News Flash

वारी

आज आषाढी एकादशी! आजपासून पाच दिवसांत गुरुपौर्णिमा! सद्गुरुंच्या गावाकडे निघालेल्या हृदयेंद्रच्या मनात म्हणूनच भावनांचा आणि विचारांचा कल्लोळ होता.

| July 27, 2015 12:43 pm

आज आषाढी एकादशी! आजपासून पाच दिवसांत गुरुपौर्णिमा! सद्गुरुंच्या गावाकडे निघालेल्या हृदयेंद्रच्या मनात म्हणूनच भावनांचा आणि विचारांचा कल्लोळ होता. काही दिवसांपूर्वीच ज्ञानेंद्रच्या घरी ‘जाता पंढरीसी सुख वाटे जीवा’ या अभंगावर झालेली चर्चा त्याच्या मनात कशी कोरली गेली होती.. गेले कित्येक दिवस उत्तर प्रदेशात जाणाऱ्या गाडय़ांचा मोठा गोंधळ सुरू होता. अनेक गाडय़ा रद्द झाल्या होत्या. त्यामुळे गावी जाता येईल का, अशी शंका त्याला सतावत असे. आता गाडय़ा सुरळीत झाल्याने नि:शंक मनानं तो गुरुगृही निघाला होता आणि म्हणूनच पंढरीकडे निघालेल्या सेनामहाराजांच्या अंतरंगातला जो भाव बुवांनी उलगडून दाखवला होता आणि त्या अनुषंगानं जी चर्चा झाली होती ती त्याच्या अंतरंगात कशी ठसली होती.. इगतपुरी मागे पडलं आणि वरच्या बर्थवर जाऊन तो पहुडला.. मथुरेकडे मित्रांबरोबर जातानाचा प्रवास त्याला आठवला. तेव्हा सर्व एकत्र होते, आज तो एकटाच निघाला होता.. आनंदाची गोष्ट ही की अचलदादा इंदूरहून इटारसी गाठून त्याच्या सोबत येणार होते! पण तोवरचा निम्मा प्रवास एकटय़ाचाच होता.. बर्थवर पडल्या पडल्या त्यानं डोळे मिटले तरी अंतर्मन अगदी जागं होतं.. ते ज्ञानेंद्रच्या बंगल्यावर पोहोचलं होतं आणि तिथे त्याचे मित्र आणि बुवा, नाना दिवाणखान्यात बसून सेना महाराजांच्या अभंगाचं बोट धरून पंढरीला निघाले होते.. जसा तो आत्ता निघाला होता.. त्याला त्या दिवसाचा संवाद अगदी स्पष्ट आठवू लागला.. बुवांनी भावतन्मयतेनं बोलायला सुरुवात केली होती..

बुवा – पहा.. विरक्तीचा अभ्यास सुरू आहे.. मन भगवंताच्या चरणांशी केंद्रित होत आहे आणि अशा अवस्थेत सेना महाराज पंढरीला निघाले आहेत.. म्हणूनच सुख आहे हो.. जाता पंढरीसी सुख वाटे जीवा.. कसलं सुख आहे हे? तर केशवाला भेटायचं आहे, केशव भेटणार आहे या विचारांनीच मन सुखावलं आहे आणि तो केशव म्हणजे सद्गुरू जेव्हा भेटेल ना तेव्हा केवळ आनंदच आनंद आहे!! आपण पंढरीला असं कधी गेलो का हो? मुळात ही ‘पंढरी’ काय आहे, ही ‘चंद्रभागा’ काय आहे, तो विटेवर उभा असलेला ‘विठ्ठल’ काय आहे, आपण कधी विचार करतो का हो? भक्तांना भवसागरातून पार करण्याचा पण त्या विठ्ठलानं केला आहे.. म्हणून त्याचा निवास अठ्ठावीस युगं जिथं आहे ती ‘पणधरी’ झाली आहे! संसाराचा वीट हाच तिचा पाया आहे.. त्या विटेवरच तो उभा आहे.. अनंत जन्मांचा दु:खभोगांचा वीट टाळणारा म्हणून तो ‘विठ्ठल’ आहे.. चंद्र म्हणजे मनाच्या अस्थिरतेचंही एक प्रतीक आहे.. पंतमहाराज बाळेकुंद्रीकर यांनी म्हटलंय पहा.. चतुर्थीला चंद्र पाहू नये, याचा गूढार्थ असा की तुर्या या चतुर्थ अवस्थेत मन मावळतं.. ज्यांना मनाच्या चंद्राशिवाय करमत नाही त्यांना चतुर्थी कधीच साधायची नाही! तेव्हा संसाराला चिकटलेल्या मनाचा हा चंद्र जिथे लोपतो आणि शुद्ध भावाचा अखंड प्रवाह जिथे खुला होतो ती खरी ‘चंद्रभागा’ आहे.. जो अशा पंढरीला जाईल, जो अशा विठ्ठलाचं दर्शन करील, जो अशा चंद्रभागेत आकंठ डुंबेल त्याचीच वारी खरी!! नाहीतर जन्म-मृत्यूची वारी सुरूच आहे.. तोंडानं फक्त म्हणायचं, वारी वारी वारी जन्ममरणांते निवारी.. प्रत्यक्षात जन्ममृत्यूच्या चक्राचं निवारण ज्यानं होईल अशी खरी वारी करायचीच नाही! मग नुसतं पायी चालत पंढरीला गेलं पण मन घरीच अडकून राहिलं, तर काय उपयोग? त्या वारीचं कसलं सुख? प्राण गेले तर हे शरीर म्हणजे तर नुसतं प्रेत आहे.. या शवाला तारणारा जो केशव त्याचं दर्शन जर साधलं नाही तर जन्माला येऊन प्रेतवत जगण्यात काय लाभ? जन्माला यायचं ते खऱ्या वारीसाठीच..
गाडीचा वेग मंदावला.. त्यामुळे डब्यातल्या लोकांच्या गप्पांचा आवाज हृदयेंद्रच्या कानावर पडू लागला.. अस्वस्थ चित्तानं तो बर्थवरून उतरला.. डब्यातल्या लोकांनी काहीशा कुतूहलानं त्याच्याकडे नजर टाकली. तो जाऊन दाराशी उभा राहिला.. काही क्षणांत गाडी सुरू झाली आणि तिनं वेग पकडला.. वाऱ्याचा झोत अंगावर झेलत हृदयेंद्र बाहेर पाहात होता.. घरं, शेतं, माणसं, जनावरं, झाडं, जंगलं वेगानं मागे पडत होती.. त्याला वाटलं, जगाच्या या पसाऱ्यातून आपणही वारीला निघालो आहोत.. पण ही वारी खरंच साधेल की पुन्हा या पसाऱ्याच्याच वारीसाठी पावलं माघारी वळतील?

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 27, 2015 12:43 pm

Web Title: abhang dhara
टॅग : Loksatta,Marathi News
Next Stories
1 बगल में छुरी..
2  अहंकाराची शेंडी – २
3 १४३. अहंकाराची शेंडी – १
Just Now!
X