30 May 2020

News Flash

१७३. सुलट

सद्गुरू शिष्याला ‘उलट’ मार्गाला नेऊ इच्छितात. जगाचा प्रवाह वेगानं वासनांधतेच्या खाईकडे निघाला आहे. जीवही प्रवाहपतीत होऊन वाहात आहे.

| September 3, 2014 01:01 am

सद्गुरू शिष्याला ‘उलट’ मार्गाला नेऊ इच्छितात. जगाचा प्रवाह वेगानं वासनांधतेच्या खाईकडे निघाला आहे. जीवही प्रवाहपतीत होऊन वाहात आहे. त्याला त्या प्रवाहात अडवून खऱ्या सरळ मार्गाकडे वळविण्याचा सद्गुरूंचा प्रयत्न असतो. प्रत्यक्षात त्यांना जे उलट वाटतं ते मला सुलट वाटतं आणि मला जे सुलट वाटतं त्यातला उलटेपणा त्यांनाच माहीत असतो! जेव्हा मी त्यांच्या जवळ असतो तेव्हा मनाची पातळी उंचावते. जगण्यातला भ्रामकपणाही उमगतो. ज्या प्रपंचाला मी घट्ट पकडलं आहे त्या प्रपंचाशी माझं खरं देणंघेणंच नाही, असाही भाव मनात उमलतो. कमल जोशी यांनी ‘स्वामी स्वरूपानंद स्मृतीसौरभ’ पुस्तकात आपली आठवण लिहिली आहे. त्रयोदशाक्षरी मंत्राचा त्या जप करीत, पण प्रत्यक्ष स्वामींनीच तो आपल्याला द्यावा, या हेतूने त्या पावसला आल्या. मुलाबाळांचा त्रास नको म्हणून त्यांना बाहेर ठेवून त्या खोलीत आल्या होत्या. स्वामींनी सांगितलं, संध्याकाळच्या आरतीनंतर पाहू. संध्याकाळी त्या गेल्या तेव्हा मुलंही सोबत होती. स्वामी त्यांना म्हणाले, ‘‘तुम्ही म्हणालात, मी श्रीराम म्हणते, पण आम्ही सोऽहम् देतो.’’ मी म्हटलं, ‘‘मला काहीच माहीत नाही. मी आपणाला समर्थ (रामदास) समजते. आत्मा एकच आहे, असं आपण म्हणता ना?’’ यावर त्यांनी सांगितलं, ‘‘मी सांगतो ते आणि तुमचा मंत्र याचा अर्थ एकच आहे.’’ यानंतर त्यांनी थेट सोऽहम् कसं करायचं हे शिकवायला सुरुवात केली. तोच धाकटा गडबड करून बोलू लागला, थोरला दाराजवळ जाऊन पडला. एक सेवेकरी ओरडले, ‘‘अहो या मुलांना बाहेर घेऊन जायला सांगा.’’ पण सांगणार कोण? माझी सारी शुद्धबुद्ध हरपली होती. एकवार त्या सेवेकऱ्याकडे मी पाहिलं मात्र. दुसरीकडे कुठेच लक्ष नव्हतं.  स्वामींनी पाहिलं, पण हे सारं माझ्यापासून कोठेतरी दूर घडत आहे, असं वाटत होतं. याच्याशी त्या क्षणी माझा काडीमात्र संबंध नव्हता. स्वामींनी एकवार दाराकडे नजर टाकली. ‘‘हा संसार भगवंताचा, आपणही त्याचेच. आनंदात जन्माला आलो. आनंदात जगायचं आणि आनंदात विलीन व्हायचं. हे तत्त्व नेहमी डोळ्यांसमोर ठेव.’’ असं त्यांनी मला सांगितलं होतं!  (पृ. १६०). मुलं आणि आई यांची वीण किती घट्ट असते? त्यातही लहान मुलांना थोडं काही झालं तरी आईचं सारं मन तिकडेच खेचलं जातं. असं असताना सोऽहम्च्या भावानुभावात मन इतक्या उंचावर गेलं की या सगळ्याशी आपला काही संबंधच नाही, हे सारं कुठेतरी दूरवर घडत आहे, असं वाटलं. याचा अर्थ मन बेपर्वा झालं, असा नाही. सद्गुरू शिष्याला निष्काळजी व्हायला सांगत नाहीत, तर आवश्यक तेवढी काळजी घ्या म्हणजे काळजी करायची वेळ येणार नाही, असंच शिकवतात. त्यातही असं पाहा, दूर आणि जवळ, यांना कितीसा अर्थ आहे? आपण अगदी जवळ असतो, संसारात खोलवर रुतून असतो. तरी तो मनासारखा होतो का हो? घराला आग लागली तर ती बाहेरून विझवणं सोपं असतं, आतून ती कितीशी शमविणार? तेव्हा संसारापासून मन अलिप्त झालं तरच ते संसारातल्या अडचणींचं खरं स्वरूप जाणून खरे प्रयत्न करू शकतं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 3, 2014 1:01 am

Web Title: 173 opposite way
टॅग God,Swami
Next Stories
1 वनखात्याची वाढती व्याप्ती..
2 राजकीय वातकुक्कुटांचा खेळ
3 भोंदूंची राजरोस भक्ती; साईबाबांवर मात्र बंदी!
Just Now!
X