निवृत्ती ज्ञानदेवांच्या संगतीनं सुखावलेल्या नामदेवांनीही म्हटलं होतं.. धन्य आमुचें भाग्य परब्रह्म संगें। साहित्य स्वआंगें करीतसे।। नाशिवंत देह जाईल की अंती। नीचाची संगति कोण काजा।। माणसाचा देह लाभून, पंढरीचा वास लाभून आणि निवृत्ती, ज्ञानदेवांचा संग लाभून आमचं भाग्य उजळलं आहे.. त्यांच्याच देहातून तो सर्वसमर्थ प्रकटला आहे.. हा देह नाशिवंत आहे, तो शेवटी जाणारच आहे.. मग नीच इच्छांची, विचारांची संगती करण्यात आणखीनच अधोगती आहे.. त्यापेक्षा या संतांचा परीसस्पर्श लाभला तर जन्माचं सोनं होईल.. पण नामदेवही तर त्याच तोडीचे होते! जनाबाईही म्हणतात, ‘‘संतांचा तो संग नव्हे भलतैसा। पालटावी दशा तात्काळिक।।’’ संतांचा संग भलता मानू नका, त्यानं तुमची दशा तात्काळ पालटली जाते.. ही दशा म्हणजे ग्रहदशाही आहे! आपल्या मनाचा, बुद्धीचा जो पूर्वग्रह असतो तो पालटला जातो!! हृदयेंद्रचं मन नामदेवांच्या काळातील पंढरपुरी जाऊन थडकलं.. त्याच्या डोळ्यासमोर नामदेवांच्या चरित्रातला तो प्रसंग उभा राहिला..
पंढरपुरात परिसा भागवत नावाचा रुक्मिणीचा भक्त राहात होता. नामदेवांची योग्यता त्याला उमगत नव्हती. एकदा रुक्मिणीनं प्रसन्न होऊन त्याला परीस दिला. रोज थोडय़ा लोखंडाचं सोनं करावं आणि ते विकावं, या पद्धतीनं त्याचा चरितार्थ चालला होता. त्याची पत्नी कमळजा आणि नामदेवांची पत्नी राजाई चंद्रभागेवर पाणी भरण्यास जात तेव्हा गप्पा होत. एकदा कमळजेनं त्या परीसाची गोष्ट सांगितली आणि राजाईनं तो एक दिवसासाठी मागितला. कमळजेनं तो दिला. राजाईनंही घरी थोडं सोनं करून पाहिलं आणि ते विकून घरी पंचपक्वान्नांचा बेत केला. नामदेव महाराज घरी आले. तो थाटमाट पाहून त्यांनी विचारलं तेव्हा त्यांना राजाईनं तो परीस मोठय़ा कौतुकानं दाखवला. नामदेवांनी तो तात्काळ हाती घेतला आणि चंद्रभागेकडे धाव घेत तो नदीच्या प्रवाहात फेकून दिला! हा प्रकार कळताच परिसा भागवतांच्या घरी एकच हलकल्लोळ झाला. संतापलेले परिसा नामदेवांच्या घरी आले. आजूबाजूची माणसंही जमली.. परिसा तारस्वरात म्हणाले, ‘‘यानं माझा परीस चोरलाय आणि तो खोटंच सांगतोय की तो चंद्रभागेत फेकला आहे..’’ नामदेव त्यांची समजूत काढू लागले, पण उपयोग होईना. अखेर ते त्यांना घेऊन चंद्रभागेच्या तीरी आले. म्हणाले तुम्ही चंद्रभागेतून तो काढून घ्या! परिसा आणखीनच रागानं नामदेवांकडे पाहू लागले. नामदेवांनी तात्काळ चंद्रभागेत उडी घेतली आणि हातात चार-पाच दगड घेऊन ते काठावर आले. म्हणाले, यातला तुमचा परीस कोणता तो पाहा.. परिसा भागवतांनी एक दगड घेतला आणि लोखंडाला लावला, तो त्याचं सोनं झालं. त्यानं आश्चर्यानं दुसरा दगड घेतला, त्यानंही लोखंडाचं सोनं झालं.. सर्वच दगडांनी तसं साधलं.. परीसानं लोखंडाचं सोनं होईलही, पण ज्यांच्या नुसत्या हस्तस्पर्शानं दगडाचा परीस होऊ शकतो ते माझ्या जीवनाचंही सोनं का करणार नाहीत, हा भाव परिसा भागवतांच्या मनात दाटून आला. त्यांनी नामदेवांचे पाय धरले आणि ते सर्व दगड चंद्रभागेत टाकून दिले.. अक्कलकोटच्या स्वामी समर्थाकडेही एक गरीब ब्राह्मण असाच आला होता.. आपली गरीबी स्वामीच दूर करतील, असं त्याच्या बायकोनं दटावून सांगितलं होतं. पाहिलं तर स्वामी समर्थाची स्वारी स्मशानात बसलेली आणि हाडांशी खेळत असलेली! घाबरतच त्यानं येण्याचं कारण सांगितलं. समर्थानी हसून सांगितलं, यातली हवी तेवढी हाडं घेऊन जा! त्यानं खजील मनानं एकच हाड झोळीत टाकलं.. समर्थाना नकार देण्याचं धाडस कोणात होतं? स्वामींची िनदा करीतच तो घरी परतला बायकोनं उत्सुकतेनं विचारलं, काय दिलं स्वामींनी? त्यानं घडला प्रकार सांगून झोळी तिच्यासमोर टाकली. तिनं झोळीतून हाड काढलं तर ते सोन्याचं झालेलं! चिडून ती म्हणाली, ‘‘तुम्हीच जन्माचे कर्मदरिद्री.. इतकी हाडं पडली होती, एकच उचललंत? जा परत त्यांच्याकडे’’.. तो धावतच स्वामींकडे गेला. विनवू लागला.. आणखी हाडं द्या! समर्थानी उसळून विचारलं, ‘‘तुझ्या शरीरात काय कमी हाडं आहेत का? त्यानंच जगण्याचं सोनं का करीत नाहीस?’’ अज्ञानझोपेत गढलेल्या मनाला सद्गुरूच अशी जाग आणतात.. जगण्याचं सोनं करतात.. त्या भावनेनं तो संग साधला मात्र पाहिजे..
संग्रहित लेख, दिनांक 31st Jul 2015 रोजी प्रकाशित
परीस
निवृत्ती ज्ञानदेवांच्या संगतीनं सुखावलेल्या नामदेवांनीही म्हटलं होतं.. धन्य आमुचें भाग्य परब्रह्म संगें। साहित्य स्वआंगें करीतसे।।
First published on: 31-07-2015 at 01:15 IST
मराठीतील सर्व अभंगधारा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Abhangdhara