तुझ्या चरणी जी अनन्यता आमच्या वडिलांना साधली होती, तिचा वारसा आम्हाला का नाही, असं ‘नामयांच्या पोरां’चं हे जगावेगळं भांडण हृदयेंद्रच्या डोळ्यासमोर उभं राहिलं होतं. ‘कितीतरी संतांच्या अभंगात अशा अनन्यतेचे भावस्पर्शी दाखले आहेत,’ असं तो म्हणाला.
कर्मेद्र – चर्चेत खंड पाडतोय त्याबद्दल दिलगीर आहे.. पण जेवायला कुठे जायचं?
योगेंद्र – (हसत) तोडलीस तार! जाऊ कुठेतरी..
कर्मेद्र – हो, पण त्याआधी एकदा चहा होऊदे.. हृदू तुझ्या हातचा चहा प्यावासा वाटतोय.. (हृदयेंद्रही हसत चहा बनवायला उठतो) हृदयेंद्र महाराजांच्या या मठीत बाहेरचं जग आत आणणारं कोणतंही उपकरण नाही.. ना घरात टीव्ही आहे, ना रेडिओ.. टेप आहे, पण साऱ्या बडय़ा गवय्यांच्या.. ठीक चहा बनेपर्यंत माझ्या मोबाइलवरची गाणी ऐका..
योगेंद्र – कर्मू कृपा कर.. रसभंग नको..
कर्मेद्र – अरे चांगली पण गाणी आहेत जगात.. त्यातूनही तुमची भक्ती पाझरतेच..
हृदयेंद्र – (चहाचं आधण ठेवताना हसत) हो.. खरंय.. एक शिष्य गुरुजींना अनेक दिवस टाळत होता. टाळून टाळून किती टाळणार? जितकं दूर जावं तितकी त्यांची आठवण येई! एकदा समोर आलाच. तेव्हा हसून ते म्हणाले, ‘अजी रूठकर अब कहाँ जाइएगा, जहाँ जाइएगा हमें पाइएगा!’ मला तर कितीतरी हिंदूी गाण्यातून देव आणि भक्ताची अनन्यता जाणवते.. नव्हे कित्येक गाण्यांची मूळ प्रेरणा ही संतसाहित्यात आहे की काय, अशी शंकाही येते!
योगेंद्र – कशातही काही शोधण्याची सवय घातक आहे बरं का.. उलट चित्रपटांच्या गाण्यांचा प्रवास पाहिला तरी आपला सामाजिक प्रवास दिसून येतो.. पूर्वी कसं होतं? ‘कैसे आऊ जमुना के तीर’ असा सवाल होता, आज कसं आहे? ‘तू जब जब मुझको पुकारे मै दौडी आऊँ नदियाँ किनारे’! पूर्वी कसं होतं? ‘मुहब्बत ऐसी धडकन है, जो समझाई नहीं जाती’ नंतर त्याच आवाजात काय आलं? ‘मुहब्बत बडे काम की चीज है, आराम की चीज है’!
तोवर कर्मेद्रनं गाणी सुरू केली होती. ती ऐकता ऐकता चहा आला. लताबाईंच्या आर्त स्वरांत गाणं सुरू होतं.. ‘‘तुम्हें देखती हूँ तो लगता है ऐसे। के जैसे युगोंसे तुम्हें जानती हूँ। अगर तुम हो सागर, मैं प्यासी नदी हूँ।
अगर तुम हो सावन मैं जलती कली हूँ।..’’
हृदयेंद्र – (हसून) या गाण्यावरून आठवण झाली.. श्रीगोंद्याला शेख महम्मद नावाचे थोर संत होऊन गेले..
योगेंद्र – हो! ‘योगसंग्राम’ हा त्यांचा ग्रंथ प्रसिद्ध आहे..
हृदयेंद्र – त्यांच्या अभंगात अशाच, पण अधिक सखोल आर्त ओळी आहेत पहा.. थांबा, माझ्या वहीत मी त्या लिहिल्या आहेत.. (वहीत पहात) अभंग फार प्रदीर्घ आहे.. पण या ओळी ऐका.. मराठी अगदी जुन्या वळणाचं आहे.. हरि तु माझा प्रजन्य।.. म्हणजे पर्जन्य, पाऊस बरं का.. हरि तु माझा प्रजन्य। मी तव तुझ्या नद्या। सिंधु जाल्या सुध्या मी तु तैस्या।। म्हणजे हे देवा तू पाऊस आहेस.. कसला पाऊस? तर भावभक्तीचा! आणि मी त्या पावसामुळे दुथडी भरून वाहणारी भावप्रवाही नदी आहे.. ही नदी पुन्हा ज्या महासागराला मिळणार आहे तोही तूच आहेस! कृपेचा महासागर.. मग मी आणि तू वेगळेपणानं उरणार नाही.. केवळ तूच उरणार आहेस!! पुढे म्हणतात.. हरि तुं माझा तरुवर।। मी तुझे फूलफळ।। सोमति सकळ पत्रें खांद्या।।.. हे देवा तू झाड आहेस आणि भक्त म्हणजे त्या झाडाचे फूल, फळ, पान आहे.. तुझ्या अंगाखांद्यांवर आम्ही शोभत आहोत.. हरि तुं माझा डोळा। मी अंत्र बाहुली। शरीर साउली मीचि तुझी।।.. हे देवा तू डोळा असशील तर भक्त त्या डोळ्यातली बाहुली आहे! तू शरीर असशील तर भक्त तुझी सावली आहे!!
योगेंद्र – वा.. फार सुरेख.. खरंच हृदू आपल्या मराठीत इतकं विपुल साहित्य आहे आणि त्यात इतकं विचारधन भरून आहे याची वाढती जाणीव आपल्या या सर्व भेटीगाठींतून झाली आहे..
हृदयेंद्र – पण या विचारधनाचं एक वैशिष्टय़ आहे बरं का! हे विचारधन नुसतं बुद्धीला आकर्षित करीत नाही, तर हृदयालाही अधिक भावसंपन्न करतं.. या भावसंस्कारातून उपासनाच अधिक चैतन्यमय होते.. संतांची ही अनंत काळ टिकणारी कृपाच आहे!!