गौरव सोमवंशी

‘बिटकॉइन’पुरतेच मर्यादित न राहता, ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचे अन्य क्षेत्रांतही प्रयोग आता सुरू झाले आहेत. परंतु आपापल्या क्षेत्रांत ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याआधी काही प्रश्नांची उत्तरे द्यायला हवीत..

‘ब्लॉकचेन’ तंत्रज्ञानाच्या जगतात एक विधान उपहासाने केले जाते. ते वाचून, सध्या या तंत्रज्ञानाबद्दलची लोकांच्या मनातील प्रतिमा कशी आहे, याचा अंदाज येऊ शकतो. ते विधान असे : ‘प्रश्न कोणताही असो, उत्तर नेहमी ब्लॉकचेनच असेल!’ विसेक वर्षांपूर्वी असेच काहीसे इंटरनेटसंदर्भात डॉटकॉम बुडबुडय़ाबद्दलही झालेच होते. तेव्हा इंटरनेट हे कोणत्याही समस्येवरील ब्रह्मास्त्र वाटू लागले होते. डॉटकॉम बुडबुडा फुटल्याने अनेक कंपन्यांचे नुकसान झाले असले, तरी त्यानंतर इंटरनेटने आपल्या जीवनात आमूलाग्र बदल आणलाच. अ‍ॅमेझॉनसारखी कंपनी या डॉटकॉम बुडबुडय़ातूनही तगली आणि पुढे तिची भरभराट आपण पाहातच आहोत. प्रख्यात बिटकॉइनतज्ज्ञ आंद्रे अँटनॉपोलस यांची बिटकॉइनबाबतची पुस्तके (विशेषत: ‘मास्टिरग बिटकॉइन’, ‘द इंटरनेट ऑफ मनी’) आणि यूटय़ूबवरील भाषणे अत्यंत प्रसिद्ध आहेत. त्यांच्या मते, ब्लॉकचेनला इंटरनेटप्रमाणे प्रचलित होण्यासाठी इंटरनेटला लागला तसा अवधी लागेल. अनेक वर्षांसाठी ईमेल हे इंटरनेटचे सर्वाधिक वापरातले उपयोजन होते, तसेच ब्लॉकचेनचा वापर सुरुवातीच्या काळात हा बिटकॉइनसारख्या कूटचलनांसाठी अधिक होईल. असेच काहीसे झालेसुद्धा; पण ब्लॉकचेनचा वापर इतर अनेक क्षेत्रांत कसा करता येईल, याविषयी पण मागील पाच-सहा वर्षांपासून बरेच प्रयोग सुरू आहेत.

मग प्रत्येक प्रस्थापित तंत्रज्ञानावर आधारित ‘डाटाबेस’ला बाजूला सारून त्या जागी ब्लॉकचेन आणावे का? अर्थातच नाही. ब्लॉकचेन हे काही फक्त आणि फक्त प्रस्थापित डाटाबेस मॉडेल- जसे की ओरॅकल डाटाबेस, मायएस.क्यू.एल., वगैरेंना पर्याय म्हणून पुढे आणलेले नाही. परंतु काही विशिष्ट समस्यांचे एक संभाव्य उत्तर म्हणून ते पुढे आले आहे, हे नक्की. उदाहरणार्थ, ज्या क्षेत्रात विश्वास आणि पारदर्शकतेची गरज ही तंत्रज्ञानाने भरून काढता येऊ शकते.

पण म्हणून ‘जिथे-तिथे ब्लॉकचेनच’ असे काही करण्यास सुरुवात झाली, तर ब्लॉकचेनचाही बुडबुडा तयार होऊ शकतोच. बँकिंग, चलन वा पैसा या सगळ्यांना पर्याय म्हणून बिटकॉइनसारखे कूटचलन कसे वापरात आले हे आपण आधीच्या काही लेखांमध्ये पाहिले आहे. परंतु मागील लेखात पाहिल्याप्रमाणे कूटचलनामध्ये एका विशिष्ट प्रकारच्या ब्लॉकचेनचा उपयोग होतो, ज्यास ‘सार्वजनिक (पब्लिक) ब्लॉकचेन’ म्हटले जाते. परंतु एखाद्या क्षेत्रात वा कामात किंवा कोणत्या कंपनी वा उद्योगाला ब्लॉकचेनचा उपयोग करायचा असेल, तर सहसा सार्वजनिक ब्लॉकचेनचा प्रकार वगळून ब्लॉकचेनचे अन्य प्रकार (खासगी, गटाधारित वा संकरित ब्लॉकचेन) वापरावे लागण्याची शक्यता जास्त आहे. ब्लॉकचेनचे उपयोग वा प्रयोग कोणत्या क्षेत्रांत अथवा कामांसाठी करावेत, याबाबत आंद्रे अँटनॉपोलस आणि ‘मल्टिचेन’ नावाच्या ब्लॉकचेन प्लॅटफॉर्मचे निर्माते गिडीयन ग्रीनस्पॅन यांनी आपल्या लेखन वा भाषणांतून काही महत्त्वाच्या मार्गदर्शक सूचना मांडल्या आहेत. त्या पाहू..

(१) प्रस्थापित डाटाबेस तंत्रज्ञान वापरून तुमच्या १०० टक्के गरजा भागत आहेत का?

जर या प्रश्नाचे उत्तर ‘हो’ असेल आणि तुमच्या क्षेत्रात वा कामात अशी कोणतीच समस्या नसेल जी प्रस्थापित डाटाबेस तंत्रज्ञान वापरून सोडवली जाऊ शकत नाही, तर ब्लॉकचेन सोडून तेच तंत्रज्ञान वापरलेले बरे! कारण प्रस्थापित डाटाबेस तंत्रज्ञान हे अनेक वर्षांपासून स्वत:मधील त्रुटी सुधारून वेगवान वा कार्यक्षम बनले आहे. ब्लॉकचेन तंत्रज्ञानाला तितके प्रगल्भ होण्यासाठी काही कालावधी जावा लागेलच. पण हे लक्षात असू द्यावे की, आपण हा प्रश्न ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचे मूळ गुणधर्म जाणूनच स्वत:ला विचारावा. नाही तर असलेल्या समस्यासुद्धा आपल्याला दिसत नाहीत. कारण आपण त्यांना गृहीत धरायला शिकलेलो असतो!

(२) अनेक लोक, संस्था किंवा विभाग वापरतात, असे एकापेक्षा जास्त डाटाबेस आहेत का?

जर एकच डाटाबेस एकच व्यक्ती किंवा विभाग वा संस्था वापरणार असेल आणि इतर कोणालाही याचा परिचयसुद्धा होणार नसेल, तर ब्लॉकचेन सहसा न वापरलेलेच बरे! पण जर सरकारसारखी एखादी संस्था आपल्याजवळ असलेली काही विशिष्ट माहिती सार्वजनिक करू पाहत असेल, तर ब्लॉकचेनचा उपयोग नक्कीच होऊ शकतो. कारण साठवलेल्या माहितीमध्ये भविष्यात काही बदल केला गेला, तर ते निदर्शनास येईल.

(३) डाटाबेसमध्ये माहिती भरणारे लोक किती?

जर अनेक डाटाबेस असतील, पण साऱ्यांमध्ये माहिती भरणारा एकच व्यक्ती किंवा विभाग असेल तर ब्लॉकचेनचा वापर कितपत योग्य ठरेल, यावर नक्की विचार व्हावा. याचे कारण ब्लॉकचेन तंत्रज्ञान हे विकेंद्रिततेचा आग्रह धरणारे आहे.

(४) विश्वासाचा अभाव आहे का?

ब्लॉकचेन वापरण्यासाठी हे एक प्रमुख कारण आहे. जर डाटाबेसमध्ये माहिती भरणारे वा वापरणारे यांचा एकमेकांवर विश्वास नसेल, तर ब्लॉकचेन ही समस्या सोडवू शकते. उदाहरणार्थ, आजच्या घडीला किती शासकीय विभाग एकमेकांसोबत माहितीची देवाणघेवाण करतात? या अनेक विभागांमध्ये माहितीची देवाणघेवाण होत नाही म्हणून सामान्य नागरिकांना आपल्या कामासाठी किंवा एखाद्या योजनेचा लाभ घेण्यासाठी स्वत:हून अनेक विभागांना भेट द्यावी लागते. जर एका विभागाकडे एखाद्या नागरिकाबद्दलची माहिती असेल आणि जिचा संबंध दुसऱ्या विभागाशी असेल, तर ती माहिती विश्वासपूर्वक तिथपर्यंत पोहोचवणे शक्य आहे. यामुळे त्या नागरिकाला तीच माहिती पुरवण्यासाठी दुसऱ्या विभागात जावे लागणार नाही. नागरिकांना जास्तीत जास्त मदत करू पाहणाऱ्या अशा शासकीय कारभाराचे स्वप्न खुद्द माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांनी त्यांच्या ‘अ मॅनिफेस्टो फॉर चेंज’ या पुस्तकात रेखाटले होते.

परंतु माहितीची देवाणघेवाण इतकीही सोपी असू नये की, नागरिकांची ‘प्रायव्हसी’ (खासगीपणाचा हक्क) धोक्यात येईल. एखाद्या व्यक्तीची ‘प्रोफाइलिंग’ म्हणजेच संपूर्ण माहिती एकाच क्लिकवर कोणालाही उपलब्ध होऊ देणे, हे घातक ठरेल. तसे न होऊ देता, पण उपयुक्त माहिती पुढे जायला हवी. त्यासाठीचा मध्यम मार्ग शोधून काढण्यास ब्लॉकचेन तंत्रज्ञान उपयोगी ठरू शकते.

दुसरे म्हणजे, कोणत्याही पुरवठा-साखळीत (सप्लाय-चेन) अनेक समूहांमध्ये माहितीची देवाणघेवाण होत असते. त्या साखळीतील प्रत्येकाला एकमेकांवर विश्वास असेलच असे नाही किंवा त्यांना एकमेकांबद्दल पुरेपूर माहिती असणेही शक्य नाही. अशा वेळेस ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा उपयोग नक्कीच होऊ शकतो.

(५) अनावश्यक मध्यस्थांना काढायचे आहे का?

मध्यस्थ हे स्वत:हून चांगले-वाईट किंवा उपयोगी-निरुपयोगी नसतात. पण काही क्षेत्रांत परस्परविश्वास किंवा माहितीचा अभाव असेल तर त्याचा दुरुपयोग करून इतरांचे शोषण वा पिळवणूक करणारेही मध्यस्थ असतात. विशेषत: अन्नपुरवठा साखळीमध्ये असे मध्यस्थ आढळून येतात. अशा मध्यस्थांना दूर सारून योग्य माहिती किंवा विश्वासार्ह काम करणारे तंत्रज्ञान म्हणजे ब्लॉकचेन! पण मध्यस्थ म्हणजे नक्की कोण, हे ओळखायचे असेल तर अगोदर सांगितल्याप्रमाणे ब्लॉकचेनचे गुणधर्म एकदा जाणून घ्यावेच. कूटचलन हे ज्या ‘सायफरपंक’ चळवळीतून आले, त्यांनी तर चक्क सरकार, बँक आणि राष्ट्रीय चलन यांनाच मध्यस्थ म्हणून घोषित केले होते!

(६) एक माहिती दुसऱ्या माहितीशी बोलते का?

माहिती साठवून ठेवणे हे काम ब्लॉकचेन तंत्रज्ञान करतेच; परंतु जर एखादी नोंदलेली माहिती पुढे दुसऱ्या माहितीच्या नोंदीवर परिणाम करणार असेल, तर ब्लॉकचेनचा उपयोग अधिक वाढू शकतो. याचे उदाहरण आपण अ‍ॅलिस, बॉब, चार्ली आणि डीलन यांच्या उदाहरणात आधीच्या काही लेखांत पाहिलेच आहे. बॉबीने चार्लीला किती पैसे दिले, या माहितीची नोंद पुढे होणाऱ्या कोणत्याही व्यवहारावर- म्हणजेच माहितीच्या नोंदीवर परिणाम करेलच. ब्लॉकचेनची नोंदवही ही हिशेब ठेवण्यासाठी अत्यंत उपयोगी असतेच!

लेखक ब्लॉकचेन तंत्रज्ञानाच्या उपयोजन क्षेत्रात कार्यरत आहेत. ईमेल : gaurav@emertech.io