट काय आहे हे आधीच लक्षात आले तरी मनोरंजनाची मात्रा कमी होत नाही. नव्या वर्षांच्या सुरुवातीलाच कोणताही ताण न देता मनोरंजनाच्या पावसात चार क्षण हसण्याचे देऊन जाणारा असा हा चित्रपट आहे.
चित्रपट समीक्षक – रेश्मा राईकवार