पैशाला चिकटलेलं मन जर भगवंताला चिकटलं तरच ते खऱ्या अर्थानं धीरोदात्त होऊ शकेल. पण ही गोष्ट सोपी नाही. कारण आपल्या हाडीमासी पैशाचं प्रेम आहे. श्रीमहाराजच म्हणाले, ‘‘समजा आपले वय बत्तीस वर्षांचे आहे. एका ज्योतिषाने आपली कुंडली पाहून सांगितले की, पस्तिसाव्या वर्षी तुम्हाला मोठा धनलाभ होणार आहे आणि नंतर दोन वर्षांनी एका सत्पुरुषाची भेट होणार आहे, तर यापैकी कोणते भविष्य आपल्या लक्षात राहील?’’(चरित्रातील पैसाविषयक बोधवचने, क्र. ४). आपल्यालाच हा प्रश्न जणू महाराज विचारत आहेत, असं मानून विचार करा आणि स्वतचं उत्तर मनातच जोखून पाहा. भौतिकातील गोष्टींचा, पैशाचा आधार आपल्याला अधिक वाटतो आणि त्यामुळे त्यांच्या अस्तित्वाचा आपल्याला मनोमन आनंद असतो. सत्पुरुषाच्या सहवासाचं मोल खऱ्या अर्थानं उमगतं का? श्रीमहाराजांना मानणारे आणि गोंदवल्यातच राहात असलेले एक गृहस्थ होते. एकदा संध्याकाळी श्रीमहाराज त्यांच्याशी बोलत होते. श्रीमहाराजांनी एकदम त्यांना विचारलं, तुमच्या घरी कोण कोण असतं? आता गेली अनेक वर्षे श्रीमहाराजांसमोरच आपला संसार होत आहे, इतकंच नव्हे तर श्रीमहाराज सर्वज्ञ आहेत, असा भावही आहे. मग त्यांनी हा प्रश्न का विचारावा, त्यामागे काय गूढ अर्थ असेल, असा विचार त्या गृहस्थांच्या मनात आला नाही. त्यांनी भाबडेपणाने घरातल्या सर्वाची नावे सांगितली. श्रीमहाराजांनी पुन्हा विचारलं, आणखी कोण असतं? त्यांनी डोकं खाजवून सांगितलं, अमका एक नातेवाईकही अधेमधे आमच्याकडेच राहातो. श्रीमहाराजांनी विचारलं, आणखी कोण असतं? त्यांनी सांगितलं, एक कुत्रा असतो. श्रीमहाराज म्हणाले, म्हणजे मला तुमच्या घरात काही जागा दिसत नाही! तेव्हा त्यांना एकदम जाणवलं, आपण महाराजांच्या घरात राहातो, असं मानून आपल्या घरात राहातो पण प्रत्यक्षात त्यांचं स्थान प्रथम असतं का? तेव्हा सत्पुरुषाच्या भेटीचे भविष्य लक्षात ठेवून आपण त्यांची आतुरतेनं वाट पाहाणार नाही. धनलाभाचा काळ मात्र पक्का लक्षात ठेवून ते भविष्य खरं ठरतं का, हे आसुसून पाहात राहू. जर मनाची ही दशा आहे तर भौतिकाला चिकटलेलं, प्रपंचाला चिकटलेलं, पैशाला चिकटलेलं मन भगवंताला अर्थात श्रीमहाराजांना चिकटणं कसं सोपं असेल? श्रीमहाराज सांगतात, ‘‘भगवंत माझ्या घरातला धुरीण आहे, तो सर्व कल्याणाचे करतो, त्याच्या इच्छेने सर्व होते, ही भावना आहे तो भक्त खरा. हाच परमार्थ चोवीस तासांचा आहे’’ (बोधवचने, क्र. १७०). याचाच अर्थ परमात्म्याला धुरीणत्व दिलं जाईल तेव्हाच खरा परमार्थ साधेल. माझ्या जीवनाचा सूत्रधार परमात्मा आहे, हे जाणवेल तेव्हाच परमार्थ साधेल आणि ही जाणीव चोवीस तास टिकेल तरच परमार्थ टिकेल! आज मी पैशाला सूत्रधार मानत आहे. पैशाच्या जोरावर सुखी होण्याचा प्रयत्न करीत आहे. पैशाच्या प्रभावाने माझं मन, चित्त, बुद्धी भारून गेली आहे. त्या मन, चित्त, बुद्धीला परमात्म्याकडे वळविण्यासाठी पैशाच्या आसक्तीवर आघात अटळ आहे.