13 August 2020

News Flash

उणिवांमधील सौंदर्य!

प्रत्येक माणूस हा गुणावगुणांनी युक्त असतो.

मानसिक स्थितीबरोबरच विचारप्रक्रिया, भावना आणि नेणीवेची पातळी हे सारे समोर दृश्यात्मकदृष्टय़ा समजूनही घेण्यासाठी सारा हॉब्जने केला एक प्रयोग

प्रत्येक माणूस हा गुणावगुणांनी युक्त असतो. हे गुणावगुण वेगवेगळेही असतात आणि वेगवेगळ्या प्रमाणातही असतात. अर्थात त्यामुळेच आपण त्या माणसाची वर्गवारी चांगला- वाईट अशी करत असलो तरीही मानवी जीवन हे सुंदर असतेच. पण हे सारे कलेच्या माध्यमातून कसे सांगणार? शिवाय एकाच वेळेस हे सांगायचे  आणि दुसरीकडे गुणावगुण किंवा उणिवा समोरच्या व्यक्तीला कशा दिसतात हे दृश्यप्रतिमांच्या आधारे दाखवायचेही असे करता आले तर? हा प्रश्न सारा हॉब्सला काही वष्रे भेडसावत होता. साहजिकच आहे की, ती कलावंत असल्याने तिने कलात्मक मार्गानेच हा प्रश्न सोडवला.

03-lp-art

तिने मांडणीशिल्पे सादर केली आणि ती छायाचित्रांच्या माध्यमातून रसिकांसमोर सादर केली. दरखेपेस मांडणीशिल्पे वेगवेगळ्या ठिकाणी न्यायची, मांडायची हे तसे जिकिरीचे. पण छायाचित्रे सहज नेता येतात, त्यामुळे हा विषय अधिक मंडळींपर्यंत सहज जाऊ शकतो. या विचारानेच तिने ही मांडणीशिल्पे छायाचित्रित केली. या मांडणीशिल्पांच्या निमित्ताने तिने एक मानसिक अवकाश तयार केले. मानसिकतेचा शोध घेण्यासाठी आणि त्याच्या आस्वादनासाठी. विशिष्ट मानसिक स्थिती निर्माण करून असे वातावरण निर्माण करता येते की, जे कथनात्मक असते. ते तुम्हाला खूप काही सहज सांगून जाते. प्रसंगी समोरचे दृश्य तुम्हाला अतिरंजितही वाटू शकते, पण ती अपेक्षित मानसिक स्थिती ते दृश्य नेमकी व्यक्त करते. यातून त्या मानसिक स्थितीबरोबरच विचारप्रक्रिया, भावना आणि नेणीवेची पातळी हे सारे समोर दृश्यात्मकदृष्टय़ा समजूनही घेता येते. सारा म्हणते, तुमची ती स्थिती समोरच्या व्यक्तीला दिसते कशी हेही तुम्ही यातून समजून घेऊ शकता.

निद्रानाश या छायाचित्रामध्ये पांघरुणासह निद्राधीन होण्यासाठी तयार असलेला पलंग, दोन उशा आणि डोक्यात येणारे सततचे विचार दर्शविण्यासाठी वरून लटकलेल्या अवस्थेत सोडलेल्या विचारांच्या चिठ्ठय़ा अशी रचना पाहायला मिळते. काही जण नेहमीच निर्णयाच्या वेळेस संभ्रमित असतात. ती अवस्था दर्शविण्यासाठी बंद खोलीतील पाठमोरी खुर्ची आणि बाजूच्या तिन्ही िभतींवर चिकटवलेले रंगीत पर्याय अर्थात अनेकानेक पर्यायी विचार असे चित्रण करण्यात आले आहे. पर्यायांच्या जंत्रीमुळे उडालेला गोंधळही दिसतो आणि पर्यायांकडे सतत पाहात राहण्यामुळे त्यातच अडकून पडणे हेही दिसते. परफेक्शन नावाच्या छायाचित्रात नेमके लेखन जमेपर्यंत प्रत्येक कागद लिहून चोळामोळा करून फाडून फेकून दिलेला आणि त्यामुळे मागे झालेला कागदाच्या बोळ्यांचा खोलीभर पसरलेला ढिगारा असे चित्र दिसते. परफेक्शनिस्ट व्यक्ती ही चांगली असली तरी समोरच्या व्यक्तीला तिचे परफेक्शन; दृश्य रूपात असेही दिसू शकते, याची जाणीव हे छायाचित्र करून देते.

काही वेळेस आपल्या मनात अपराधी भाव येतो आणि मग तो घालविण्यासाठी आपण त्याची भरपाई करण्याचा प्रयत्न करतो आणि त्या नादात आवश्यकतेपेक्षा अधिक देऊन मोकळेही होतो. मग ते दृश्यरूपात कसे दिसेल? डायिनग टेबल, एकमेकांसमोर मांडलेल्या दोन खुच्र्या आणि आजूबाजूला सर्वत्र भेटवस्तूंचे खोकेच खोके.. संशयाचे भूत ज्याच्या मनात घर करते, त्याला प्रत्येक व्यक्तीच आपल्याकडे रोखून पाहाते आहे, असे वाटते. तसे चित्रणही सारा एका छायाचित्रात करते.

02-lp-art

वयाच्या सातव्या वर्षी छायाचित्रणाला सुरुवात करणाऱ्या साराने नंतर युनिव्हर्सटिी ऑफ जॉर्जआिमधून ललित कलेमध्ये पदवी आणि छायाचित्रणात पदव्युत्तर पदवी ग्रहण केली. त्यानंतर आजवर तिने मानसशास्त्राशी संबंधित अनेक विषय अतिशय वेगळ्या पद्धतीने हाताळले. तिची ही मानसशास्त्रीय मालिका केवळ मानसशास्त्राच्या विद्यार्थ्यांसाठीच नव्हे तर सामान्य माणसासाठीही जाणीव व नेणीव दोन्ही पातळींवर खूप वेगळ्या गोष्टी लक्षात आणून देणारी आहे. उदाहरणच घ्यायचे तर परफेक्शनिस्ट हा चांगला गुण असला तरी समोरच्यासाठी त्याचे चित्र वेगळे असू शकते. हा दृश्यफरक खूप महत्त्वाचा आहे.

म्हणूनच आपण दुसऱ्यांना कसे दिसतो, याचा शोध स्वत:बरोबरच इतरांसाठीही घेणारी साराची ही मालिका आपल्या वागण्यामुळे इतरांवर काय परिणाम होत असेल याचा विचार करण्यास भाग पाडते. हा विचार, त्यामागची कलात्मकता आणि त्याच्या सादरीकरणातील नवान्मेषण (इन्नोवेशन) यामुळे ती उत्तम समकालीन कलावंतांच्या यादीत स्थान मिळवते.
विनायक परब –  @vinayakparab
vinayak.parab@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 19, 2016 1:31 am

Web Title: sarah hobbs
Next Stories
1 स्वातंत्र्य अन् संवादाचे ओझे(?)!
2 समकालीन आरसा!
3 अमूर्तातील सौंदर्यदृष्टी!
Just Now!
X